agriculture story in marathi, silage, animal feed, undirgaon, shrirampur, nagar | Agrowon

दुष्काळात दोनशे टन मूरघास निर्मिती
सूर्यकांत नेटके
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

केवळ वीस गुंठे जमीन असतानाही दुग्ध व्यवसायात यशस्वी झालेल्या पवार यांची मूरघास तंत्रपद्धती मी प्रत्यक्ष पाहिली. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी चाराटंचाईवर मात करण्यासाठी अशा तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. 
पाशा पटेल, अध्यक्ष, कृषिमूल्य आयोग 

तीन भावांत मिळून शेती फक्त वीस गुंठे. पण तेवढ्यातच ४३ गायींचा सांभाळ. त्याआधारे दुग्ध व्यवसाय उभारून दुष्काळात अर्थकारणास दिलेली चालना. गायींसाठी चाऱ्याची शाश्‍वत सोय म्हणून कमी खर्चिक व सुलभ पद्धतीने खड्डा पद्धतीद्वारे मूरघास निर्मितीला चालना दिली. आज नऊ खड्ड्यांच्या आधारे तब्बल २०० टन मूरघास तयार करण्याची किमया उंदीरगाव (जि. नगर) येथील बाबासाहेब पवार यांनी घडवून समस्त शेतकऱ्यांपुढे आदर्श तयार केला आहे. 

अलीकडील काळात दुधाला दर मिळत नसल्याने शेतकरी हतबल आहेत. तरीही थेट विक्री, प्रक्रिया यासारखे मार्ग पत्करून व्यवसायात तगण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्रीरामपूर शहरापासून दहा किलोमीटरवर उंदीरगाव येथे बाबासाहेब, संदीप आणि सुरेश हे पवार बंधू राहतात. कुटुंबाची अवघी वीस गुंठे जमीन. साहजिकच आई-वडिलांनी मजुरी करून घरसंसार सावरला. तिघे भाऊ कर्ते झाल्यानंतर श्रीरामपूर येथे गाळा घेऊन १९९५ पासून धान्य विक्री व्यवसाय सुरू केला. ग्रामीण भागातून धान्य खरेदी करून विक्री व थेट धान्य पोच असे स्वरूप होते. त्यासाठी टेम्पोही घेतला. पण व्यवसायात पुढे उज्ज्वल भविष्य दिसेना. मग बदल करण्याचा निर्णय घेतला. 

दुग्ध व्यवसायात पाऊल 
क्षेत्र अर्धा एकरापर्यंतच असल्याने अनेक मर्यादा होत्या. तरीही भावंडांची उमेद मोठी होती. सन २००९ मध्ये विचारमंथनातून दुग्ध व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. दोन संकरीत (एचएफ) गायी खरेदी केल्या. धान्यविक्रीसाठीच्या जागेतच दुधाची विक्री सुरू केली. हळूहळू तिघा भावांनी जबाबदारी वाटून घेत एकमेकांच्या साथीने व्यवसाय वाढवला. तो स्थिर केला. 

आजचा व्यवसाय 

 • सुरवातीच्या दोन-तीन गायींपासून आज त्यांची संख्या ४३ पर्यंत. 
 • मुक्त गोठा पद्धत. 
 • जुन्या साहित्यातून कमी खर्चात गोठा उभारणी 
 • संकरीत गायींच्या वंशावळीचा पूर्ण अभ्यास. गोठ्यातील सर्व जनावरांचे रेकॉर्ड. 
 • दररोजचे एकूण दूध उत्पादन- २०० लिटर 
 • १०० ते १२५ लिटर दुधाची दररोज विक्री श्रीरामपूर येथे. ३८ रुपये प्रति लिटर दर. उर्वरित दुधाची विक्री डेअरीला. 
 • चौदा सदस्यांचे कुटुंब. आठ सदस्य दुग्ध व्यवसाय व गोठा व्यवस्थापनात कायम व्यस्त. 
 • एकीच्या बळावरच व्यवसायात भरभराट. दोन एकर शेती खरेदी. 
 • देशी गायी संगोपन व शेणापासून वीज निर्मितीचे आगामी नियोजन. 
 • भावंडांना आई कमलबाई यांचे मार्गदर्शन. 
 • जिल्हा परिषदेतर्फे भाऊसाहेब यांचा आदर्श गोपालक म्हणून गौरव. राज्यातील शेतकरी, अधिकाऱ्यांकडून व्यवसायाला भेटी. 

मूरघास तंत्रज्ञान ठरले फायद्याचे 
जनावरांची मोठी संख्या. त्यात दुष्काळात ती पोसायची तर चारा उपलब्धताही महत्त्वाची होती. भाऊसाहेब विविध ठिकाणी जाऊन यावर उपाय शोधायचे. एकदा श्रीरामपूर येथील खासगी डेअरीचे व्यवस्थापक सुधीर देवकाते यांनी मूरघास निर्मितीचे महत्त्व व कार्यपद्धतीचा आराखडा दिला. कमी खर्चिक व सुलभ मूरघास निर्मितीची गुरूकिल्लीच मिळाली. आज याच पद्धतीतून पवार यांनी स्वयंपूर्णतः मिळवली आहे. 

