मधमाश्यांच्या प्रकारानुसार असते पोळ्याची रचना

व्यावसायिक मधमाशीपालन
व्यावसायिक मधमाशीपालन

मधमाश्यांच्या कुटुंबाचे विभाजन झाले, की त्यांची संख्या वाढते, त्यामुळे मधमाश्यांना नवीन घराची गरज भासू लागते. नवीन मधमाश्यांच्या कुटुंबाला पोळ्यामध्ये योग्य जागा लागते. यासाठी मधमाश्या नव्या जागेच्या शोधात परिसराचे सर्वेक्षण करतात. त्यांना हवी असलेली योग्य जागा सापडली, की मधमाश्या पोळे बांधायला सुरवात करतात .

मधमाश्यांच्या विविध जाती आहेत. त्यांच्यापैकी काही उघड्यावर, तर काही अंधारात राहतात. जवळून निरीक्षण केले तर मधमाश्यांचे पोळे हे जगातला उत्तम वास्तुशास्त्राचा नमुना असल्याचे लक्षात येईल. ७ ते ९ मेणाची पोळी वरच्या आधाराने उभी लटकलेली असतात. शेजारशेजारच्या समांतर पोळ्यांमध्ये ठराविक अंतर सोडलेलेच असते. त्या जागेतून किमान दोन मधमाश्या एकाच वेळी सहज जा-ये करू शकतात. या अंतराला माशी अंतर (Been Space) असे म्हणतात.

मध पोळ्याची रचना

  • पोळ्याची लांबी साधारण ३० ते ४० सें.मी. असते, तर रुंदी १५ ते ३० सेंमी असते. पोळी षटकोनी घराची बनलेली असतात.
  • प्रत्येक बाजूला घराचा एक पदर असतो आणि ते पदर मध्याला एकमेकाला चिकटलेले असतात. म्हणजे दोन्ही बाजूला उघडणाऱ्या घरांचा एक पदरच असतो आणि ते पदर एकमेकांना चिकटवलेले असतात.
  • दोन्ही बाजूला उघडणाऱ्या तोंडाच्या घरांचे तळ मध्यभागी पाठीला पाठ लावून असतात. तळाची रचना लोलकच्या एका बाजूसारखी असते. बाजूची उघडी तोंडे किंचित वर कललेली असतात.
  • विशेषतः पोळ्याच्या वरच्या बाजूला असलेल्या मधसाठ्याच्या घरांमध्ये हे विशेषत्वाने दिसते, त्यामुळे मध खाली ओघळत नाही.
  • अळ्यांच्या संगोपनासाठी असलेल्या घरांमधूनही त्यांना भरवण्यात येणारे द्रव अन्न म्हणजेच मकरंद वा मधुरस बाहेर येत नाही.
  • पोळ्याचे प्रकार

  • पोळ्यातील घरांचे तीन प्रकार आहेत. लहान आकाराची ४.५ ते ५ मि.मी. रुंदीची षटकोनी घरं कामकरी अळ्यांच्या संगोपनासाठी असतात.
  • पोळ्याच्या खालच्या अंगाला बांधलेली दुसरी मोठी ६ ते ७ मि.मी. रुंदीची षटकोनी घरं नरसंगोपनासाठी असतात. मात्र, ती फक्त नरपैदाशीच्या म्हणजेच फुलोऱ्याच्या हंगामातच बांधली जातात. अर्थात, वेळप्रसंगी या दोन्ही घरांत मधही साठविला जातो; पण मधसाठ्यासाठी मुख्यतः पोळ्याचा वरचा २ ते ३ सें.मी. भाग वापरला जातो.
  • पोळ्याच्या वरच्या दोन्ही कोपऱ्यांत मधसाठ्याखाली परागकण साठविले जातात, त्यासाठीसुद्धा षटकोनी घरे असतात.
  • फुलोऱ्याचा बहर चांगला असेल आणि मकरंद व परागकणांचा ओघ खूप असला, तर पोळ्याच्या कडेच्या संपूर्ण पोळ्याचा उपयोग फक्त मध वा परागकण किंवा दोन्हीसाठीच केला जातो, त्यात शिशुसंगोपन त्या काळात होत नाही.
  • एपिस मेलीफेरा या माश्‍यांत मधमाश्यांच्या कुटुंबात ३० ते २० सें.मी. आकाराच्या मधसाठवणीच्या एका पोळ्यात पूर्ण भरल्यास साधारणतः २ ते ३ किलो मध असतो. याशिवाय सगळ्याच पोळ्यांवर बसलेल्या माश्‍यांचे व पिलाण्याचे वजन त्या नाजूक पोळ्यांना पेलावं लागतं.
  • या प्रकाराशिवाय घरांचा तिसरा एक प्रकार आढळतो. अर्थात, तो नेहमीच्या पोळ्याचा भाग नसतो. ही घरं म्हणजे राणीघरं. अशी खास बांधलेली सुमारे १० ते १२ घरं फक्त विणीच्या हंगामात किंवा राणी अचानक अकार्यक्षम झाली तरच बांधली जातात.
  • पैकी विणीच्या हंगामात बांधलेली घरं पोळ्याच्या खालच्या कडेला असतात. अर्थात, आपत्कालीन घरं कामकरी शिशुसंगोपन भागात मुद्दाम बांधली जातात. कारण सामान्य परिस्थितीत राणी खास बांधलेल्या नेहमीच्या घरात अंडी घालू शकते; पण आपत्कालात अशी अंडी घालायला कार्यक्षम राणीच नसते. म्हणून तिने पूर्वी घातलेल्या अंड्यांतून जन्मलेल्या कामकरी अळ्यांपासूनच राणीची पैदास करायची असते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com