agriculture story in marathi, rose farming, floriculture, harangul, latur | Agrowon

संघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली गुलाब शेती 
रमेश चिल्ले 
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

दुष्काळातही तग धरणार 
अलीकडील वषार्त पाऊसमान कमी झाले आहेच. यंदाही पाऊस न झाल्यातच जमा आहे. केवळ गुलाबशेती यंदा टिकेल. बाकी फुले कमी करावी लागतील असे उपडे सांगतात. पण टॅंकरने पाणी आणून वा उपलब्ध पाण्यात फूलशेती टिकवणारच अशी जिद्द उपाडे यांच्या बोलण्यात दिसते. 
 

लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक गावाला निसर्गाची नेहमीचीच अवकृपा झेलावी लागली आहे. मात्र या परिस्थितीला शरण न जाता येथील उपाडे बंधूंनी गेल्या १४ वर्षांपासून फूलशेतीत आपले पाय भक्कमपणे रोवत ही शेती यशस्वी केली आहे. पाण्यासोबत संघर्ष करीत गुलाबासह लिली, शेवंती, ॲस्टर आदी फुलांच्या उत्पादनातून वर्षभर ताजे उत्पन्न घेत कुटुंबाची आर्थिक व सामाजिक प्रगती साधली आहे. 

लातूर शहराच्या विस्तारीत ‘एमआयडीसी’शेजारी म्हणजे सुमारे १२ किलोमीटरवर हरंगुळ (बु.) गाव लागते. येथील कृष्णा व गजानन या उपाडे बंधूंची सुमारे १५ एकर शेती आहे. हरंगुळचे (बु.) क्षेत्र म्हणजे सन २००३ मध्ये जिथे उघड्या बोडक्‍या क्षेत्रावर जिथे साधे कुसळही उगवत नव्हते तिथल्या माळरानाला सोन्याची किंमत मिळवून दिली. तेथे विस्तारीत एमआयडीसीची घोषणा झाली. काही चाणाक्ष मंडळींनी भांडवल गुंतवले. काहींची जमीनही गेली. काहींनी घरं, बंगले बांधले. ट्रॅक्‍टर, टेम्पो, ट्रक घेऊन व्यवसाय सुरू केला. काहींना वाटायचे लातूरपासून दहा- बारा किलोमीटरवरची जमीन पैसे देऊन जाईल. पण तेवढ्या लांबवर कोणी फिरकले नाही. वाट पाहून त्यांनाही रोजगार करावा लागतोय. 
अशा परिस्थितीत आपली जमीन राखून ठेवण्यात व संकटांवर मात करीत उपाडे बंधू यशस्वी झाले आहेत. 

संघर्षातून वाटचाल 
उपाडे बंधूंपैकी मोठे कृष्णा यांनी लातूर येथे काही काळ ‘फोटोग्राफी’चा व्यवसाय केला. स्मार्ट मोबाईलचा काळ सुरू झाल्यानंतर त्यांनी तो बंद केला. लहान गजानन वडिलांना मदत करीत कोरडवाहू पिके घेत. कृष्णा यांच्या लग्नानंतर वहितीखालील पाच एकरांत चरितार्थ भागवणे मुश्‍किल झाले. मग नव्या पीक पद्धतीचा अभ्यास सुरू झाला. शहराच्या जवळ कशाला जास्त मागणी आहे? आपण काय पिकवू शकतो याचा अभ्यास सुरू केला. गावातील एक जण गुलाब शेती करीत होते. त्यांच्याकडून दिशा मिळाली. हेच पीक करायचे नक्की केले. 

गुलाबाची शेती 
गुलाबाची सहा बाय चार फुटांवर गादीवाफ्यावर लागवड केली. भूम तालुक्‍यातून चांगल्या नर्सरीतून कलमे आणली. दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न मिळू लागले. धाकट्या गजाननचेही लग्न झाले. दोघांनीही आपापल्या वाटणीच्या शेतात अर्धा एकर गुलाब लावला. त्यात जम बसू लागल्यावर जोडीला गलांडा, निशिगंध, लिली, शेवंती अशी लागवड काही गुंठ्यात सुरू केली. कृष्णा यांनी एक एकर द्राक्षाताही प्रयोग केला. पण गारपिटीत नुकसान झाल्याने बाग मोडावी लागली. मग फूलशेतीच पूर्ण वेळ उद्योगासारखी करायला सुरुवात केली. 

कामकाजाचे नियोजन 
गावापासून तीन किलोमीटरवर शेती असल्याने जाणे-येणे लांबचे व्हायचे. म्हणून किल्लारी भूकंप दुर्घटनेनंतर वडिलांनी शेतातच झोपडे बांधून राहणे पसंद केलेले. पुढे दोन्ही मुलांना शेतीची आवड लागली. सगळा वेळ शेतीत देता येऊ लागला. पाण्यासाठी वडिलांच्या काळात असलेली विहीर खोल केली. नवे बोअर घेतले. पाणी जेमतेम असले तरी ठिबकमुळे फूलशेतीचे क्षेत्र भिजते. ठिबकमार्फत विद्राव्य खते देता येतात. दुध व शेणखतासाठी गाय व म्हैस आहे. फुलांचा बहार संपला की छाटणी केली जाते. भरखते, रासायनिक खते, दिल्याने बाग सशक्त राहते. 

