शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाचे आजार, उपाययोजना

प्रजनन क्षमता चांगली राहण्यासाठी शेळी-मेंढीला पौष्टिक व समतोल आहार द्यावा.
प्रजनन क्षमता चांगली राहण्यासाठी शेळी-मेंढीला पौष्टिक व समतोल आहार द्यावा.

शेळ्या मेंढ्यांना गर्भाशयाचा आजार झालेला आहे हे लवकर लक्षात येणे गरजेचे आहे. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. शिवाय उपचारास उशीर झाल्याने महागडे औषधोपचार करूनही आजार पूर्णपणे बरे होत नाहीत.   शेळ्या-मेंढ्यांमध्ये प्रजनन संस्थेचे म्हणजेच गर्भाशयाचे आजार होतात. गर्भाशयाचे आजार लवकर लक्षात येत नाहीत. पुढे दिलेल्या प्रजनन संस्थेच्या आजारांच्या प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या साहाय्याने आजारी जनावरांवर वेळीच उपचार करावेत. १) वार अडकणे ः

  • वार अडकण्यावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने शास्त्रीय पद्धतीने शेळी-मेंढीचे व्यवस्थापन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते.
  • करडू-कोकरू गर्भाशयात असताना त्याच्याभोवती जे आवरण असते, त्याला वार असे म्हणतात. वार अडकणे म्हणजेच गर्भाशयाची व वारेची फुले न सुटणे, फुले न सुटण्याची महत्त्वाची अनेक कारणे आहेत.
  • यात शेळी-मेंढीचे आरोग्य, क्षार-जीवनसत्त्वाची व हिरव्या चाऱ्याची कमतरता, गर्भाशयात जिवाणूचा प्रादुर्भाव, कोकरामध्ये झालेले बदल, शेळी-मेंढी गाभडणे, आनुवंशिक दोष, कालावधी पूर्वप्रसूती आणि कालावधीनंतर प्रसूती, व्यायामाची कमतरता यामुळेसुद्धा वार अडकतो.
  • वार जर ८-१२ तासानंतरसुद्धा गर्भाशयातच राहिला तर वार सडून, त्यात रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो व त्यामुळे गर्भाशयाचा दाह होतो.
  • उपचार

  • शेळी-मेंढी व्यायल्यानंतर वार ८-१२ तासांच्या आत न पडल्यास पशुवैद्यकाच्या मदतीने औषधोपचार करावा.
  • जर वार लोंबत असेल तर त्याला दगड, विटकर, चप्पल बांधू नये किंवा हाताने ओढू नये. त्यामुळे गर्भाशयास इजा पोचते व रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे वार लोंबत असेल तर तो १-२ सें.मी. अंतर ठेवून कापून टाकावा व तो कुत्रा किंवा इतर जनावर खाणार नाही याची काळजी घ्यावी किंवा तो खड्ड्यात पुरून टाकावा.
  • शेळी-मेंढी व्यायल्यानंतर तिला शारीरिक वेदना व जोराची भूक लागते, त्यामुळे व्यायल्यानंतर तिला शक्तिवर्धक व पचण्यास सुलभ असा पोषक आहार द्यावा. त्यामुळे दूध उत्पादनदेखील वाढते.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • गाभण शेळी-मेंढीस शेवटच्या महिन्यात संतुलित आहार द्यावा. त्यात खनिज मिश्रण, हिरवा चारा तसेच सुका चारा यांची कमतरता नसावी.
  • गाभण शेळी-मेंढीस शेवटच्या दोन महिन्यांत चालण्याचा व्यायाम द्यावा. व्यायल्यानंतर करडास-कोकरास त्वरीत चिक पाजावा. त्यामुळे वार पडण्यास मदत होईल.
  • २) शेळी-मेंढी अडणे

  • शेळी-मेंढी, नैसर्गिक प्रसूतीच्या वेळेस करडू-कोकरू बाहेर येण्यास अडचण होणे यास शेळी-मेंढी अडणे असे म्हणतात.
  • अडून जास्त काळ झाल्यास शेळी-मेंढीच्या जीविताला धोका होऊ शकतो. करडास-कोकरास बाहेर ओढण्याचा प्रयत्न करू नये. योनीमार्ग लहान असणे, गर्भशयास पीळ बसणे, प्रसूतीच्या कळा न देणे, गर्भशयाचे मुख अर्धवट किंवा न उघडणे तसेच शेवटच्या महिन्यामध्ये पौष्टिक व समतोल आहार न मिळाल्याने करडांचे-कोकरांचे पाय किंवा डोके दुमडणे, शरीर आकाराने मोठे, सुजणे किंवा विचित्र वाढ झालेली असणे, नैसर्गिक स्थितीत नसणे इ. कारणांमुळे प्रामुख्याने शेळी-मेंढी अडते.
  • उपचार प्रसूतीच्या वेदना सामान्य असतील, पण अधिक वेळ लागत असेल किंवा करडांचा-कोकरांचा शरीराचा भाग बाहेर आला असेल तर जनावर अडले असे समजावे व त्वरीत तज्ज्ञ पशुवैद्यकाला औषधोपचारासाठी पाचरण करावे. प्रतिबंधात्मक उपाय

  • गाभण शेळी-मेंढीला शेवटच्या महिन्यामध्ये पौष्टिक व समतोल आहार तसेच दररोज चालण्याचा व्यायाम द्यावा.
  • मागच्या प्रसूतीच्या वेळेस शेळी-मेंढी अडल्यास चालू प्रसूतीच्या वेळेस विशेष काळजी घ्यावी.
  • -मादीच्या गर्भाशयात अनावश्‍यक हात घालू नये किंवा करडाचे-कोकराचे बाहेर आलेला शरीराचा भाग ओढू नये, त्यामुळे ते दगवण्याची दाट शक्‍यता असते.
  • संपर्क ः डॉ. प्रशांत माने, ८३७९९३०९९३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com