दुर्गम ‘उमराणी’त स्वयंपूर्ण शेती 

दुर्गम भागातही दररोज अॅग्रोवनचे वाचन धाकलसिंग यांचे सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. मात्र, ज्ञानाची आस त्यांनी कायमच आपल्यासोबत बाळगली. मागील पाच वर्षांपासून त्यांच्याकडे अॅग्रोवन दररोज सकाळीच पोचतो. उमराणी खुर्द हे अत्यंत दुर्गम, विरळ लोकवस्तीचे गाव आहे. तरीही शेतीतील प्रयोग, पूरक व्यवसाय, वनशेती आदींच्या दररोजच्या माहितीतून आपले ज्ञान समृद्ध करण्याचा प्रयत्न ते करतात. अॅग्रोवन सकाळी आला नाही, तर धडगावात जाऊन तो घेऊन आल्याशिवाय चैन पडत नाही, असेही धाकलसिंग यांनी सांगितले.
धाकलसिंग यांनी घराला लागणारे अन्न आपल्याच शेतात पिकवून शेती स्वयंपूर्ण केली आहे.
धाकलसिंग यांनी घराला लागणारे अन्न आपल्याच शेतात पिकवून शेती स्वयंपूर्ण केली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात दुर्गम धडगाव तालुक्‍यातील उमराणी खुर्द येथील धाकलसिंग काळू पावरा यांची तीन एकर शेती वृक्षराजीने संपन्न आहे. आंबे, पेरू, सीताफळ, मोहाची झाडे वर्षभर उत्पन्न देतात. भुईमूग, मका, भगर, ज्वारी, भाजीपाला पिकांतून त्यांनी शेती स्वयंपूर्ण केली. सक्षम बाजारपेठ मिळवली. कडकनाथ कोंबडीपालन हे त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य असून, त्यातूनही आर्थिक स्त्रोत भक्कम केला आहे. 

नंदुरबार शहरापासून सुमारे १५० किलोमीटरवर सातपुडा पर्वतात वसलेले छोटेसे निसर्गसंपन्न गाव म्हणून  उमराणी खुर्दची अोळख आहे. गावात ‘मोबाईल’ला रेंज नसते. येथील शेतकऱ्यांची जमीन उताराची, डोंगरमाथ्यावर आहे. खरीप हाच इथला मुख्य हंगाम. रब्बीत फारशी पिके नसतात. शेतांमधून कौलारू छपराची घरे दिसतात. अन्य कुटुंबांप्रमाणे गावातील धाकलसिंग काळू पावरा हेदेखील शेतातील घरातच पत्नी, मुलासोबत राहतात. त्यांची तीन एकर शेती. लालसर, पांढरी हलकी जमीन. एक जुनी विहीर आहे. तीन अश्‍वशक्तीचा पंप आहे. पण, कमी दाबाने वीज येते. रब्बीत अधिक पाण्याची पिके घेता येत नाहीत.  बाजारपेठेच्या मागणीनुसार फळबाग पद्धती  धाकलसिंग यांनी तीन एकरांत बाजारपेठेतील मागणीनुसार पीकपद्धतीची रचना केली आहे. पेरूची सुमारे ५०, आंब्याची १९, सीताफळाची ११, तर मोहाची नऊ झाडे आहेत. ही झाडे वर्षभर उत्पादन देतात. पावसाळा आटोपत असतानाच सीताफळे सुरू होतात. मग पेरू येतो. उन्हाळा जसा सुरू होतो, तशी मोहाची फुले येतात. तर, उन्हाळ्यात अगदी अखेरपर्यंत आंबे असतात.  शेतीत स्वयंपूर्णतः  उडीद, मूग, वरई, भुईमूग असे पारंपरिक बियाणे धाकलसिंग यांच्याकडे आहे. केवळ मका व ज्वारीचे बियाणे त्यांना विकत घ्यावे लागते. वनशेतीत तृणधान्याचे आंतरपीक घेतात. खते शक्यतो कोणती वापरत नाहीत. जे धान्य घरात लागते ते आपल्या शेतातच घेतले जाते. त्याबाबत ते स्वयंपूर्ण आहेत. अंबाडी, गिलके, दोडके आदी भाजीपालाही घरापुरता पिकविला जातो.  