लिंबूवर्गीय फळांच्या आंबटपणामागील स्रोत ओळखला

लिंबूवर्गीय फळांच्या आंबटपणाचे कारण शोधण्यात यश आले आहे.
लिंबूवर्गीय फळांच्या आंबटपणाचे कारण शोधण्यात यश आले आहे.

लिंबूवर्गीय फळांचे वैशिष्ट्य असलेल्या आंबटपणासाठी कारणीभूत जनुकाचा शोध कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील दोन संशोधकांनी घेतला आहे. त्याचे निष्कर्ष नेचर कम्युनिकेशन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. गेल्या हजारो वर्षांच्या पैदास प्रक्रियेतून आधुनिक लिंबूवर्गीय फळे विकसित होत गेली आहेत. त्यामध्ये आंबटपणा आणि गोडी यांचे विशिष्ट मिश्रण आहे. या फळांच्या गराचे विश्लेषण केले असता साखरेचे प्रमाण समान असतानाही त्यातील हायड्रोजन हा घटक यासाठी मुख्यत्वेकरून आंबटपणासाठी कारणीभूत असल्याचे दिसून येते. आंबट असलेल्या फळांच्या गरामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन भारीत कण आढळतात. त्यामुळे त्याचा सामू कमी होऊन आंबटपणा वाढतो. ही तीव्र आंबट जिभेच्या आम्लांसाठी संवेदनशील असलेल्या भागांना त्वरित झटक्याच्या स्वरुपात जाणवते. याच्या विरुद्ध गोड जातींमध्ये हायड्रोजन भारीत कण कमी असून, त्याची आम्लता कमी असते. नेदरलॅंड येथील अॅमस्टरडॅम विद्यापीठातील रोनाल्ड कोयेस आणि सहकाऱ्यांनी काही लिंबूवर्गीय फळांमध्ये आंबटपणाचे प्रमाण किंवा आम्लतेचे प्रमाण अधिक का असते, याचा अभ्यास केला आहे. आजवर यामागील नेमकी प्रक्रिया अज्ञात होती. या संशोधनाकडे वळण्याचे कारणही मजेशीर आहे. रोनाल्ड कोयेस यांच्या पूर्वीच्या पिट्यूनिया फुलांच्या अभ्यासामध्ये अधिक आम्लता असलेल्या जांभळ्या पिट्यूनिया फुलांमध्ये गडद रंग येत असल्याचे दिसून आले होते. असाच वेगळा प्रकार त्यांना लिंबाच्या फरीस या जातीसंदर्भात दिसला. या जातीच्या झाडांमध्ये एकाच फांदीवर आंबट आणि गोड अशा दोन्ही प्रकारची फळे आणि जांभळी छटा असलेली फुले लागत असल्याचे स्पष्ट झाले. पुढे कोयेस यांच्या गटाने कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील मायकेल रूज आणि क्लॅरी फेडेरिकी यांच्यासह संशोधनाला प्रारंभ केला. विद्यापीठातील लिंबूवर्गीय फळांच्या अनेक जातींचा अभ्यास केला. रुज आणि फेडेरिकी यांनी आंबट ते साखरेसारख्या गोड या चवीनुसार फरीस आणि २० अन्य जातींची निवड केली. पिट्यूनियातील आम्लतेचे नियंत्रण करणाऱ्या जनुकांच्या कार्याबद्दल कोयेस यांनी अभ्यास केला. त्यानंतर कोयेस यांनी लिंबूवर्गीय जनुकातील CitPH१ आणि CitPH५ ही दोन जनुके अधिक कार्यरत असल्यास आंबटपणा निर्माण करतात आणि आठवड्यातून एकदा कार्यान्वित झाल्यास गोडपणा निर्माण करत असल्याचे ओळखले. ही जनुके हायड्रोजन आयनला रसाच्या पेशींमधील पोकळीमध्ये वाहून नेणाऱ्या वाहक प्रथिनांना कार्यान्वित करतात, त्यामुळे एकूण आम्लतेमध्ये वाढ होते. पुढील टप्प्यामध्ये संशोधकांनी रसपेशीमध्ये CitPH१ आणि CitPH५ यांच्या पातळीचे नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांचे नियंत्रण केल्यास गोडी वाढत असल्याचे दिसून आले. कॅलिफोर्निया रिव्हरसाईड विद्यापीठातील जनुकशास्त्राचे प्रो. मायकेल रुज यांनी सांगितले, की फळांच्या पेशीमध्ये आम्लता निर्माण होण्याची यंत्रणा लक्षात आली असून, त्या संबंधित जनुकांवर लक्ष केंद्रित करत आहोत. ही जनुके CitPH१ आणि CitPH५ यांचे कार्यान्वित होणे कमी करू शकतात. परिणामी फळांची गोडी वाढवता येईल. अर्थात, या जनुकांचे तीव्र म्युटेशन केल्यास आम्लरहित लिंबूवर्गीय फळे तयार होतील, त्यातून त्यांची एक वैशिष्ट्यपूर्ण चव नष्ट होऊ शकते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com