'पाणी अडवा, पाणी जिरवा’ कृतीत ठेवले सातत्य..

दुष्काळात उत्तम कलिंगड पीक पाणी उपलब्धता झाल्याने मालू यांनी माहिम जातीच्या आल्याची लागवड केली. आज पाहात राहावे असे पीक आहे. कलिंगडाचेही सुमारे २० टन एकरी उत्पादन अपेक्षित आहे
हरिकिशन मालू यांनी पाणी संवर्धनाचे मार्ग अवलंबून दुष्काळात कलिंगड फुलवले.
हरिकिशन मालू यांनी पाणी संवर्धनाचे मार्ग अवलंबून दुष्काळात कलिंगड फुलवले.

सध्या दुष्काळाच्या झळा राज्यातील शेतकरी सोसताहेत. अनेकजण आपापल्यापरिने पाण्याची उपलब्धता करण्याचा प्रयत्न करीत आहेत. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्‍यातील भूकंपग्रस्त किल्लारी जवळच्या तळणी गावचे साठी ओलांडलेले हरिकिशन रंगलाल मालू यांनी देखील यंदा पाण्याच्या काटेकोर व्यवस्थापनाच्या जोरावर ३३ एकर ऊस, प्रत्येकी साडेपाच एकर आले व कलिंगड पीक घेतले आहे. दुष्काळात असताना आणि त्याचबरोबर चांगला पाऊस झालेला असताना अशा दोन्ही वेळेत पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली आहे.  मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद हे जिल्हे आता कायमस्वरूपी दुष्काळी संज्ञेत मोडू लागले आहेत. सन २०१३ ते १५ ही दुष्काळी वर्षे तर या भागाने पाण्याअभावी कशी काढली हे आठवले की अंगावर काटा येतो. कित्येकांना मनावर धोंडा ठेवून जनावरे विकवी लागली. काहींना चारा छावणीचा आधार घ्यावा लागला. शेताशिवारात गुरापाखरांना शोधूनही पाण्याचा टिप्पूस मिळत नव्हता. सगळीकडे लाहीलाही करणारे उजाड शिवार नजरेस पडत होते. विहिरींनी केव्हाच तळ गाठलेला. गावात टॅंकरची वाट पाहणारी बाया-माणसं, रंगीबेरंगी घागरीच्या रांगा लावून जणू पाणीयुद्धाला तयार अशी स्थिती आता तयार होऊ लागली आहे. अनेकांनी पोटापाण्यासाठी केव्हाच शहरं जवळ केलेली. ज्यांना शेती नावाचा पोटचा गोळा सोडून जाणे शक्‍य नव्हते त्यांनी रेशन धान्याच्या भरवशावर दिवस ढकलले. प्रयत्न करून टॅंकरच्या हंडाभर पाण्यावर तहान भागवली.  जिद्दीने पाण्यासाठी प्रयत्न करणारे मालू  हिंमतीने संकटांशी दोन हात करणारे शेतकरीदेखील काही कमी नसतात. ते सतत पाण्यासाठी काही ना काही प्रयत्न करीत असतात. तळणी (ता. औसा, जि. लातूर) येथील हरिकिशन मालू हे त्यापैकीच एक आहेत. स्वतःची ४७ एकर व उर्वरित भावाची अशी मिळून ७२ एकर शेती ते सांभाळतात. वयाची साठी ओलांडलेले हरिकिशन आजही विविध मार्गांनी आपली मोठी शेती दुष्काळातही फुलवताना दिसताहेत. यंदाही पावसाची परिस्थिती अत्यंत वाईट होती. पाऊस म्हणावा असा झालाच नाही. पण मालू यांच्या अडीच कोटी लिटर क्षमतेच्या शेततळ्यात सद्यःस्थितीत दीड कोटी लिटरपर्यंत पाणी आहे. त्या जोरावर ३३ एकर ऊस, प्रत्येकी साडेपाच एकर आले व कलिंगड ही पिके शेतात फुलताहेत. पैकी कलिंगड लवकरच विक्रीसाठी उपलब्ध होईल.  पाण्यासाठी नाला सरळीकरण 