धडगावला विक्री पद्धत  धाकलसिंग यांनी जवळच आपल्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठ शोधली आहे. धडगाव हे त्यांच्या गावापासून एक किलोमीटरच्या अंतरावरच असल्याने येणे-जाणे तसे सोपे झाले आहे. फळे व मोहफुलांची विक्री याच बाजारात होते. बारमाही पैसा ही वनशेती देते. मोहफुले हंगामभर प्रतिझाड सुमारे ३० किलोपर्यंत मिळतात. दररोज पाच ते सहा किलो प्रमाणात त्यांची विक्री ५० रुपये प्रतिकिलो दराने होते. त्यांचा हंगाम एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत असतो. जी टोळंबी मोहाच्या झाडावर मिळते त्यापासून तेल तयार करण्यात येते.  आमचूर विक्री  नंदुरबार भागात आमचूर अत्यंत प्रसिद्ध आहे. धाकलसिंग यांची पत्नी व मुले आमचूर तयार करतात. त्याची विक्री स्थानिक व्यापाऱ्यांना होते. मजूर म्हणाल, तर वर्षभर फारशी गरज भासत नाही.  फळांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. स्वतः आठवडी बाजारात जाऊन थेट विक्री होते.  कडकनाथ कोंबडीपालन  एकीकडे शेतीत चांगली नियोजनबद्धता ठेवताना धाकलसिंग यांनी पूरक व्यवसायाचीही साथ घेतली आहे. कडकनाथ कोंबडीपालनाचे महत्त्व पटवून देण्याबरोबर नंदुरबार कृषी विज्ञान केंद्राने १३ लहान व तीन मोठे कोंबडेही उपलब्ध करून दिले. आजघडीला त्यांच्याकडे लहान- मोठ्या मिळून कोंबड्यांची संख्या १०० पर्यंत पोचली आहे. कोंबड्यांचे बंदिस्त पालन होते. काही प्रमाणात मुक्‍त संचार पद्धतीचाही वापर होतो. शेतात घरासमोर हा संचार असतो. घरातील महिला संगोपनावर अधिक लक्ष ठेवतात.  देशपातळीवर सुरू असलेल्या ‘निक्रा’ प्रकल्पांतर्गत दर वर्षी मानमोडी आजारासंबंधी मोफत लसीकरण केले जाते. बंदिस्त पद्धतीत प्रतिकोंबडी दररोज १०० ग्रॅम खाद्य लागते. हे खाद्य घरीच मका, ज्वारी, बाजरी आदींपासून तयार करण्यात येते. कोंबडी पालनासाठी फारसा खर्च येत नाही. घराच्या मागील बाजूलाच छोटे शेड तयार केले आहे. कृषी विज्ञान केंद्राचे (केव्हीके) विषय विशेषज्ज्ञ डॉ. महेश गणापुरे यांचे मार्गदर्शन धाकलसिंग यांना मिळते.  समाधानकारक उत्पन्न  कडनाथ कोंबड्यांना मागणीही चांगली आहे. एक जोडी ते १८०० रुपयांना विकतात. महिन्यात चार पक्ष्यांपर्यंत विक्री होते. अंडी आरोग्यदायी असल्याने ग्राहक घरी येऊनच खरेदी करतात. प्रतिअंड्याला ३० रुपये दर मिळतो. महिन्याला या व्यवसायातून आठ ते १० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. जे शेतीतील उत्पन्नाला आधार देते. मागील वर्षी केव्हीकेने साडेसतरा हजार रुपये मूल्याच्या कडकनाथ कोंबड्या खरेदी केल्या.  मुक्त पद्धतीचे कुक्कुटपालन  धाकलसिंग लवकरच मुक्त संचार कुक्कुटपालन सुरू करणार आहेत. त्यासाठी एक एकर शेत राखीव ठेवून त्याभोवती कुंपण करणार आहेत. मध्यंतरी वन्य प्राणी, कुत्रे यांनी काही कोंबड्यांवर हल्ला केला. त्या फस्त केल्या. यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र, चिकाटीने पूरक व्यवसायाची कास घट्ट धरली आहे. जोडीला एक म्हैस, गाय आहे. पिकांचे अवशेष, पालापाचोळा आदी घटक कुजविण्यासाठी कृषी विभागाच्या मदतीने घरानजीक सिमेंटचे चेंबर तयार केले आहे. कुजलेले खत शेतीत वापरतात. त्यामुळे मालाचा दर्जा सुधारत असल्याचे ते म्हणतात. रसायनमुक्त शेतीचे ते समर्थकही आहेत.  संपर्क- डॉ. महेश गणापुरे-७९७२७२९५६२  (विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com