डाळिंब पिकातील अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे

जमिनीचा प्रकार आणि आरोग्य यानूसार डाळिंब बागेत संतुलित खत नियोजन करावे.
जमिनीचा प्रकार आणि आरोग्य यानूसार डाळिंब बागेत संतुलित खत नियोजन करावे.

डाळिंबाचे उत्पादनक्षम आयुष्य हे जमिनीच्या प्रकारावर आणि आरोग्यावर अवलंबून असते. माती परीक्षणानंतर योग्य जमिनीची निवड करून पुढील काळामध्ये संतुलित खत नियोजन करावे. त्यासाठी डाळिंब पिकामध्ये अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे जाणून वेळेवर त्यांची पूर्तता करावी. प्रामुख्याने हलक्या किंवा बरड जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या आणि अन्नद्रव्ये मिळविण्याच्या दृष्टीने मुबलक सेंद्रिय, जैविक व हिरवळीच्या खतांचा वापर केला पाहिजे.   डाळिंबाची लागवड विशेषतः हलक्या, बरड, खडकाळ जमिनीवर करण्यात येते. अशा जमिनींची ओलावा व अन्नद्रव्ये धरून ठेवण्याची क्षमताही कमी असते. अशा जमिनीत डाळिंब पिकासाठी योग्य व संतुलित प्रमाणात अन्नद्रव्ये देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी प्रथम मातीचे परीक्षण करून घ्यावे. त्यातून जमिनीची सुपीकता पातळी आणि जमीन डाळिंब पिकास योग्य आहे की नाही, हे समजते. त्याचबरोबर झाडांमध्ये अन्नद्रव्यांचे प्रमाण किती आहे, हे समजून घेण्यासाठी पानांचे पृथःकरण करून घ्यावे. डाळिंबाला आवश्यक अन्नद्रव्यांच्या कमतरतेच्या लक्षणाप्रमाणे किंवा पानांमधील प्रमाण प्रयोगशाळेत तपासले जाते. त्यासाठी फांदीमधून वरून आठव्या जोडीतील नुकतेच पक्व झालेली पाने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावीत. त्यानुसार उपाययोजना ठरवणे सोपे जाते. ज्या ठिकाणी माती व पाने परीक्षणाची व्यवस्था उपलब्ध नाही, अशा ठिकाणी झाडांच्या पानांवरून अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे आवश्यक ठरते. सातत्याच्या प्रयत्नातून सरावाने आणि अनुभवाने अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे ओळखणे शेतकऱ्यांना शक्य होते. त्यासाठी अन्नद्रव्यांचे वनस्पतीतील कार्य आणि त्या अन्नद्रव्याची कमतरता असताना दिसणारी लक्षणे याविषयीची माहिती उपयुक्त ठरते. डाळिंबातील खत व्यवस्थापन : अ. जमिनीतून : ताण संपल्यानंतर बहाराच्या वेळी (पहिले पाणी देण्यापूर्वी) नवीन फूट/फूलकळी निघण्याची अवस्था ३० ते ३५ दिवसापर्यंत डाळिंबास शिफारस खत मात्रा ६२५:२५०:२५० नत्र: स्फुरद: पालाश + ५० किलो शेणखत + २ किलो निंबोळी पेंड प्रति झाड आहे. या शिफारस खत मात्रेच्या ५० % नत्र, ४०% स्फुरद व ४०% पालाश जमिनीतून द्यावे. ही अन्नद्रव्ये युरिया + सिंगल सुपर फोस्फेट + म्युरेट ऑफ पोटाश इ. रासायनिक खताद्वारे जमिनीतून द्यावीत आणि त्यानंतर उरलेल्या खताचे नियोजन ठिबकद्वारे करावे. ब. ठिबक सिंचनाद्वारे :

  • फलधारणा अवस्था (३५ ते ७० दिवसांपर्यंत) : ठिबक सिंचनाद्वारे ३० % नत्र, ३० % स्फुरद, १० % पालाश ही अन्नद्रव्ये १२:६१:००, १९:१९:१९, १७:४४:००, पांढरे पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड नं. २ इ. रासायनिक विद्राव्य खतांद्वारे द्यावीत.
  • फळवाढीची अवस्था (७० ते १२० दिवसापर्यंत) : ठिबक सिंचनाद्वारे २० % नत्र, २० % स्फुरद, २० % पालाश ही अन्नद्रव्ये १९:१९:१९, युरिया + ००:५२:३४, कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट इ. खतांद्वारे द्यावीत.
  • फळ पक्वता अवस्था (१२० दिवसानंतर) : ठिबक सिंचनाद्वारे १० % स्फुरद, ३० % पालाश ही अन्नद्रव्ये ००:५२:३४, सल्फेट ऑफ पोटॅश इ. रासायनिक खतांद्वारे द्यावीत.
  • मुख्य अन्नद्रव्यांचे कार्य व कमतरतेची लक्षणे : १) नत्र कार्य : छाटणीनंतर डोळेफुटीसाठी तसेच फुटीची व पानांची एकसारखी वाढ होण्यासाठी हरितद्रव्ये व प्रथिने निर्मितीसाठी फळांमध्ये रसाचे प्रमाण वाढण्यासाठी कमतरतेची लक्षणे :-

