agriculture story in marathi, strawberry farming, rajapur, ratnagiri | Agrowon

हापूस’च्या कोकणभूमीत लालचुटूक स्ट्रॉबेरी 
राजेंद्र बाईत 
शनिवार, 2 मार्च 2019

अभ्यासातून शेतकरी वळले स्ट्राॅबेरीकडे
रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाचा सर्व बाजूंनी अभ्यास केला. त्यातूनच सातारा, महाबळेश्‍वर, पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्य निवडक भागात प्रामुख्याने होणारे हे स्ट्रॉबेरीचे फळ आता कोकणच्या मातीतही आपले अस्तित्व दाखवू लागले आहे. 

निसर्गरम्य कोकणातील लाल मातीत हापूस आंबा, काजू यांच्यापाठोपाठ आता लालजर्द स्ट्रॉबेरीदेखील रुजणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. रत्नागिरी तालुक्यात राजापूर तालुक्यातील पळसुले-देसाई बंधू यांनी पाच गुंठ्यांत, तर सिद्धेश सागवेकर व दीपक चव्हाण यांनी प्रत्येकी एक गुंठ्यात या पिकाचे यंदा प्रयोग केले. फळांची चव, आकार, दर्जा अत्यंत उत्कृष्ट पिकवताना या शेतकऱ्यांनी या फळाचे स्थानिक मार्केटदेखील मिळवले आहे. कोकणातील शेतकऱ्याचे अर्थकारण उंचावण्याच्या दृष्टीने हे प्रयोग पथदर्शी म्हणायला हवेत. 
  
निसर्गरम्य कोकण म्हटलं, की स्वादयुक्त हापूस आंबा आणि उंच कातळावरील बागा डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहात नाहीत. याच कोकणभूमीतील शेतकरी आंबा, काजू, पालेभाज्या अशा नेहमीच्या पिकांव्यतिरिक्त या भागात आजपर्यंत फारशा न झालेल्या पिकांकडे वळण्याचे धाडस करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी पिकाचा सर्व बाजूंनी अभ्यास केला. त्यातूनच सातारा, महाबळेश्‍वर, पश्‍चिम महाराष्ट्रातील अन्य निवडक भागात प्रामुख्याने होणारे हे स्ट्रॉबेरीचे फळ आता कोकणच्या मातीतही आपले अस्तित्व दाखवू लागले आहे. 

पळसुले-देसाई बंधूंचा प्रयोग 
राजापूर तालुक्‍यातील रायपाटण येथील महेश व गजानन या पळसुले-देसाई बंधूंची ओशिवळे येथे कोकणबाग विदीशा गार्डन या नावाने सुमारे ८० एकर शेती आहे. महेश पूर्णवेळ शेती करतात, तर गजानन शिक्षक आहेत. आंबा, काजू व कोकणातील अन्य महत्त्वाची पिके ते घेत असतातच. त्यांनी मागील ऑक्टोबरमध्ये पाच गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला आहे. गजानन म्हणाले, की कोकणातील शेतकऱ्यांना आंबा, काजू, उन्हाळ्यातील पालेभाज्या यांच्यापेक्षा वेगळा पर्याय देण्याचा आमचा विचार होता, जेणेकरून त्यातून त्यांचे अर्थकारण उल्लेखनीयरीत्या उंचावेल. 

पळसुले-देसाई बंधूंची स्ट्रॉबेरी शेती 

 • पीक घेण्यापूर्वी माती परीक्षण केले. त्यातील अन्नद्रव्यांच्या कमतरता पाहून व्यवस्थापन सुरू केले. 
 • यू ट्यूबच्या माध्यमातून स्ट्रॉबेरी शेतीचे व्हिडिओ पाहिले. महाबळेश्‍वर येथे जाऊन शेती पाहिली. 
 • क्षेत्र- पाच गुंठे, यात पाच जाती- उदा. कामारोजा, एसी, आरटू, विंटर, नाबेला 
 • महाबळेश्‍वर भागातील अनुभवी स्ट्रॉबेरी उत्पादक संजय बावलेकर यांच्याकडून सर्व रोपे, खते, पनेट असे सर्व साहित्य आणले. 
 • एकूण आणलेली रोपे- २४००, त्यातील २३०० रोपे उत्पादन देत आहेत. 
 • दोन सऱ्यांत तीन फुटांचे अंतर. ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर. 
 • पाण्याचा स्रोत म्हणून शेताजवळून ओढा वाहतो. मोठी विहीरही आहे. 
 • मजुरांची कमतरता डोळ्यांसमोर ठेवून सऱ्यांमध्ये मल्चिंग पेपरचा वापर केला. सऱ्यांसह रोपांच्या बुंध्याजवळ तण वाढले नाही, त्यामुळे खुपरणी करावी लागली नाही. 
 • किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कडुनिंबयुक्त घटक, जंगलातील कडू वनस्पती असलेले कडू कारेटे, त्रिफळ आणि निरगुडी यांचा अर्क काढून त्यांची फवारणी केली. फळमाशीला अटकाव करण्यासाठी सापळा लावला. 

