नोकरीपेक्षा शेतीच यशस्वी करण्याचा ध्यास

संदीप व अविनाश हे भागवत बंधू.
संदीप व अविनाश हे भागवत बंधू.

एरंडगाव (ता. शेवगाव, जि. नगर) येथील संदीप प्रभाकर भागवत यांनी काही काळ खासगी कारखान्यात नोकरी केली. मात्र नोकरीपेक्षाही शेतीतूनच अधिक उत्पन्न मिळवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. शेतीला भांडवल उभे करण्यासाठी सुरवातीला काही वर्षे दुग्धव्यवसाय सुरू केला. भाऊ अविनाश यांच्या मदतीने पडीक शेती वहिती करत डाळिंब आणि उसाची लागवड केली.  आज हीच दोन मुख्य पिके त्यांच्या शेतीचे मुख्य आधार बनले आहेत.  न गर जिल्ह्यात शेवगाव तालुक्‍याच्या उत्तर भागातील गावांना जायकवाडी मध्यम प्रकल्पाच्या पाण्याचा आधार आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी ऊस घेतात. एरंडगाव (ता. शेवगाव) येथील संदीप आणि अविनाश हे दोघे भागवत बंधू आपली २४ एकर शेती सांभाळतात.  संदीप यांनी दहावीनंतर ‘आयटीआय’चे प्रशिक्षण घेतले. आजोबा किसन बाजीराव भागवत हे जुन्या पिढीतील प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षक. त्यामुळे शेतीकडे लक्ष द्यायला त्यांना तुलनेने वेळ कमी मिळे. बाजरी, ज्वारी, तूर अशी पिके घेतली जायची. अर्ध्याहून अधिक शेती पडीक होती. संजय यांनी पडीक शेतीला वहिती केले. पाणी उपलब्धतेसाठी तीन विहिरी आहेत. शिवाय जायकवाडी प्रकल्पातून दोन पाइपलाइन केल्या आहेत. नोकरीपेक्षा शेती भली  संदीप १९९८ मध्ये ‘आयटीआय’मधून इलेक्‍ट्रीशियन झाले. त्यानंतर नगर ‘एमआयडीसीमध्ये खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली. दोन वर्षे तेथे काम केले. मात्र नोकरीपेक्षाही गावची आणि शेतीची अोढ अधिक होती. शिवाय शेतीत चांगले करिअर केले तर नोकरीपेक्षा चांगले उत्पन्न मिळण्याची संधी होती. अखेर २००३ मध्ये नोकरी सोडून ते गावी परतले. क्षेत्र बरेच असले तरी हलक्‍या प्रतीची आणि ओबडधोबड जमीन होती. ती पिकाऊ करण्यासाठी पुरेसे भांडवल नव्हते. मग २००६ मध्ये सात गायी  घेऊन दुग्धव्यवसाय सुरू केला. तो दोन वर्षे जोपासला. त्या काळात जवळपास शंभर लिटर दूध संकलित व्हायचे. पुढे खर्च, मजूरबळ आदी समस्या वाढल्या. अखेर व्यवसाय बंद करत गायींची केली. त्यातून साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळाले. त्यातून २००८ मध्ये जुना टॅंकर खरेदी केला. दोन वर्षांनी त्याची विक्री करून नवा ट्रॅक्‍टर खरेदी केला.  पीक पद्धती विकसित केली  पूर्वी अवघ्या तीन एकर क्षेत्रावरच पिके घेतली जात. उर्वरित क्षेत्र पडीकच होते. संदीप आणि अविनाश यांनी शेतीची सूत्रे २००८ मध्ये हाती घेतली. सध्या ऊस व डाळिंब अशी दोन पिके त्यांनी निश्चित केली आहेत. आठ एकर डाळिंब; तर १२ एकरांवर ऊस आहे. सुरवातीला तीन एकर उसाची लागवड केली. टप्प्याटप्प्याने क्षेत्र वाढवले. जोड अोळ पद्धतीचा ऊस आहेच. शिवाय पट्टा पद्धतीनेही लागवड सुरू केली. सध्या तीन एकर जोड अोळ; तर नऊ एकर पाच फूट सरी पद्धतीची लागवड आहे. सुमारे सात एकर क्षेत्रावर ठिबक आहे. सुरवातीला एकरी २५ ते ३० टन  उत्पादन मिळायचे. आता ते ४५ ते ५५ टनांपर्यंत मिळते. पाण्याचे नियोजन आणि शेणखताचा वापर हे दोन मुख्य बदल केले आहेत.  टप्प्याटप्प्याने डाळिंब लागवड 

