संशोधन, शिक्षणामध्ये बदलाची गरज

माझे अनुभव
माझे अनुभव

गेल्या काही वर्षांचा आढावा घेता कृषी क्षेत्राकडे विद्यार्थांचा ओढा वाढला आहे, ही चांगली गोष्ट आहे. परंतु दुसऱ्या बाजुला परदेशातील कृषी शिक्षण पद्धती आणि महाविद्यालयांचा दर्जा पाहाता आपल्याला बऱ्याच सुधारणा कराव्या लागणार आहेत. राज्यातील कृषी विद्यापीठे आणि काही कृषी महाविद्यालयांनी बदलत्या काळानुसार शिक्षण, पायाभूत सुविधा आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सुरवात केली. परंतु असे प्रयत्न राज्यभरातील कृषी महाविद्यालयांत व्हायला हवेत. त्यामुळे कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना सध्याच्या काळात प्रत्यक्ष शेती आणि जगभरात कृषी क्षेत्रातील प्रगतीची दिशा, शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात येतील. त्याचा निश्चितपणे संशोधनासाठी फायदाच होईल. शेतकरी त्यांच्या पातळीवर नवनवीन माहिती घेऊन शेतीमध्ये बदल करताहेत. त्याचा अभ्यास कृषी विद्यार्थ्यांनी करावा. सध्याच्या काळात विद्यार्थी कृषी शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षांकडे वळलेले दिसतात. काहीजण अधिकारीही होतात. यांनी कृषी ज्ञानाचा उपयोग त्यांच्या कार्यक्षेत्रात चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितपणे संबंधित परिसरातील सामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीला फायदा होईल. याचा विचार शिक्षण घेत असलेल्या कृषी विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. परदेशातील कृषी शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये काळानुरूप आणि गरजेनुसार सातत्याने बदल होताहेत. त्याचा तेथील विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना देखील फायदा होतो. त्याच पद्धतीने आपल्याकडील कृषी आणि अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत बदल गरजेचा वाटतो. त्यामुळे आपला विद्यार्थी नव्या बदलांना चांगल्या प्रकारे सामोरा जाईल. मला उच्च शिक्षणाच्या निमित्ताने थायलंड, इस्त्राईल आणि जपानमधील कृषी शिक्षण आणि प्रत्यक्ष शेतीमधील बदल अनुभवता आले. थायलंडमधील कसेटसार्ट विद्यापीठात पीएच.डी करताना मला भाताच्या तीन नवीन जातींच्या प्रत्यक्ष संशोधनात सहभागी होता आले. यामध्ये मला भात जातींचे जनुकीय विश्लेषण करण्याची संधी मिळाली. येथे शिक्षण घेताना एक महत्त्वाचा फरक जाणवला तो म्हणजे येथील विद्यापिठातील अभ्यासाचे वातावरण मोकळे आहे. आपल्या आवडीचा विषय या विद्यापीठात शिक्षणासाठी निवडता येतो. यामुळे निश्चितपणे आकलन आणि निर्णय क्षमता वाढण्यास मदत झाली.या ठिकाणी नवे संशोधन आणि विकासाची दिशा समजली. विद्यापीठांना सरकारतर्फे चांगली आर्थिक मदत आणि प्रोत्साहन मिळते. येथील अभ्यासक्रमामध्येही विविधता आहे. त्यामुळे विविध विषय शिकता येतात. विद्यापिठातील प्रयोगशाळा उच्च दर्जाच्या आहेत. त्यामुळे येथे काम करताना नवीन संशोधनाची दिशा कळाली. आपल्याकडेही चांगल्या प्रयोगशाळा तयार झाल्या तर निश्चितपणे कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संशोधन आणि विस्ताराच्या नव्या संधी तयार होतील. येथील विद्यापीठात शिकवण्यासाठी विविध विषयातील तज्ज्ञ येत असतात. त्याचाही विद्यार्थ्यांना फायदा होतो. माहिती तंत्रज्ञानाचा शेती क्षेत्रात वापर झपाट्याने वाढला आहे. त्यादृष्टीने आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेण्याची गरज आहे. परदेशातील विद्यापीठात शालेय विद्यार्थी सातत्याने भेटी देतात. त्यामुळे लहान वयामध्येच त्यांची संशोधनाची दृष्टी तयार होते. आपल्या विद्यार्थ्यांना जगभरातील विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी संधी आणि शिष्यवृत्ती उपलब्ध आहे, गरज आहे ती चौकसपणे संबंधित विद्यापीठांच्या संकेतस्थळावरील माहिती पाहण्याची. आपल्या राज्यात तसेच परराज्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये वेगळेपण जपले आहे. अशा शेतकऱ्यांशी कृषी विद्यार्थ्यांचा थेट संवाद झाला पाहिजे. प्रत्यक्ष शेतीला भेटी दिल्या तर विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना प्रत्यक्ष शेती क्षेत्रात काय बदल होताहेत हे लक्षात येईल. बारामती येथील कृषी महाविद्यालय, कृषी विज्ञान केंद्र आणि ‘सेंटर आॅफ एक्सलन्स`ला मी नुकतीच भेट दिली. येथील प्रक्षेत्रावरील प्रयोग विद्यार्थी आणि राज्य, परराज्यातील शेतकऱ्यांना दिशादर्शक आहेत. कृषी क्षेत्रात अनेक संधी आहेत, त्यासाठी नवी शिक्षण पद्धती आणि नवीन संशोधनाला गती देण्याची गरज आहे.

संपर्क ः डॉ. दीप्ती जयंतराव वानखडे, विरुळ रोंघे, जि. अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com