हळकुंडावरील प्रक्रियेसाठी यंत्रे

हळद
हळद

कोणत्याही भारतीय स्वयंपाकामध्ये हळदीचा वापर होत असतो. फोडणीमधील सर्वात महत्त्वाचा घटक असून, त्याचे औषधी गुणधर्मही सर्वांना ज्ञात आहेत. हळकुंडापासून हळद पावडर निर्मितीसह अन्य नावीन्यपूर्ण उत्पादने बनवता येतात. त्याविषयी माहिती घेऊ.   गेल्या अनेक शतकांपासून भारतामध्ये हळद ( शा. नाव ः Curcuma Longa L.) पीक घेतले जाते. हळद पीक घेणारी भारतातील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, गुजरात, मेघालय, महाराष्ट्र, आसाम या मुख्य राज्यामध्ये हळद पीक घेतले जाते. त्यातील सर्वाधिक ३५ टक्के क्षेत्र हे आंध्र प्रदेशामध्ये आहे. मसाले आणि नदीया हळद भुकटीचा वापर स्वयंपाकामध्ये खाद्य पदार्थामध्ये रंग व स्वाद आणण्यासाठी नैसर्गिक घटक म्हणून वापर होतो. त्याच प्रमाणे प्रसाधने, औषधे, किडींना दूर सारणारे म्हणूनही वापर होतो. हळदीमधील गुणधर्म 

  • आरोग्यवर्धक, पाचक, सूक्ष्मजीव विरोधी, दाह रोखणारी, कर्करोगाला दूर सारणारे, कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे अनेक घटक हळदीमध्ये आहेत.
  • यकृताचे आजार, त्वचा रोग, चयापचय, रक्त शुद्धीकरण या संबंधित आजार यावरील उपचारामध्ये कार्यक्षम औषधी ठरते.
  • शरीराची अॅण्टीऑक्सिडन्ट क्षमता वाढवते. कुरकुमिनमध्ये शरीरातील अॅण्टीऑक्सिडन्ट विकारांना चालना देण्याची क्षमता असून, ते स्वतःची शरीराला हानीकारक अशा मुक्त कणांचे परिणाम उदासीन करतात.
  • हळदीमध्ये मेंदूच्या क्रियांना चालना देण्याची क्षमता असून, मेंदूच्या विविध विकारांना दूर ठेवण्यात मदत करतात.
  • हृदयरोग व कर्करोगाचा धोका कमी करते.
  • अल्झायमर रोगाला रोखण्यात आणि उपचारामध्ये कुरकुमिन उपयुक्त ठरते. रक्त आणि मेंदूतील अडथळे ओलांडून कुरकुमिन अल्झायमर रोगांवरील उपचारात अन्य प्रक्रियांनाही मदत करते.
  • सांध्याच्या दुखण्यासाठी (अर्थिरीटीस रुग्ण) उपयुक्त.
  • नैराश्य या मानसिक विकारामध्ये कुरकुमिन फायदेशीर असल्याचे एका अभ्यासात आढळले आहे.
  • हळदीपासून पावडर तयार करणे यातील मुख्य प्रक्रिया १) स्वच्छता (Sweating) : हळदीची मुळांशी कंद स्वच्छ धुवून, त्याची पाने आणि लांब मुळे काढून टाकावीत. त्यावर कंद आणि त्याची पिल्ले (फुटवे) असतात. मोठ्या उद्योगामध्ये त्यांची वेगळी वर्गवारी करून, वेगळी प्रक्रिया केली जाते. २) शिजवणे (Curing) ः हळद पाण्यात किंवा वाफेवर शिजवून घेतली जाते. शिजवण्याच्या प्रक्रियेचा आदर्श वेळ ४५ मिनिटे असून, योग्य शिजलेल्या हळदीचा चांगला गंध येण्यास सुरवात होते. योग्य क्युरींग प्रक्रियामुळे हळदीतील कुरकुमिन (६ टक्के), आवश्यक तैल घटक (३.३३ टक्के), ओलेओरेझीन (१३.९६ टक्के) आणि स्टार्च (६३.३३ टक्के) सर्वाधिक प्रमाणात राहण्यास मदत होते. पारंपरिक हळद शिजवण्याच्या तुलनेमध्ये वाफेवर हळद शिजवण्याच्या पद्धतीमुळे उत्तम दर्जा मिळण्यासोबत इंधन व मजुरांच्या खर्चात बचत होते. शिजवण्यामुळे खालील फायदे होतात.

