कुशल तापमान नियंत्रक मधमाश्‍या

पोळ्यामध्ये मधमाश्‍यांच्या चयापचय प्रक्रियेतून उष्णता निर्मिती होऊ शकते व काही बाह्य उपायांनी पोळ्याचे तापमान घटवता येते.
पोळ्यामध्ये मधमाश्‍यांच्या चयापचय प्रक्रियेतून उष्णता निर्मिती होऊ शकते व काही बाह्य उपायांनी पोळ्याचे तापमान घटवता येते.

सजीवांमध्ये अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे शरीर विविधतापी (polikilothermal) असतं. बाह्य तापमानाप्रमाणे त्यांच्या शरीराचं तापमान बदलतं. त्यावर नियंत्रण ठेवणारी शरीरांतर्गत यंत्रणा नसते. असे प्राणी काही प्रमाणात काही विशेष उपाययोजना करतात. मधमाश्‍यांच्या अंड्यातील गर्भाची वाढ नीट होण्यासाठी ठराविक तापमान असावं लागतं. मधमाश्यांच्या अंडी अवस्थेतील सुप्तावस्था बाह्य तापमानावर अवलंबून असते. त्यांचं जीवनचक्र नैसर्गिक तापमानाच्या बदलातील लयींशी निगडित असतं. ऋतुमानाप्रमाणे हे बदल होतात.

जगाच्या विविध हवामानाच्या प्रदेशात मधमाश्‍यांची वस्ती आढळते. शीत प्रदेश, समशीतोष्ण प्रदेश आणि विषुववृत्तीय व उष्ण कटिबंधीय प्रदेशात, तसंच आल्प वा हिमालयाच्या पर्वत रांगातील वातावरणातही काही उंचीपर्यंत त्यांचे वास्तव्य आढळतं. फुलोरी जातीच्या म्हणजेच एपीस फ्लोरिया मोहळमाश्‍यांचे पोळे तर कच्छ आणि ओमानच्या रखरखीत उष्ण प्रदेशातही सापडले आहेत. अमेरिकेतल्या दीर्घकाळ बर्फाच्छादित असलेल्या काही राज्यांमध्ये मधमाश्‍या यशस्वीपणे जगताना आढळतात. अशा प्रकारच्या तीव्र हवामानाला हे कीटक कसे सामोरे जातात? त्यांना निसर्गाची मदत कशी मिळते हा एक कुतूहलाचा विषय आहे. मधमाश्‍या आपल्या मोहळातील तापमानाचे नियंत्रण प्रभावीपणे करू शकतात, हे त्यांच्या यशाचे गमक आहे.

पोळ्याचे तापमान

  • पोळ्यातील पिलाव्याच्या भागाचे तापमान ३३ अंश सेल्सिअस ते ३६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिर राखले जाते. तिथलं सरासरी तापमान ३४ अंश सेल्सिअस असतं. त्यात दिवसभरात १ अंश सेल्सिअसचा फरक पडत असेल इतकंच. ही स्थिती वर्षातल्या कोणत्याही ऋतूत आढळते.
  • मोहळात शिशुसंगोपनाचं काम चालू असेल त्या काळात तर हे तापमान कटाक्षाने राखलं जातं. हिवाळ्यात काही वेळा शिशुसंगोपन बंद असेल त्या वेळी हे तापमान घसरतं; पण ते कधीच गोठणबिंदूपर्यंत पोचत नाही. त्या वेळी मधमाश्‍या पोळ्यावर एकमेकींना घट्ट चिकटून बसतात. त्यांच्या घोळक्‍याच्या मध्यभागाचं तापमान १८ अंश सेल्सिअस, तर बाहेरचं १० अंश सेल्सिअस तापमानाच्या आसपास घसरतं. त्या वेळी बाह्य परिसराचं तापमान उणे ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहूनही कमी असतं.
  • मधमाश्‍यांमध्ये तापमान नियंत्रकाच्या पद्धती वंश परंपरागतरीतीने हजारो वर्षांपासून विकसित होत आल्या आहेत. या पद्धतीमध्ये त्यांच्या चयापचय प्रक्रियात्मक आणि वर्तन संबंधित घटकांचा प्रभाव महत्त्वाचा ठरतो. त्या घटकांचे परस्पर संबंध खूप गुंतागुंतीचे असतात. या यंत्रणे अंतर्गत उष्णता निर्मिती आणि तापमानातील घट या दोन्ही गोष्टी आवश्‍यकते नुसार साधता येतात.
  • चयापचय प्रक्रियेतून उष्णता निर्मिती होऊ शकते व काही बाह्य उपायांनी तापमान घटवता येतं.
  • उन्हाळ्यातील पोळ्यातील शीतीकरण यंत्रणा

