शेळ्या-मेंढ्यांमधील गर्भाशयाच्या आजाराची लक्षणे

वेळोवेळी कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी.
वेळोवेळी कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांच्या रक्ताची तपासणी करून घ्यावी.

जनावरांना विशेषतः शेळ्या-मेंढ्यांना गर्भाशयाचे आजार झाल्याचे खूप उशिरा लक्षात येते आणि तोपर्यंत आजार वाढत जातो. या आजारांमुळे गर्भपात, वंध्यत्व तसेच दूध उत्पादनात घट होते. त्यामुळे लक्षणे दिसून येताच पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत. १) सांसर्गिक गर्भपात

  • शेळ्या-मेंढ्यांमध्ये निसर्गत करडू-कोकरू जन्माला येण्याच्या अगोदर मृत अवस्थेत गर्भाशयाबाहेर टाकणे यास गर्भपात म्हणतात. गर्भपात होण्याची विविध कारणे आहेत. त्यात सांसर्गिक व असांसर्गिक कारणे आहेत.
  • सांसर्गिक गर्भपात ब्रुसेला मेलेटेन्सीस व ओवीस या जीवाणूमुळे होतो. हा आजार शेळ्या-मेंढ्यांप्रमाणे इतर जनावरांमध्येही आढळतो.
  • या रोगाची लागण जास्त करून शेळी-मेंढीच्या जननेंद्रियांची परिपक्व वाढ झाल्यानंतर होते.
  • शेळ्या-मेंढ्यांपासून माणसाला व माणसांपासून शेळ्या-मेंढ्यांनासुद्धा या रोगाची लागण होते. हा रोग रेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या नरालादेखील होतो.
  • या रोगामुळे गर्भपात, वंध्यत्व तसेच दूध उत्पादनात घट होते. हा रोग मुख्यत्वे करून शेळ्या-मेंढ्यांच्या योनीद्वारे होणाऱ्या स्रावाद्वारे पसरतो.
  • या स्रावाचा संबंध निरोगी शेळ्या-मेंढ्यांच्या खाद्याशी आल्यास, तसेच अशा शेळ्या-मेंढ्यांचे दूध, मूत्र, उघड्या जखमा व उघड्या डोळ्यांतूनसुद्धा या रोगाचे जीवाणू दुसऱ्या शेळी-मेंढीच्या शरीरात शिरकाव करतात.
  • शेळ्या-मेंढ्यांमध्ये महत्त्वाचे लक्षण म्हणजे चौथ्या महिन्यात गाभडणे तसेच सांधेदुखी, पाय लंगडणे, कासदाह, वार न पडणे, अर्धवट वाढ झालेले करडू-कोकरू जन्मते, ताप येणे, भूक मंदावते, नरांमध्ये अंडाशयाचा दाह होणे व शुक्रबीज अपुरे तयार होणे इ. लक्षणे देखील आढळतात.
  • उपचार शेळ्या-मेंढ्यांमध्ये वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास त्वरीत तज्ज्ञ पशुवैद्यकडून औषधोपचार करावेत. प्रतिबंधात्मक उपाय

  • पशुवैद्यकाकडून लसीकरण करून घ्यावे.
  • वर्षातून एकदा गावातील किंवा कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांच्या रक्ताची तपासणी करून या रोगाची लागण झालेल्या शेळ्या-मेंढ्या वेगळ्या कराव्यात.
  • प्रसुतीच्या काळात शेळ्या-मेंढ्यांचा गोठा व शेळ्या-मेंढ्या स्वच्छ ठेवाव्यात किंवा गोठ्यात जंतुनाशक औषध फवारून गोठा निर्जंतुक करावा.
  • प्रजननाच्या हंगामापूर्वी व कळपात आणलेल्या नवीन शेळ्या-मेंढ्यांमध्ये हा रोग नसल्याची खात्री करण्यासाठी प्रयोगशाळेतून चाचणी करून घ्यावी.
  • -या रोगाची लागण असलेल्या शेळ्या-मेंढ्या, गर्भपात झालेल्या करडांचे-कोकरांचे शव, वार व गर्भाशयातील स्राव यांची विल्हेवाट गावाबाहेर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य रीतीने लावावी.
  • २) मायांग बाहेर येणे

  • शेळी-मेंढीचे मायांग हे प्रसूतीपूर्व किंवा प्रसूतीनंतर बाहेर येऊ शकते, प्रसूतीनंतर मायांग बाहेर येण्याचे प्रमाण जास्त आहे. प्रसूतीनंतर वार अडकल्यामुळे शेळी-मेंढी कळा देऊन वार बाहेर काढण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे मायांग बाहेर येऊ शकते. प्रोजेस्टेरॉन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे किंवा इस्ट्रोजन हे संप्रेरक असलेला चारा खाल्ल्यास कॅल्शिअम व स्फुरद या क्षाराची कमतरता असणे, योनी मार्गातून गर्भाशयात जंतूचा संसर्ग होणे, शेळी-मेंढी अडलेली असल्यास किंवा गर्भाशयाला इजा होणे, हगवण लागणे इ. कारणामुळेदेखील मायांग बाहेर येऊ शकते.
  • मायांग बाहेर येणे, हा दोष जन्मजात असू शकतो. गाभण काळाच्या शेवटच्या महिन्यात जर शेळी-मेंढी खाली बसली तर गर्भाशयाची पिशवी बाहेर येणे, बाहेर आलेल्या मायांगास धूळ, कचरा लागून ते काही वेळात काळपट किंवा रक्ताळल्यासारखे दिसते.
  • उपचार

  • मायांग बाहेर आल्यास ते मधे ढकलण्याचा प्रयत्न करू नये. पशुवैद्यकाला बोलवावे.
  • पशुवैद्यक येईपर्यंत खबरदारीचे उपाय म्हणून शेळी-मेंढीस स्वच्छ जागेत अशा पद्धतीने बांधावे, की तिचे तोंड उताराच्या बाजूला व मागचा भाग चढावर असावा.
  • पोटॅशिअम परमॅंगनेटच्या द्रावणाच्या साहाय्याने मायांग व्यवस्थित धुऊन काढावे व त्यावर थंडपाणी टाकत राहावे किंवा बर्फ लावाला. त्यामुळे मायांग अाकुंचन पावण्यास मदत होते.
  • बाहेर आलेल्या मायांगास इजा होणार नाही किंवा कावळे व इतर पक्षी टोच्या मारणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • प्रतिबंधात्मक उपाय

  • गाभण शेळी-मेंढीस प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर दररोज नियमितपणे ८-१५ ग्रॅम खनिज मिश्रण द्यावे.
  • प्रसूतीनंतर वार अडकल्यास पशुवैद्यकाच्या साहाय्याने उपचार करावेत.
  • काही शेळ्या-मेंढ्यांमध्ये मायांग बाहेर येण्याचे प्रमाण वारंवार असेल, तर अशा शेळ्या-मेंढ्यांना गाभणकाळात पशुवैद्यकाच्या साहाय्याने उपचार करावे.
  • संपर्क ः डॉ. प्रशांत माने, ८३७९९३०९९३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com