मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत यशस्वी वाटचाल

अडीच एकरातील गुलाब लागवड.
अडीच एकरातील गुलाब लागवड.

निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता फुलशेतीमध्ये हमखास उत्पन्नाचा मार्ग शोधला आहे. बाजारातील मागणी ओळखून पीकपद्धतीत बदल केला. गुलाब फुलांच्या बाजाराचा अभ्यास करून विविध ठिकाणचे मार्केट मिळवून डाळिंब बागेसह पारंपरिक पिकांच्या उत्पादनातही वाढ साधली आहे.   शिर्डी (ता. राहाता, जि. नगर)पासून २ किलोमीटर अंतरावरील निमगाव येथील प्रभात पाटील यांची अकरा एकर शेती. पाण्याची चांगली उपलब्धता असल्यामुळे ते अनेक वर्षांपासून उसाचे पीक घेत. प्रभात पाटील यांचा मुलगा हर्षल यांनी बी. फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. हर्षल एकुलते एक असल्यामुळे नोकरीसाठी आई-वडिलांपासून दूर न जाता त्यांनी घरच्या शेतीत लक्ष घालण्याचे ठरविले. ऊसशेतीमध्ये प्रयत्न करूनही उत्पादनात वाढ होत नव्हती, त्यामुळे हर्षल यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचे ठरविले. त्यासाठी विविध पिकांच्या मार्केटचा अभ्यास सुरू केला. विविध ठिकाणी भेटी देऊन पिकांची माहिती घेतली. पीकपद्धतीत बदल जवळच शिर्डी देवस्थान असल्यामुळे येथे फुलांना चांगली मागणी असल्याचे लक्षात आले, त्यामुळे २०१६ मध्ये उसाचे पीक मोडून गुलाबाची लागवड केली. या भागातील वातावरण डिव्हाइन जातीसाठी अनुकूल असल्यामुळे डिव्हाइन जातीच्या गुलाबाची निवड केली. सुरवातीला एक एकर क्षेत्रावर लागवड केली. बाजारातील गुलाब फुलांची मागणी आणि गरज ओळखून नंतर लागवड क्षेत्रात दीड एकरने वाढ केली. याशिवाय २०१७ सालीमध्ये साडेतीन एकर क्षेत्रावर भगवा जातीच्या डाळिंबाची लागवड केली. पीकपद्धती पाटील यांच्याकडे सध्या अडीच एकर गुलाब, साडेतीन एकर डाळिंब असून, सध्या दीड एकरावर झेंडू लागवडीचे नियोजन आहे. उर्वरित क्षेत्रावर मका, ऊस, घास इ. पिके घेतली जातात. साडेतीन एकर क्षेत्रावरील डाळिंब बागेत काद्यांचे, झेंडूच्या फुलांचे आंतरपीक घेतले आहे. त्यात यंदा वीस टन कांदा निघाला. मार्केटचा अभ्यास करून विक्रीचे नियोजन शिर्डी मार्केटला फुलांना चांगली मागणी असते. मात्र, राज्यातील इतर भागांपेक्षा येथील दरात फरक असतो. मार्केट लहान असल्यामुळे फुलांची आवक जास्त झाल्यास दरावर परिणाम होतो. शिवाय, येथे शेकड्यावर, तर अन्य ठिकाणी किलोवर फुलांची विक्री करावी लागते. शिर्डीत ३० रुपये ते ५० रुपये शेकडा दर मिळतो. शेकड्यावरील दरापेक्षा किलोचा दर परवडत असल्याने हर्षल यांनी इतर मार्केटचा शोध घेतला, त्यासाठी फुलबाजाराचा अभ्यास असलेले मित्र अशोक शिवाजी कोते यांच्याबरोबर नागपूर, मुंबई, अमरावती, भोपाळ आदी भागांत जाऊन फुलांच्या मार्केटची माहिती घेतली. त्यानुसार विक्रीचे नियोजन केले. एकीमुळे विक्रीतील अडचणीवर मात

  • शिर्डी मार्केटमधील फुलांचे दर पाहून हर्षल पाटील यांच्यासह त्यांच्या परिसरातील पाच फूल उत्पादक शेतकरी मित्र एकत्रितपणे फुलांची विक्री करतात. शिर्डी येथून दररोज राज्यात आणि देशभरातील विविध ठिकाणच्या शहरांत, अगदी थेट एक हजार किलोमीटरपर्यंत जाणारी वाहने मिळतात. त्याचाही फूल विक्रीला फायदा होतो.
  • बाजारात दर कमी- जास्त झाले तरी राज्यातील इतर भागांत एकत्रितपणे गुलाब विक्रीसाठी पाठविले जातात, त्यामुळे दरही चांगला मिळतो आणि वाहतुकीवरही कमी खर्च होतो. लग्नसराई, दिवाळी, नवरात्रात गुलाब फुलांना चांगली मागणी असते.
  • अर्थकारण पंधरा दिवस जास्त, तर त्यानंतरचे पंधरा दिवस कमी, असे गुलाबाचे उत्पादन मिळते. सरासरी दिवसाला १३० ते १५० किलोपर्यंत उत्पादन जाते. नियमित पुरवठा केल्यामुळे विक्री केलेल्या गुलाबाचे पैसेही थेट खात्यावर जमा केले जातात. किलोला साधारण ५० ते ६० रुपये भाव मिळतो. महिन्याला खर्च वजा जाता साधारणपणे ४५ ते ५० हजार रुपये नफा मिळतो. डाळिंब बागेमध्ये यंदा बहर धरला असून, पुढील काळात उत्पादन मिळेल. जपली प्रयोगशीलता

  • प्रभात पाटील व हर्षल पाटील शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत असतात. दहा वर्षे त्यांनी दूध व्यवसायही केला. मात्र मजूर मिळत नसल्याने त्यांना हा धंदा बंद करावा लागला. असे असले तरी प्रयोगातून शेती आणि दूध धंद्याच्या जोरावर तीन एकर जमीन खरेदी करता आली.
  • दोन विहिरी असून सर्व क्षेत्र ठिबकखाली आणले आहे.
  • रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर टाळला जातो. यापुढे संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घ्यायचा विचार आहे.
  • भविष्यात पॉलिहाउसमध्ये डच गुलाबाची लागवड करण्याचे त्यांचे नियोजन आहे.
  • गोमूत्राचा वापर फायद्याचा गुलाब, डाळिंबाला गोमूत्र, गाईचे शेण, बेसनपीठ, गुळापासून तयार केलेली स्लरी ठिबकद्वारे दिली जाते. तीन देशी गाई असल्यामुळे गोमूत्र आणि शेण घरच्याघरी उपलब्ध होते. ठिबकद्वारे शेण स्लरी, गोमूत्राची मात्रा दिली जाते. त्याचा उत्पादनवाढीला फायदा होत आहे. फुलांच्या संख्येत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. कीड-रोगाचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झाले आहे. डाळिंबाच्या छाटणीनंतर बुरशीचा प्रादुर्भाव होतो. मात्र, गोमूत्राच्या स्लरीचा वापर केला जात असल्यामुळे एकाही झाडाला बुरशीचा प्रादुर्भाव होत नसल्याचे पाटील सांगतात.   नियोजनातून फुलशेती केली तर ती फायद्याची ठरते. मी उच्चशिक्षण घेतलेले असले तरी त्याएेवजी शेतीला प्राधान्य देऊन शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्यावर भर देतो. बाजाराचा अभ्यास केल्यामुळे दराची माहिती मिळायला मदत झाली. मागणीचा विचार करून फुलशेतीत वाढ केली. हर्षल पाटील ः ९८२२९५५००२ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com