भात काढणीनंतर योग्य वाळवण आवश्‍यक

भात काढणीनंतर योग्य वाळवण आवश्‍यक
भात काढणीनंतर योग्य वाळवण आवश्‍यक

या वर्षी पर्जन्यमान चांगले झाल्यामुळे भातपिकाची जोमदार वाढ झाली. परिणामी भरघोस उत्पादन मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. सध्या बहुतांश ठिकाणी भात पीक कापणी सुरू असून, भात धान्याची योग्य वाळवण करून साठवण करावी. साठवणीतील किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत. भात पूर्णपणे वाळल्यावर म्हणजेच दाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १४ ते १६ टक्के खाली आल्यावर मळणी करावी. मळणी नेहमीच्या अगर बैलांच्या सहाय्याने अगर मळणी यंत्राने करावी. भात मळणी यंत्राला एक गोल ड्रम आडव्या आसावर बसविलेला असतो. ड्रमवर पट्ट्या बसविलेल्या असून, त्यावर तारांचे लुप्स विशिष्ट कोनात बसविलेले असतात. या ड्रमची लांबी साधारणपणे ६० सें.मी. ते १ मीटरपर्यंत असते. कमी लांबीचे भात झोडणी यंत्र पायडल मारून किंवा इलेक्‍ट्रिक मोटारीवर चालविता येते. जास्त लांबीचे यंत्र इलेक्‍ट्रिक मोटार किंवा पॉवर टिलरद्वारे चालविता येते. यावर साधारणतः २ ते ४ मजूर एकाच वेळी काम करू शकतात. एका तासामध्ये साधारणपणे १३५ ते १५० किलो भाताची झोडणी करता येते.

भातपिकाची वाळवण : कापणीवेळी भात दाण्यामध्ये २० ते २२ टक्के इतकी आर्द्रता असते. ती वाळवून १२ ते १४ टक्क्यांपर्यंत खाली आणणे आवश्यक असते. भात पीक व्यवस्थित वाळवले नाही, तर त्यातून कणीचे प्रमाण वाढते. आख्खा तांदूळ कमी मिळाल्याने बाजारात दर कमी मिळतो. त्यामुळे काढणीनंतरच्या प्रक्रियांकडे लक्ष दिल्यास भातधान्याची प्रत, बियाणे म्हणून वापरक्षमता टिकवली जाते. तसेच भरडल्यानंतर मिळणाऱ्या तांदळामध्येही पोषकता टिकून राहते. या भाताला बाजारात उत्तम दर मिळतो.

भाताचे धान्य वाळविण्याच्या पद्धती : सूर्यप्रकाशात धान्य वाळविणे :  ही सर्वाधिक वापरली जाणारी लोकप्रिय आणि स्वस्त पद्धत आहे. मोकळ्या जागेत जमिनीवर अथवा ताडपत्री/ प्लॅस्टिक कागद/ प्लॅस्टिक शिवलेले तळवट/ सतरंजी यावर भात धान्य उन्हात पसरविले जाते. सर्वसाधारणपणे ३ ते ५ सें.मी. उंचीचा थर ठेवावा. धान्य सतत उलटून-पालटून वर खाली करावे. यामुळे वाळण्याची प्रक्रिया वेगाने होते. या धान्याचे पक्षी, जनावरे व अन्य सजीवांपासून संरक्षणासाठी राखण करावी लागते. या पद्धतीस वेळही जास्त लागतो. वाळविल्यानंतरची आर्द्रता १२ ते १४ टक्के असावी. भात धान्याची यांत्रिक वाळवण ः खरीप भातपिकाच्या कापणीवेळी अथवा कापणीनंतर लगेचच पाऊस पडताना आढळतो. बदलत्या हवामानामुळे ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलेले आढळते. तयार पीक कापणीवेळी भिजते. भिजलेले पीक साठविणे अयोग्य ठरते. त्यातच पावसाचा काळ वाढला आणि उन्हाचे प्रमाण कमी झाल्यास धान्य वाळवणे अवघड ठरते. अशा यांत्रिक पद्धतीने धान्य वाळवणे उपयुक्त ठरते. या पद्धतीत गरम हवेचा वापर धान्य वाळविण्यासाठी करतात. यामध्ये एकूण दोन प्रकारची यंत्रे वापरली जातात.

बॅच पद्धत वाळवण यंत्र : कमी प्रमाणात धान्य वाळविण्यासाठी ही पद्धती उपयुक्त आहे. हे यंत्र धान्य साठविण्याच्या कणगीसारखे असते. यात एका वेळी १ ते २ टन धान्य वाळविता येते. गोलाकार, चौकोनी, आयताकृती किंवा षटकोनी अशा विविध आकारांची ही बॅच पद्धतीची वाळवण यंत्रे उपलब्ध आहेत. या यंत्रामध्ये उष्ण हवेचा झोत धान्यात ठराविक आर्द्रता मिळेपर्यंत सतत चालू ठेवला जातो. या वाळवण यंत्रात धान्य वाळवताना त्याचे तीन भाग पडतात. पहिला भाग हा जास्त वाळलेला भाग म्हणून ओळखला जातो. दुसरा भाग म्हणजे ओला भाग होय. कारण, जेव्हा गरम हवा वाळवण यंत्रात शिरते, त्या ठिकाणी धान्य प्रथम वाळते. त्या भागास जास्त वाळलेला भाग असे म्हणतात. जसजसा खालील भाग वाळत जातो, तसतसा त्यापुढील भाग वाळण्यास सुरवात होते. सर्वांत शेवटी ओला भाग वाळतो. थोडक्यात बॅच वाळवण पद्धतीत सर्व ठिकाणी समप्रमाणात धान्य वाळत नाही. साधारणपणे बॅच वाळवण यंत्रामध्ये २०० ते २५० सें.मी. खोलीचे धान्य वाळविता येते. भातासाठी हवेचा झोत ३ ते ४ घनमीटर प्रतिमिनिट प्रतिटनामागे ठेवावा लागतो.

सतत प्रवाही पद्धतीचे वाळवण यंत्र : मोठ्या प्रमाणात भात धान्य वाळविण्यासाठी या पद्धतीचा वापर करतात. भारतात एलएसयू पद्धतीच्या वाळवण यंत्रांचा वापर अधिक होतो. यात कमी कालावधीमध्ये धान्य समप्रमाणात वाळवले जाते, तसेच धान्याचे नुकसान कमी होते. या यंत्रामध्ये अधिक प्रमाणात सोडलेला हवेचा झोत हा नागमोडी वळणाने फिरून बाहेर पडतो. परिणामी धान्य गरम हवेच्या सान्निध्यात जास्त काळ राहते. हवेचे तापमान ६० ते ७० अंश सेल्सिअस ठेवून ७० घनमीटर हवा प्रतिमिनिट प्रतिटन फिरविणे आवश्‍यक असते. वरील पैकी कोणत्याही पद्धतीने भात धान्य वाळवून त्यातील आर्द्रतेचे प्रमाण १२ ते १४ टक्के ठेवावे. त्यामुळे धान्याची टिकवण क्षमता, बियाण्याची उगवण क्षमता व पौष्टिकता व्यवस्थित राखली जाते.

संपर्क : डॉ. नरेंद्र काशिद, ९४२२८५१२०५ (कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ, जि. पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com