संवर्धन खिलार गोवंशाचे...

 खिलार जातीच्या संवर्धन व संगोपनासाठी कृत्रिम रेतन सुविधा पुरवावी लागणार आहे.
खिलार जातीच्या संवर्धन व संगोपनासाठी कृत्रिम रेतन सुविधा पुरवावी लागणार आहे.

जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी त्यांची लक्षणे ओळखून सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. त्यासाठी संवर्धन व संगोपनासाठी लोकसहभाग वाढविणे, खिलार महोत्सवसारखे उपक्रम राबविणे, कृत्रिम रेतन सुविधा पुरविणे इ. उपाययोजना अमलात आणणे आवश्यक आहे.   खिलार प्रजातीचा शुद्धपणा टिकवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होणे आवश्यक आहे. ढोबळ मानाने रंगावरून खिलार जातीचे पांढरा व कोसा असे दोन प्रकार पडतात. पांढरा रंग जास्त आकर्षक दिसतो. तुलनेत कोसा रंगाची जनावरे जास्त असतील, तर दोन गटांत विभागणी करून तुलना केली जाते. पांढऱ्या रंगाची जनावरे तुलनेने जास्त तापमान असलेल्या भागात म्हणजे सोलापूर, सांगलीतील जत व आटपाडी या भागात आढळतात. कोसा रंगाची जनावरे विटा व तासगाव या तुलनेने कमी तापमान असलेल्या भागात आढळतात. पशुपालकांच्या मते कोसा रंगाची जनावरे तुलनेने जास्त ताकदवान व कामसू असतात. गाजऱ्या रंगाच्या जनावरांचे खूर लवकर तळावतात. त्यामुळे पत्री मारावी लागतात. आखूड मानेची खिलार म्हणून ही जात ओळखली जाते. खिलार जातीचे प्रकार मूलतः खिलारच्या चार मुख्य उप जाती मानल्या जातात. सांगली, सातारा, सोलापूर हा भाग खिलार गोवंशाच्या उत्पत्ती व संवर्धनाचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील पशुपालकांनी आवडीनुसार आणि भौगोलिक परिस्थितीनुसार खिलार प्रजातीच्या वंशामध्ये काही बदल घडवून आणून पुढील नऊ उप जाती तयार झाल्या आहेत. त्याला स्थानिक नावे देण्यात आली. या सर्व प्रजाती शासनमान्य नाहीत, पण लोकमान्य आहेत. १. आटपाडी आढळ ः आटपाडी, सांगोला. रंग पांढरा शुभ्र शरीरावर कोणत्याही प्रकारचा डाग आढळून येत नाही. नाकपुडी, शिंगे, खुर गाजऱ्या रंगाची. २. म्हसवड आढळ ः सातारा जिल्ह्यातील म्हसवड भागात रंग तांबूस, कोसा. शरीर सडपातळ वशिंड एका बाजूस झुकलेले, त्यामुळे बौलाची चाल दिमाखदार व आकर्षक असते. वशिंड चालताना जास्त हलणे हे चांगले गुणवैशिष्ट्ये मानले जाते. ३. कोसा आढळ ः सातारा, कर्नाटक व महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात खिलार प्रजातीची सर्व गुणधर्म आढळून येतात. काळा रंग, चेहरा, मान, पोळी व वशिंड या भागावर कोसा रंग आधिक गडद. नाकपुडी व डोळ्यांची बुबळे काळ्या रंगाची असल्यामुळे अधिक आकर्षक. शिंगे कधी कधी गाजऱ्या रंगाची, तर कधी कधी काळपट. ४. नकली आढळ ः खानदेशाच्या आसपासच्या भागात मानेखालची पोळी जाड व जास्त लोंबकळती. नाक व कपाळ फ़ुगीर. शरीर स्थूल व कमी उंचीचे. चपळ नसतात. ५. पंढरपूर आढळ ः पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट दिसायला आटपाडी खिलारसारखे. सदृढ व स्नायूंची ठेवण रेखीव, शिंगे गाजऱ्या व काळ्या मिश्रणाची असतात, नाकपुडी व खुर गाजरी किंवा पांढरी. ६. धनगरी आढळ ः सातारा कोसा व म्हसवड खिलार यांच्या संकरातून तयार झाला आहे. चेहरा आखूड व कपाळ रुंद व सपाट. शरीर बांधा मोठा, शिंगाची जाडी बुंध्या जवळ जास्त. खुरे व नाकपुडी काळ्या रंगाची, तर कधी कधी गाजऱ्या रंगाची असतात. ७. ब्राह्मणी आढळ ः सातारा कोसा जातीप्रमाणे शरीर मोठे, मात्र लांबीने आखूड. रंग काळसर. चेहरा, वशिंड मान व मांड्यांवर गडद काळा रंग. शिंगे बुंध्यात जाड, खुर, नाकपुड्या काळ्या. ८. डफळ्या खिलार आढळ ः सातारा, सोलापूरपेक्षा सांगली जिल्ह्यात जास्त कर्नाटकातील हल्लिकार या जातीशी मिळतीजुळती. चेहरा, वशिंड, मान व मांड्या काळ्या रंगाच्या. शिंगे बुंध्यात जाड, खुर, नाकपुड्या काळ्या. ९. हरण्या आढळ ः सांगली व सोलापूर हरणासारखा रंग, चेहरा लांब, सडपातळ, कपाळ पुढील भागात उभट झालेले. शिंगे नाकपुड्या खुर गाजऱ्या रंगाची. इतरांच्या मानाने चपळ असतात. संवर्धनासाठी उपाययोजना

  • जातिवंत खिलार जनावरांची पैदास वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे.
  • खि़लार बैलाच्या गुणवैशिष्ट्यानुसार नोंदी करून त्या प्रवर्गातील गाईला उच्च गुणवत्तेच्या वळूचे वीर्य उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी कृत्रिम रेतन सुविधा पुरवावी लागणार आहे.
  • संगोपन व संवर्धनासाठी जागृती करणे, खिलार महोत्सवसारखे उपक्रम आयोजित करणे, खिलारच्या उत्कृष्ट पौदाशीसाठी कार्य करणाऱ्या पशुपालकांना प्रोत्साहनपर अनुदान दिल्यास त्यांचे चांगले परिणाम दिसून येतील व खिलार जातींची संख्या वाढण्यास मदत होईल.
  • अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत जास्त दूध देणाऱ्या व खिलार जातीचे वौशिष्ट्ये असणाऱ्या जनावरांची नोंद केली, तर दुग्ध उत्पादन वाढण्यास मदत होईल.
  • खिलार गाईच्या शेण व गोमूत्रापासून आयुर्वेदिक औषधास मागणी वाढत आहे. त्यादृष्टीने खिलार जातीचे संवर्धन व संगोपन करणे.
  • संपर्क ः प्रा. शरद पाटील, ९६६५२६२४६२ (छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय, कोल्हापूर) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com