  •    जायकवाडी प्रकल्पामुळे पुरेसे पाणी उपलब्ध असलेल्या एरंडगाव परिसरात बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेतात. या शिवारात केवळ एकाकडे एक एकर डाळिंब होते. मात्र काही कारणामुळे ते यशस्वी होऊ शकले नाही.
  •    भागवत बंधूंनी उसाबाबत डाळिंब लागवडीचा निश्‍चय केला. त्यासाठी पाच सहकाऱ्यांना घेऊन डाळिंब शेतीतील सल्लागारांचे मार्गदर्शन घेतले.
  •    तीन लाख खर्च करून जमीन चांगली बनवली. सन २०११ मध्ये अडीच एकरांवर भगवा डाळिंबाची लागवड केली. अडीत एकरांत पहिले उत्पादन आठ टन मिळाले. 
  •    विक्री व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता. मात्र अभ्यास करून राहाता बाजार समितीत विक्री केली.
  •    सन २०१३ मध्ये पुन्हा अडीच एकरांवर डाळिंब लावले. चाळीस रुपये प्रतिकिलो दराने राहात्यातील व्यापाऱ्यांनी जागेवरूनच खरेदी केली.
  •    आत्मविश्‍वास वाढल्याने पुन्हा २०१५ मध्ये तीन एकरांवर लागवड केली.  
  •    यंदा आठ एकरांत ६८ टन उत्पादन मिळाले आहे. ए प्रतिच्या उत्पादनाला ३८ रुपये प्रतिकिलो दर मिळाला. मात्र सध्या किलोला २० ते २५ रुपये एवढाच दर सुरू असल्याचे संदीप यांनी सांगितले.
  • बहर धरण्यात केला बदल सुरवातीच्या काळात हस्तबहर धरला जायचा. फळे मार्च-एप्रिलमध्ये विक्रीस यायची. आता आंबेबहर धरण्यात येतो. जुलै-ऑगस्टमध्ये डाळिंबे विक्रीस येतात. या हंगामात मागणी तुलनेने चांगली असल्याने दर बऱ्यापैकी मिळतो, असा संदीप यांचा अनुभव आहे.   व्यवस्थापनातील मुद्दे 

  •    घरातील सुमारे सहा सदस्य शेतीत राबतात. त्यामुळे मजूरबळ व त्यावरील खर्चात बचत केली आहे.                      
  •    डाळिंबाच्या प्रति झाडाला दहा किलो शेणखत, एक किलो निंबोळीपेंडीचा वर्षातून एकदा वापर 
  •    एरडंगाव परिसरात मुबलक पाणी उपलब्ध असले तरी सर्व आठ एकराला ठिबकचा वापर
  •    उन्हाळ्यात पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे वाहतात. यामुळे पश्‍चिम व दक्षिण बाजूकडे पाण्याचे बाष्पीभवन होण्याचे प्रमाण जास्त असते. याच काळात झाडाला फळे लागतात. त्यामुळे झाडाला पाणी कमी पडू नये व पुरेसे पाणी नियोजन यासाठी डबल लॅटरल पद्धतीचा वापर केला आहे. 
  •    रानडुकरांचा त्रास टाळण्यासाठी जागोजागी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर केला आहे.  संपर्क  : संदीप भागवत, ९८८१०८११८२,  : अविनाश भागवत-९८८१६८२३५६
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com