  • मुळे मऊ होऊन आतील स्टार्च गेलाटीनाईज झाल्याने वाळण्याची क्रिया वेगाने होते.
  • हळदीचा उग्र वास कमी होतो. त्यामुळे तयार झालेल्या भुकटीचा स्वाद हा वेगळा लागतो.
  • शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे हळदीला एकसारखा रंग येण्यास मदत होते.
  • शिजवण्याच्या प्रक्रियेमुळे कंदामध्ये मातीतून येण्याची शक्यता असलेल्या हानीकारक कीडी किंवा जिवाणू यांचा नाश होतो.
  • ३) वाळवणे (Drying) ः हळदीचे लहान तुकडे केल्यामुळे पृष्ठफळ वाढते. त्याचा फायदा हलद वेगाने वाळण्यासाठी होतो. अंतिम उत्पादनामध्ये आर्द्रतेचे प्रमाण ५ ते १० टक्क्यांपर्यंत असावे. सूर्यप्रकाशामध्ये ते मिळवण्यासाठी वातावरणानुसार सुमारे १० ते १५ दिवस लागतात. मात्र, सरळ सूर्यप्रकाशामध्ये राहिलेल्या हळद कंदाचा नैसर्गिक रंग कमी होतो. त्यामुळे व्यावसायिक उत्पादनासाठी यांत्रिक ड्रायरचा वापर करावा. अशा ड्रायरमध्ये ६० अंश सेल्सिअस तापमानामध्ये हळद काप दीड ते दोन तासांमध्ये वाळते. ४) दळणे (Grinding) :  योग्य वाळल्यानंतर हळद दळून घेतली जाते. त्यासाठी अनेक ग्रायंडर आणि चाळण्या उपलब्ध आहेत. ५) पॉलिशिंग ः शिजवून वाळवलेली हळकुंडे ही खरबडीत आणि कठीण असतात. हळकुंडाचा बाह्य थर काढून टाकल्यामुळे (पॉलिशिंग) उत्तम रंग मिळतो. या प्रक्रियेसाठी पॉलिशिंग ड्रम उपलब्ध आहेत. त्याची क्षमता २० ते ३० किलो प्रति फेरे असावी.   हळदीपासूनची उत्पादने ः हळद चहा किंवा सोनेरी दूध दूधामध्ये हळदीचा वापर करून तयार केलेले पेयाला सोनेरी दूध किंवा चहा असे म्हटले जाते. त्यात आवश्यकता असल्यास अन्य मसाले व गोडीसाठी साखर वापरतात. हिवाळ्यामध्ये येणाऱ्या आजारांवर किंचित गरम असा हा चहा अत्यंत उपयुक्त ठरतो. दुधाचा वापर केल्यामुळे हळदीचे चांगल्यारीतीने शोषण होण्यास मदत होते. फेस मास्क ः त्वचेचे आरोग्य आणि उजळपणासाठी हळद उपयुक्त ठरते. हळदीपासून फेसमास्क तयार करण्यासाठी दोन चमचे दह्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मध मिसळून घ्यावा. दाह कमी करणारा जेल ः सांध्यातील दुखणे किंवा दाह कमी करण्यासाठी दोन भाग मध आणि एक भाग हळद यांचे मलम तयार करावे. त्याचा दुखऱ्या जागेवर लेप करावा. फायदा होतो. हळदीची टूथपेस्ट ः पाव चमचा हळद, १/८ चमचा नारळ तेल यांच्यापासून पेस्ट तयार करावी. वापरण्याची पद्धत ः सामान्य टूथपेस्ट प्रमाणे दात घासावेत. चूळ भरण्यापूर्वी तोंडातील लाळ व हलद पेस्टचा द्राव दाताच्या सान्निध्यामध्ये ३ ते ५ मिनिटांपर्यंत राहू द्यावा. त्यानंतर व्यवस्थित चूळ भरून, आपल्या नेहमीच्या पेस्ट किंवा दात घासण्याच्या भुकटीने दात घासून घ्यावे. जर हळदीचा काही भाग दात किंवा तोंडामध्ये राहिल्यास दात पिवळसर वाटू शकतात. मात्र, दुसऱ्या पेस्टने स्वच्छता केल्यानंतर दात अधिक चमकदार दिसत असल्याचा अनुभव आहे. हळद प्रक्रियेसाठी यंत्रे बॉयलर ः हळकुंडे अत्यंत आरोग्यपूर्ण वातावरणामध्ये शिजवण्यासाठी बॉयलर उपयुक्त ठरतात. त्याची क्षमता १६ क्विंटल प्रति तास असून, त्यासाठी १० किलो लाकडे इंधन म्हणून आवश्यक असते. या बॉयलरमध्ये मोठ्या आयताकृती आकाराचे आणि बाह्य आवरण जाड असलेले भांडे असते. त्यात पाणी भरले जाते. या पाण्याला उष्णता देऊन उकळू देतात. उकळत्या पाण्यामध्ये सोडीयम बायोकार्बोनेट मिसळले जाते. त्यामुळे हळदीला उत्तम रंग येण्यास मदत होते. आतमध्ये हळकुंडे ठेवण्यासाठी दोन ते तीन भांडी असतात. त्यामुळे शिजवलेली हळद सहज काढून घेता येते. गरम पाणी वाया जात नाही. असा बॉयलर बाजारामध्ये अंदाजे १० हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. हळदीच्या प्रक्रियेसाठी विविध क्षमतेचे पॉलिशिंग यंत्र, वाळवण यंत्र, ग्रायंडर उपलब्ध आहेत.   (लेखक सिफेट या संस्थेचे माजी संचालक अाहेत.)   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com