उत्पादनाचे प्रभावी मार्केटिंग 
प्रायोगिक तत्त्वावर घेतलेल्या या स्ट्रॉबेरीला पळसुले-देसाई बंधूंनी स्वतःच्या हिमतीवर स्थानिक बाजारपेठ तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. जनसंपर्क, व्हॉट्‍सॲप ग्रुप, बल्क मेसेजीस यांचा वापर करून आपली स्ट्रॉबेरी अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोचवली. साहजिकच थेट ग्राहक मिळाले. अनेकजण प्रत्यक्ष लागवड पाहण्यासाठी आले. यात २६ जानेवारीच्या दिवशीच सुमारे १८ पनेट्‍सची बांधावरच विक्री झाली. काही स्ट्रॉबेरी विक्रेत्यांच्या दुकानांवरही ठेवली. आत्तापर्यंत सुमारे १५० किलो स्ट्रॉबेरीची विक्री झाली आहे. अजून किमान दोन महिने तरी प्लॉट व विक्री सुरू राहील. मागणी मोठी असून माल तेवढा उपलब्ध नाही असे या बंधूंनी सांगितले. 

दर- प्रतिकिलो - ३०० रुपये, पनेट दर- ५० ते ६० रुपये. 

पीक अनुषंगाने हवामानाचा अभ्यास 
गजानन म्हणाले की आमची लाल माती, थंडी, उष्णता, तापमान आदींचा विचार करता स्ट्रॉबेरी चांगली फुलली आहे. कोकणात सकाळी बोचरी थंडी आणि हवेत गारवा असतो. जोडीला धुक्‍याची झालरही असते. दुपारी कडकडीत ऊन असते. हा सर्व तापमानातील बदल अभ्यासला. त्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवली. दोन थर्मामीटर्स खरेदी केले. पहिल्या काढणीच्या वेळी आंबट चव होती. मग डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील (दापोली) प्रा. दडेमल यांनी खतांविषयी मार्गदर्शन केले. त्यांच्याकडेही असे प्रयोग सुरू आहेत. सध्याची फळांची चव आंबटगोड व मधुर असून, ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. फळांचा आकार मोठा असून किलोत ८, ९ ते १३ पर्यंत फळे बसतात असल्याचे गजानन यांनी सांगितले. पुढील वर्षीही हा प्रयोग सुरू ठेवणार असल्याचे ते म्हणाले. 

सागवेकरांना मिळाली बांधावरच बाजारपेठ 
राजापूर तालुक्‍यातील खरवदे येथील सिद्धेश सागवेकर या तरुणाने देखील मागील ऑक्टोबरमध्ये प्रयोग म्हणून स्ट्रॉबेरीची लागवड केली. एक गुंठा क्षेत्रातील आत्तापर्यंत सव्वाशेहून अधिक किलो स्ट्रॉबेरीची विक्री करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. विक्रीसाठी बाजारपेठेचा शोध घेण्याऐवजी शेतावरच येऊन खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त होती. सहा वर्षांपासून विविध प्रकारची शेती करणाऱ्या चोवीसवर्षीय सिद्धेश यांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता प्रयोगशील शेतीची कास धरली. 

प्रयोगशील सिद्धेश 
दहावीमध्ये शिकत असताना मित्रांच्या साहाय्याने कलिंगडाची लागवड केली. पुढेही कलिंगड, कोबी आदी विविध पिके घेतली. सुवर्णकार हा पारंपरिक व्यवसाय सांभाळताना देशी गोपालनही केले आहे. शेतीत वडील सूर्यकांत सागवेकर, मोठे बंधू सुकुमार यांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन लाभते. त्यांच्या गावापासून काही किलोमीटर अंतरावरच त्यांचे दीपक चव्हाण हे शेतकरी मित्र राहतात, त्यांच्याशी चर्चा करताना स्ट्रॉबेरी लागवडीची कल्पना सुचली. आज दीपक यांनीदेखील एका गुंठ्यात स्ट्रॉबेरीचा प्रयोग केला असून, तो यशस्वी ठरल्याचे सिद्धेश म्हणाले. 

सिद्धेश यांची स्ट्रॉबेरी 

 • स्वीट चार्ली आणि विंटर डाउन या जातींची लागवड 
 • गादी वाफ्यांचा (बेड) तसेच मल्चिंग पेपरचाही वापर 
 • फळांची चव, गुणवत्ता चांगली. किलोला ३०० रुपये दराने विक्री. 

संपर्क - गजानन पळसुले देसाई - ७०८३००१६७५ 
सिद्धेश सागवेकर - ९३०९५४५१२७ 

 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधीनेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केटकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल)...
ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे...सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित...राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली...
जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम...जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही...
तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम...दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात...
मका पिकाला दुग्धव्यवसायाची जोड खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
विणकर महिलांच्या आयुष्याला पैठणीची...स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने 'आम्ही विणकर'...
वडिलांच्या अपंगत्वानंतर धडाडीने सावरली...लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना...
विकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...
दुर्गम गोंदियात एकात्‍मिक शेतीचा आदर्श भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया...
भूमिहीन मापारी यांची कोकणात कलिंगड शेती मुंबईतील ‘प्रेस’ चा व्यवसाय बंद करून सुरेश मापारी...
दुग्धव्यवसायाला हळद शेतीची जोडआजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच...