नव संशोधनाला देऊया चालना...

 स्थानिक लोक समस्येवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करीत आहेत.
स्थानिक लोक समस्येवर मात करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करीत आहेत.

अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक जण काही ना काही उपाय शोधतो आहे. त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांनाही झालेला आहे. ग्रामीण भागातील लोकांनी गरज ओळखून शोधलेले उपाय, केलेल्या संशोधनाची नोंद ठेवण्यासाठी आम्ही राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानची (एनआयएफ) सुरवात केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांनी केलेल्या संशोधनाला आकार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. काही जणांनी श्रम कमी करणारी गरजेनुरूप छोटी यंत्रे, अवजारे, उपकरणे बनविली. काही जणांनी वनौषधींबाबत उपयुक्त संशोधन केले. तांत्रिक संशोधनाच्या बरोबरीने आम्ही शैक्षणिक आणि सामाजिक संशोधनांचीदेखील दखल घेत आहोत. आमच्याकडे जमा झालेल्यांपैकी काही जणांचे संशोधन हे व्यावसायिक स्तरावर उपयुक्त असल्याचे दिसून आले. आतापर्यंत एकाच विभागातील लोक एकत्र येत समस्येवर उपाय शोधतात, परंतु आता वेगवेगळ्या विभागांतील लोकांना एकत्र आणा, त्यांच्यातील चर्चेतून विविध उत्तरे मिळतील. विविध पातळीवर झालेल्या प्रयोगातून निश्‍चितपणे एखादे चांगले संशोधन आपल्या हाती लागते. देशभरातील अशा संशोधनांचे एकत्रीकरण स्वतंत्र केंद्रामध्ये करावे लागणार आहे. कोणालाही अडचण आली तर या केंद्रातून सहज उत्तर मिळू शकेल. देशात संशोधनाला मदत करणारी शहरे किंवा गावे ‘इनक्‍युबेशन कॅपिलट' म्हणून विकसित करावी लागणार आहेत. देशाच्या विविध राज्यांत आम्ही दरवर्षी शोधयात्रा काढतो. यातून अनेक संकल्पना, पारंपरिक ज्ञान आणि संशोधनाच्या नोंदी आमच्याकडे जमा झाल्या आहेत. आमच्याकडे जमा झालेल्या संशोधनाची माहिती यात्रेच्या माध्यमातून विविध गावातील लोकांना देत असतो. यात्रेदरम्यान आम्ही ग्रामीण विद्यार्थ्यांशीही संपर्क साधून त्यांच्याही कल्पना जमा करतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत विकसित केलेल्या तंत्रज्ञानाकडे आयआयटी आणि उद्योग क्षेत्राचे लक्ष वेधण्याचे काम आम्ही सातत्याने करतोय. नवीन तंत्रज्ञान, शिक्षण संस्था, गुंतवणूक आणि उद्योग संस्था हे घटक एकमेकांना जोडले पाहिजेत. आम्ही अमेरिका आणि चीनमध्येही नवीन संशोधकांना चालना देण्यासाठी शोधयात्रा काढल्या. चीनमधील तीस प्रांतातून आमच्याकडे सहा हजारांहून अधिक संकल्पना जमा झाल्या आहेत. यातून निश्चितपणे सामान्य लोकांच्या अडचणींवर मात करणे शक्य होणार आहे. जगाचे लक्ष भारतीय संशोधन आणि विकासावर आहे. तेव्हा आपली पिढी ज्ञान आणि संशोधनाने जेवढी समृद्ध करू, तेवढ्या वेगाने देशाची प्रगती होईल. प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या संकल्पनांची ‘नॉलेज बॅंक' विकसित करावी. त्यातून काही समस्यांना उत्तरे मिळतील. आजची तरुण पिढी उत्साही आहे, नावीन्याची आवड आहे. यातून नवे संशोधक, शिक्षक, उद्योजक, शेतकरी तयार होतील. सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये पारंपरिक शिक्षणाच्या बरोबरीने गावपातळीवर झालेल्या संशोधनाचाही सहभाग हवा. स्थानिक लोकांनी शोधलेले तंत्रज्ञान आम्ही शास्त्रीय पद्धतीने नोंदवून ठेवले आहे. या प्रकल्पांवर उद्योग क्षेत्राने अधिक संशोधन करून नवीन तंत्र विकसित करावे. ग्रामीण संशोधक आणि विद्यार्थ्यांच्या प्रकल्पात शासन तसेच उद्योग क्षेत्राने गुंतवणूक करावी, अशी आमची मागणी आहे. आम्ही यंदाच्या १५ आॅगस्टपासून ‘आओ चले, अाविष्कार करे...` ही संशोधनाला चालना देणारी मोहीम सुरू केली. यातून उपलब्ध झालेली माहिती आमच्या संस्थेच्या संकेतस्थळावर देत आहोत. आतापर्यंत ‘राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठान'ने (एनआयएफ) देशभरातून सुमारे एक लाख ८० हजार नवसंशोधनांची नोंद केली आहे. या संशोधकांमध्ये विद्यार्थी, शेतकरी, शिक्षक असे समाजातील विविध घटक आहेत. या लोकांचे प्रयोग आणि संशोधनाला मूळ रूप देण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे सर्व प्रयोग, संशोधने आमच्या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. या संशोधकांना आम्ही उद्योगांशी जोडून हे संशोधन प्रत्यक्षात लोकोपयोगी केले आहे. यामुळे लोकांना कमी खर्चात समस्यांवर उत्तरे मिळाली. संशोधकांनाही आर्थिक मदत उपलब्ध झाली. त्यांचा आत्मविश्‍वास वाढला. राज्यातील उद्योजकांनी या नवसंशोधकांच्या कौतुकाबरोबरीने आता आर्थिक मदतही करावी; जेणेकरून खऱ्या अर्थाने हे संशोधन समाजाच्या उपयोगात येईल. नवसंशोधक हीच देशाची खरी ताकद आहे.   संकेतस्थळ ः www.nif.org.in (लेखक अहमदाबादमधील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये प्राध्यापक असून ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’चे संस्थापक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com