  • शीतीकरण मुख्यतः पंख वेगाने हलवल्यामुळेच साधू शकतं. बंदिस्त मोहळात शारीरिक प्रक्रियांमुळे उष्णतेत वाढ होते.
  • बाहेरच्या वाऱ्याचा थंड झोत त्यावर सोडला, की आतलं तापमान कमी होतं.
  • मोहळात मोकळी हवा खेळवली गेली की मोहळातल्या आर्द्र पृष्ठभागावरील पाण्याचं बाष्पीभवन होतं. मधमाश्‍यांचे शरीर, अळ्यांचं शरीर आणि उघड्या साठवण घरातील अपक्व मध हे अशा आर्द्रतेच्या प्रमुख स्रोत होत. या आर्द्र स्रोतामध्ये मधमाशीही कृत्रिम भर घालतात. त्यासाठी परिसरातील पाणवठ्यावरून पाणी गोळा करून मोहळात थेंबा थेंबाने आणले जातं. त्यासाठी पाणी सकंलनाचं मोठ पथकच कामाला लागतं. विशेष म्हणजे उष्णता असेल तेव्हा हे काम जोर पकडतं.
  • पाणवठ्यावरचं पाणी पोकळ जिभेनं शोषल जातं. ते पोटाच्या मध संकलक पिशवीत तात्पुरतं साठवलं जातं आणि मधमाश्‍या मोहळात परतता. या पाण्याचा थेंब जिभेवाटे पुन्हा बाहेर काढला जातो आणि पिलाव्याच्या घराच्या वरच्या भिंतीवर चिकटवला जातो. तो तेथे लटकत राहतो.
  • कधी कधी मोहळातल्या काही कामकरी माश्‍या आपल्या आपल्या दोन दातांत पाण्याचा थेंब धरतात आणि तोंडावाटे आत बाहेर करतात. त्यामुळे त्यांचे बुडबुडे बनतात. पाण्याचा पृष्ठभाग वाढतो आणि त्याचे बाष्पीभवन लवकर होते.
  • पाण्याप्रमाणेच अपक्व आर्द्र मधाचे थेंबही तोंडात धरून त्याचे फुगे केले जातात व त्यातील पाण्याचंही बाष्पीभवन होऊन मोहळातील हवा थंड व्हायला मदत होते.
  • मधातील पाण्याचे प्रमाण ८० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी होऊन मध पक्व होतो. पंख हलवून निर्माण केलेल्या हवेच्या झोतामुळे हे बाष्पीकरण वेगाने होतं. हवा थंड होते.
  • पंख सामूहिकपणे हलवण्यासाठी सर्व वयाच्या मधमाश्‍या मोहळाच्या दारात एकत्रित बसतात किंवा मोहळातच पसरून राहतात. दारातल्या माश्‍या अशा पद्धतीने बसतात की बाहेरच्या हवेचे झोत मोहळ असलेल्या पोकळीत शिरतात आणि सर्वत्र पसरतात.
  • पोकळीला कुठेतरी फटी असल्या की गरम हवा त्या फटीतून बाहेर पडते. नाही तर प्रवेश दारातूनच हवा आत येते व नंतर बाहेर जाते. हे आलटून पालटून होत राहातं.
  • वायू वीजनाचा विचार करूनच आधुनिक रचनेच्या लाकडी पेटीच्या वरच्या छपराला हवा बाहेर जाण्यासाठी छिद्र ठेवलेली असतात. हवा कोरडी असेल तर या पद्धतीचा फारच प्रभावी उपयोग होतो.
  • लिंडर या शास्त्रज्ञाने १९६१ मध्ये एक प्रयोग केला. दक्षिण इटलीत ज्वालामुखीच्या लाव्हा प्रदेशात भर उन्हात मोहळ असलेली एक पेटी ठेवली. बाहेरचं तापमान होतं ७० अंश सेल्सिअस; पण जोवर मधमाश्‍या पाणवठ्यावरून पाणी आणू शकत होत्या तोवर मोहळातील तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास होतं आणि मेणाची पोळी वितळली नव्हती.
  • उघड्यावरच्या आग्या आणि फुलोरी मोहळातल्या पोळ्याच्या मेणाचा विलयबिंदु कमी असूनही तापमान नियंत्रण पद्धतीमुळे पोळ्याचं मेण उन्हाळ्यातही वितळत नाही.
  • पोळ्यातील तापमान नियंत्रक उपाययोजना

  • उष्ण कटिबंधीय हवामानाच्या आग्या म्हणजेच एपिस डोसाटा आणि फुलोरी म्हणजेच एपिस फ्लोरिया या जंगली मधमाश्‍यांचे मोहळ उघड्या वातावरणात असते. या उलट पाळीव जातींच्या पाश्‍यात्य म्हणजेच एपीस मेलीफेरा व भारतीय मधमाश्‍या म्हणजे सातेरी किंवा एपिस सिराना इंडिका या प्रकारची मोहळं बंदिस्त जागी असतात.
  • बंदिस्त मोहळा भोवतालच्या भिंती उष्णता रोधक असतात; मात्र उघड्यावरच्या मोहळांना पिलाव्या भोवतालचं मोहोळातलं तापमान स्थिर राखायला तुलनेन विशिष्ट उपाय योजावे लागतात. त्यासाठी त्या मधमाश्‍या पिलाव्यावर बसून जणू भिंतच तयार करतात.
  • कडक हिवाळ्यात हे थर जाड व घट्ट असतात, तर उन्हाळ्यात विरळ असतात. त्यामुळे तेथे हवा खेळती राहते. याशिवाय उन्हाळा अधिक कडक असला, तर मधमाश्‍या आपले पंख सामूहिक पद्धतीने जोरात हलवतात. त्यामुळे वाऱ्याचा झोत निर्माण होतो आणि तापमान कमी होतं.
  • पावसाळ्यात पोळ्यावर दाटी वाटीने बसलेल्या मधमाश्‍यांमुळे पावसाचं पाणी निथळून जातं. कारण मधमाश्‍यांच्या शरीरावर एक मेणचट थर असतो. त्यांचं शरीर कमी भिजतं. त्याच वेळी आतील तापमानही त्यामुळे स्थिर राहतं.
  • - प्रशांत सावंत, सारिका सासवडे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com