  • शेततळ्या व्यतिरिक्त सुमारे ११ लाख रुपये खर्चून त्यांनी पूर्वी गॅबीयन बंधारा बांधला. जमिनीतील पाणी ‘अंडरग्राउंड’ चराच्या माध्यमातून शेततळ्यात साठवले. शेताभोवती चर खोदून ते पाणी त्यात वळवले. पूर्वी एका नाल्याचे सरळीकरण त्यांनी केले होतेच. त्यानंतरही दुसऱ्या शेतात दीड ते दोन किलोमीटर लांब, वीस मीटर रूंद व पाच मीटर खोलीकरण अलीकडेच केले आहे. 
  • गॅबीयन बंधाऱ्याद्वारे पाणी अडवल्यने त्याचा फायदा यंदाही दुष्काळात होत आहे. अलीकडील वर्षातील भीषण दुष्काळातही त्यांची सुमारे ५० एकर शेती पाण्याखाली 
  • होती. गेल्यावर्षीही त्यांनी पडलेला पाऊस नाल्यात अडवला. शेततळ्यात साठवलो. पुरवून पुरवून ठिबक, तुषार सिंचनाद्वारे पिके जगवली. चालू वर्षात केवळ पस्तीत ते चाळीस तासच पाऊस पडला. पण सगळे पाणी विविध माध्यमातून अडविण्याचे काम यंदाही होत गेले. अलीकडेच मधेच थोडा पाऊस पडून गेला. तोही अडवून साठवला. 
  • विविध पिकांचे प्रयोग  पाणी उपलब्धता झाल्याने मालू यांनी माहिम जातीच्या आल्याची लागवड केली. आज पाहात राहावे असे पीक आहे. यंदा तूर चार एकरांवर फुलते आहे. हैदराबाद येथील कोरडवाहू संशोधन केंद्रातून त्यांनी कामिका एमआय-२०३ हे तुरीचे वाण आणले. हे वाण लाल फुलांचे आहे. याचे दाणे लाल रंगाचे, टपोरे असून प्रत्येक शेंगात चार ते पाच दाणे येतात. आकर्षक रंग असल्याने ही तूर बांधावरही लावता येते. खोडवा घेण्यासाठी हा उत्तम वाण आहे. या तुरीला पक्व होण्यास आठ महिने लागतात. पण सुमारे २० ते ३० टक्के उत्पादन जास्त मिळू शकते. यंदा पाण्यामुळेच हा प्रयोग करणे शक्य झाले.  कलिंगडाचे सुमारे २० टन एकरी उत्पादन अपेक्षित आहे.  जनावरांसाठी चाऱ्याची सोय  मालू यांच्याकडे सुमारे ३२ जनावरे आहेत. पण हिरवा चारा ते आज जनावरांना देऊ शकत आहेत.  साधारण दोन एकरांवर मका, गजराज अशी पिके घेतली आहेत. हरभऱ्याची विजय ही जात सहा एकरांवर, काबुली हरभरा व बन्सी गहू प्रत्येकी दोन एकरांवर आहे. खरिपात १५ एकर सोयाबीन पिकातून सुमारे १५५ क्विंटल उत्पादन त्यांना मिळाले. मका आठ एकरांवर होता. त्याचे १०२ क्विंटल उत्पादन मिळाले.  दोन्ही पिकांना तुषार सिंचनाने पाणी दिले. यंदा ३३ एकरांपैकी १६ एकर ऊस साखर कारखान्याला जाईल. तर उर्वरित उसापासून गूळ उत्पादन करण्यात येणार आहे. मालू यांचा गूळनिर्मितीचा व्यवसाय आहे.  यंदा सुमारे ९०० क्विंटलपर्यंत गूळनिर्मिती शक्य होऊ शकते असे ते सांगतात. दुष्काळात ते पाण्याविषयी दक्ष असतातच. मात्र ज्यावर्षी पाऊस भरपूर पडतो त्या वेळीही ते पाण्याचा थेंब न थेंब वाचवण्याचा प्रयत्न करतात. पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना त्यांनी केवळ मनात न ठेवता ती त्यांनी प्रत्यक्ष अंमलात आणली आहे.  संपर्क- हरिकिशन मालू-९४२२०७१२३१  (लेखक ज्‍येष्ठ साहित्यिक असून शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com