  • झाडाच्या फांदीवरील परिपक्व, जुने झालेली पाने पूर्णपणे पिवळी पडतात.
  • पूर्ण पिवळी पडलेली पाने दुमडतात व त्यामुळे पानांचे तुकडे होतात.
  • जास्त प्रमाणात नत्राची कमतरता असल्यास पिवळ्या पडलेल्या पानांची टोके वाळतात.
  • हरितद्रव्यांच्या कमतरतेमुळे प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंद होते. झाड पूर्णपणे पिवळे पडून वाढ खुंटते.
  • २) स्फुरद कार्य :

  • मुळ्यांची वाढ चांगली होण्यासाठी.
  • काडीमध्ये फळधारणा चांगली होण्यास मदत होते.
  • फळांचा आकार मोठा होण्यासाठी.
  • कमतरतेची लक्षणे :-

  • पानाची टोके पिवळी पडतात.
  • फळांची संख्या कमी, फळ गळ वाढते.
  • फुलोरा कमी निघतो व फळधारणा चांगली होत नाही.
  • पाने लंबगोलाकार होतात. पानांची रुंदी कमी होऊन आकाराने लहानच राहतात.
  • स्फुरदाची कमतरता जास्त प्रमाणात असल्यास पाने पिवळी पडल्यावर गडद तांबूस होतात.
  • स्फुरदाचा जास्त अतिरेक झाल्यास जस्ताची कमतरता येते.
  • ३) पालाश कार्य :

  • फळांचा रंग, चव, वजन व गुणवत्ता वाढते.
  • फळाचा टिकावूपणा, चकाकी वाढते.
  • झाडांची रोग व कीड प्रतिकारशक्ती वाढते.
  • प्रतिकूल हवामानाशी झगडण्याची ताकद वाढते.
  • पाने बाहेरील बाजूस दुमडतात.
  • जुनी व पिवळी पाने कडांकडून मध्य शिरेकडे पिवळी होत जातात व वाळतात.
  • फळे योग्य गुणवत्तेची तयार होत नाहीत.
  • झाडे विविध रोगास सहजासहजी बळी पडतात.
  • ब. दुय्यम अन्नद्रव्ये १) कॅल्शियम कार्य :

  • पेशीभित्तीका निर्मिती व पेशीविभाजनास मदत करते.
  • फळाची फुगवन, टिकावूपणा व गराचे प्रमाण वाढते.
  • पानांचा आकार लहान होऊन गुच्छासारखे दिसतात.
  • पानांच्या शिरांतर्गत भाग पानांच्या टोकाकडून व कडांकडून मध्य शिरेकडे पिवळा पडत जातो.
  • सुरुवातीला शिरा हिरव्या राहतात व नंतर पिवळ्या पडतात.
  • पाने टोकाकडून पिवळी पडतात. तसेच पानांच्या देठाकडील पिवळा भाग गुलाबी छटा दाखवतो.
  • कमतरता जास्त प्रमाणात असल्यास, पानांचा भाग गडद विटकरी रंगाचा होतो व टोकाकडून अर्धे पान वाळते.
  • अति प्रमाणात फूलगळ होणे किंवा सेटिंग न होणे अशी लक्षणे दिसतात.
  • २) मॅग्नेशियम कार्य :

  • हरितद्रव्यातील प्रमुख घटक (पानांना हिरवा रंग).
  • चयापचय क्रियेमध्ये लागणाऱ्या संप्रेरकांना चालना मिळते.
  • कमतरतेची लक्षणे :- पानांच्या शिरा व कडा टोकाकडून पिवळसर होत जातात. कमतरता जास्त प्रमाणात असल्यास पाने वाळतात व नंतर राखाडी होतात. ३) गंधक कार्य :

  • फळांमध्ये साखर भरण्यासाठी व गुणवत्ता वाढविण्यासाठी.
  • फळाचा टिकावूपणा वाढवण्यासाठी मदत.
  • कमतरतेची लक्षणे :-

  • नवीन पानांच्या शिरा पिवळसर दिसतात.
  • मध्य शिरेजवळ पिवळेपणा सुरू होऊन पूर्ण पान पिवळे दिसते.
  • पानांचा पिवळेपणा नत्राच्या कमतरतेच्या पिवळेपणापेक्षा कमी प्रमाणात असतो.
  • झाडावरती बुरशीयुक्त रोगांचे प्रमाण वाढते.
  • डाळिंबातील अन्नद्रव्ये कमतरतेची लक्षणे ओळखण्यातील अडचणी :

  • डाळिंब पीक हे अन्नद्रव्य कमतरतांसाठी अतिसंवेदनशील नाही. डाळिंब पिकात अन्नद्रव्यांच्या कमतरता लवकर दिसून येत नाहीत.
  • अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांच्या शरीरक्रियांमध्ये विपरीत बदल घडून उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी डाळिंब व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय, जैविक व हिरवळीच्या खतांचा वापर करावा. जमीन सशक्त करण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
  • डॉ. अनिल दुरगुडे : ९४२०००७७३१ प्रकाश तापकीर : ९४२१८३७१८६ (मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com