मूरघास निर्मिती- ठळक बाबी 

 • विविध क्षेत्रफळाचे नऊ खड्डे. उदा. २० बाय ७ फूट व सहा फूट खोल- १३ टन चारा क्षमता. 
 • ४७ बाय ११ बाय साडेनऊ फूट- ४८ टन चारा क्षमता. 
 • पहिल्याच प्रयत्नात मका, गळ, मीठ वापरून सुमारे ४५ दिवसांत ४५ टन मूरघास तयार करणारे भाऊसाहेब तालुक्‍यातील पहिलेच असावेत. 
 • सन २०१५ मध्ये तब्बल दोन वर्षे मुरघास खड्ड्यात दाब तत्त्वावर ठेवण्याचा यशस्वी प्रयोग. 
 • सध्या उपलब्ध मूरघास- सुमारे २०० टन. 
 • एक वर्ष पाऊस तर दोन वर्षे सलग दुष्काळाची अशी स्थिती. अशावेळी संपूर्ण जनावरांना हा चारा वर्षभर पुरू शकेल. 
 • हा आदर्श घेऊन परिसरातील अनेक शेतकरी मुरघास निर्मितीकडे. 
 • मूरघासाची पचनियता ९९ टक्के असल्याने त्यावर भर. 

खर्च येतो कमी 
काही शेतकरी मूरघासासाठी महागड्या पिशव्यांचा वापर करतात. मात्र भाऊसाहेब सांगतात की कमी जाडीच्या दीड हजार ते १८०० रुपयांच्या प्लॅस्टिकच्या वापरात पंचवीस टन चारा तयार होऊ शकतो. बाकी विशेष खर्च नाही. मूरघास तंत्रज्ञानामुळेच दुग्ध व्यवसाय टिकवता आल्याचेही ते सांगतात. 

शेणखत, बायोगॅस प्रकल्प 
वर्षाला एकूण २५ टनांपर्यंत शेणखत मिळते. घराच्या बाजूलाच दोन गुंठे मोकळ्या जागेत शेण पसरून त्यात गांडुळे सोडली आहेत. सहा रुपये प्रति किलो दराने त्याची विक्री होते. शेणापासून बायोगॅस प्रकल्पही सुरू केला आहे. त्यातून वर्षाला साधारण वीस हजार रुपयांच्या इंधनाची बचत होत असल्याचे भाऊसाहेबांनी सांगितले. 

कुट्टी यंत्राचा वापर 
पवार भावंडांपैकी संदीप हे जनावरांची देखभाल करण्याबरोबर परिसरातील शेतकऱ्यांना चारा कुट्टी करून देण्याचे काम करतात. सन २०१६ मध्ये एक लाख चाळीस हजार रुपये खर्च करून ट्रॅक्टरसह कुट्टी यंत्र खरेदी केले. दर तासाला ते सहा ते सात टन कुट्टी करते. अतिरिक्त उत्पन्नातून संसाराला हातभार लागतो. 

मुलांना शिक्षणाची संधी 
पवार परिवारात एकूण सात मुले-मुली आहेत. पवार भावंडांना परिस्थितीमुळे पूर्ण शिक्षण घेता आले नाही. मात्र नव्या पिढीला ही संधी उपलब्ध झाली आहे. एक मुलगी अभियांत्रिकेचे, दोघे महाविद्यालयीन, एक दहावी तर अन्य प्राथमिक शिक्षण घेत आहेत. 

संपर्क- भाऊसाहेब पवार- ९९७०९०६४४८ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले...सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत...
कापूस उत्पादकांना मिळाला उत्पादकता...‘महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन (सामाजिक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
जपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...
मराठवाड्यातील सोयगाव तालुक्यात रुजतोय...औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकरी...
दोनशे एकरांवर देशमुख यांची करार शेती..शिराळा (ता. जि. अमरावती) येथील विजय ऊर्फ मनोहर...
जिद्द दुष्काळातही गोड पेरू पिकवण्याची...पुणे जिल्ह्यात शिरूर या कायम दुष्काळी तालुक्यातील...
सुधारीत तंत्राने तरारला दर्जेदार भुईमूग तुळ्याचा पाडा (जि. पालघर) येथील आर्थिकदृष्ट्या...
पीकपद्धतीनूसार बहुविध यंत्रांचा...हंगामी व वार्षिक नगदी पिके व फळपिके अशा बहुविध...
शोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...
सुधारित तंत्र, नियोजनातून शेती केली...जळगाव जिल्ह्यात तापी काठालगतच्या चांगदेव (ता....
वातानुकुलित, स्वयंचलित सोळाहजार...पायाला अपंगत्व आल्यानंतरही हताश न होता जिद्दीने...
‘रेसिड्यू फ्री’ दर्जेदार सीताफळांचा...अवकाळी पाऊस, गारपिटीचा घातक अनुभव खामगाव (जि....
तीन हंगामात दर्जेदार कलिंगड उत्पादनात...रजाळे (ता.जि.नंदुरबार) येथील कैलास, संजय व नगराज...
संघर्षातून चौदा वर्षांपासून टिकविलेली...लातूर शहरापासून जवळच असलेल्या हरंगुळ बुद्रुक...
विकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...