काढणी व उत्पादन 
दोघे बंधू, त्यांच्या सौभाग्यवती, आई-वडील असे सगळे शेतीत राबतात. दररोज सकाळी सहा ते आठ या वेळेत दीड ते दोन फूट देठ ठेऊन फुले कट केली जातात. प्रत्येकी दहा फुलांचे बंडल बांधून नऊ वाजता फुले लातूर बाजारपेठेत मोटरसायकलद्वारे पोचविली जातात. सोबत गलांडा, निशिगंध, लिली अशी प्रत्येक १० गुंठ्यावर घेतलेली फुलेही असतात. गलांडा, निशिगंध सुटी फुलं ढिगांवर तर गुलाब, लिली बंडलावर विकली जातात. गुलाबाचे प्रत्येकी २० गुंठ्याचे तीन प्लॉटस आहेत. एकूण प्लॉटसमधून दररोज १००० ते १५०० फुले मिळतात. वर्षातील नऊ महिने फुले मिळतात. हिवाळ्यात गुलाबाचे कमी उत्पादन येते. पण त्यावेळेस अन्य फुले मिळतात. 

दर व अर्थशास्त्र 
बाजारभावात फार चढ-उतार असतात. दर काहीही असो, फुले मिळोत वा न मिळोत वर्षाकाठी किमान ४० ते ५० हजार खर्च अर्धा एकरसाठी येतो. फुलांचा दर्जा, देठाची लांबी यावर दर ठरतो. वर्षभराचा सरासरी दर प्रति फूल एक रुपया मिळतो. काही वेळा बागेत मधल्या जागेत भाजीपालाही घेतला जातो. सोयाबीन, मिरची, घरच्यापुरती ज्वारी, गहू, उडीद, मूग, हरभरा अशीही पिके उर्वरित क्षेत्रात घेतली जातात. गुलाबशेतीतून महिन्याला २४ हजार रुपये व खर्च वजा जाता १२ हजार रुपयांचे उत्पन्न २० गुंठ्यातून मिळते. तर वर्षाला सर्व फुलांतून सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न हाती पडते. 

शेतीतून प्रगती 
फूलशेतीतील उत्पन्नातून गजानन यांनी ४५ अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर बॅंकेच्या साह्याने घेतला. फावल्या वेळेत तो भाडेतत्त्वावरही दिला जातो. आज दोघा भावांची मुलं लातूर शहरात चांगल्या शाळेत शिकतात. घरात आज महत्त्वाच्या सर्व वस्तू आल्या आहेत. कष्ट अन् इनामदारीमुळे उपाडे बंधू आज सन्मानाने 
समाधानी जीवन जगताहेत. त्यांनी टुमदार घर बांधले. चिकाटीने फूलशेतीत टिकून राहिल्याने अभ्यासातून प्रगती होत गेली. अन्यथा शेजारच्या ‘एमआयडीसी’मध्ये कामगार म्हणून रोजगार करीत राहिलो असतो असे दोघे बंधू सांगतात. शेतीवरचा विश्‍वास, जे विकते ते पिकवले, चिकाटीने त्यात बदल करून नाविन्य जपले तर शेती किती आहे यापेक्षा आपण तिच्याकडे कशा नजरेने पाहतो हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. आज या बंधूंचे प्रयोग पाहून गावातील काही तरुणांनी फूलशेतीची प्रेरणा घेत आपली घरे पुढे आणलीत. एकीकडे शेतीतून तरुण मुलं दूर जात असताना उपाडे बंधू मात्र मातीत घट्ट पाय रोवून आपले ‘करिअर’ घडवीत आहेत हा आशावाद निश्‍चित मोलाचा आहे. 

संपर्क- कृष्णा मारुती उपाडे - ९७६३३८८८१७

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...
दोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
शोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
वातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...
‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....
तीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...
संघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...
संघर्ष, प्रयत्नावादातून केली यशस्वी...आटपाडी (जि. सांगली) येथील अत्यंत जिद्दीच्या...
भाजीपाला उत्पादक भंडारा जिल्ह्यात खासगी...पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा हा धानाचे भांडार...
दुष्काळात ऊस वाचविण्यासाठी ...यंदाच्या तीव्र दुष्काळात ऊस उत्पादक चिंतेत असून...
ताजी दर्जेदार दुग्धोत्पादने हीच...सध्या दूध उत्पादकांपुढे प्रक्रिया उद्योग किंवा...
पुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगारमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ...