पर्यायी चाऱ्यासाठी काटे विरहित निवडूंग

शेळ्यांच्या खाद्य मिश्रणात काटे विरहित निवडुंगांच्या तुकड्यांचा वापार फायदेशीर ठरतो.
शेळ्यांच्या खाद्य मिश्रणात काटे विरहित निवडुंगांच्या तुकड्यांचा वापार फायदेशीर ठरतो.

मुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय जमिनी तसेच शेती बांध, वनशेतीमध्ये काटे विरहित निवडूंग लागवड करता येते. अभिवृद्धी पानांद्वारे होत असल्याने मातृ वृक्षावरील परिपक्व झालेली किमान एक वर्ष वयाची पाने लागवडीसाठी वापरता येतात. बाएफ संस्थेने या पिकाबाबत विशेष संशोधन केले आहे.   काटे विरहित निवडुंगाचे मूळ स्थान मेक्सिको देश आहे. जगभरात या पिकाच्या दीड हजाराहून अधिक प्रजाती आहेत. यामधील अनेक प्रजाती बहुपयोगी असून त्यांचा वापर चारा, औषधी, सौंदर्य प्रसाधने, ऊर्जा तसेच फळ आणि त्यापासून बनविण्यात येणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये होतो. जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी १९७० च्या दरम्यान या पिकाच्या अभ्यासाला सुरवात केली. १९९१ साली कर्नाल (हरयाणा) येथील केंद्रीय मृदा लवणता संशोधन संस्थेने देखील या पिकातील संशोधन सुरू केले. सध्या शुष्क प्रदेशातील कृषी संशोधन करणाऱ्या आंतरराष्ट्रीय केंद्रामार्फत पुरविण्यात आलेल्या काटेविरहित निवडुंगाच्या विविध जातींबाबत संशोधन करण्यात येत आहे. भारतीय चारा संशोधन संस्था, केंद्रीय वनशेती संशोधन संस्था, तसेच केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्थेमध्ये संशोधन प्रकल्प राबविण्यात येत आहे.

लागवड आणि व्यवस्थापन

  • प्रत्यक्ष शेतात पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान लागवड करावी. मुरमाड व हलकी तसेच पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमिनीत २ फूट रुंद व १ फूट उंचीचे गादीवाफे तयार करावेत.
  • चारा पिकासाठी १२७०,१२७१,१२८० आणि १३०८ या जातींची शिफारस करण्यात आली आहे.
  • लागवडीपरू्वी एक वर्ष वयाची लागवड योग्य पाने मातृवृक्षावरून कापून घेऊन सावलीमध्ये पंधरा दिवसांपर्यंत सुकवावीत. लागवडीच्या दिवशी पाने बुरशीनाशकाच्या (मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब) द्रावणात (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) बुडवावीत. त्यामुळे मर होत नाही.
  • लागवडीपूर्वी प्रतिहेक्टरी पाच टन चांगले कुजलेले शेणखत, ६० किलो नत्र, ३० किलो स्फुरद व ३० किलो पालाश जमिनीत मिसळावे. प्रत्येक कापणी नंतर प्रतिहेक्टरी २० किलो नत्र दिल्यास नवीन फुटव्यांची चांगली वाढ होते.
  • लागवड ३ मी × २ मी अंतरावर करावी. एकरी ६६७ झाडे बसतात. लागवड करताना पानाचा सपाट भाग पूर्व-पश्चिम दिशेने ठेऊन एक तृतीयांश भाग जमिनीखाली राहील याची काळजी घ्यावी.
  • लागवडीनंतर दहा दिवसांपर्यंत पाणी देऊ नये. त्यानंतर मात्र दर पंधरा दिवसांनी १ ते २ लिटर पाणी प्रति झाड द्यावे. पावसाळ्यात पाणी देऊ नये. लागवडीतील तण नियंत्रण करावे.
  • एक वर्षानंतर परिपक्व झालेली पाने कापून घ्यावीत. जमिनीलगत असणारे मुख्य पान ठेऊन कापणी करावी. प्रतिझाड ताज्या, हिरव्या व परिपक्व झालेल्या पानांचे सुमारे १० ते १२ किलो चारा उत्पादन मिळते. त्यानंतरच्या वर्षात प्रतिझाड उत्पादन वाढत जाते. कापणी झालेली पाने इतर हिरव्या चाऱ्यासोबत तुकडे करून जनावरांच्या खाद्यामध्ये द्यावीत.
  • लागवडीपासून एक वर्षानंतर पिकाची फारशी काळजी घेण्याची आवश्यकता नाही.
  • प्रयोगाचे निष्कर्ष ः

  • निवडुंगामध्ये सुमारे ८५ टक्के पाण्याचे प्रमाण आहे. इतर चाऱ्यासोबत निवडुंगाच्या पानांचे तुकडे करून शेळ्या, मेंढ्या व दुभत्या जनावरांना खाऊ घातल्यास उन्हाळी हंगाम व दुष्काळी भागात जनावरांना लागणाऱ्या पाण्याच्या समस्येवर काही प्रमाणात मात करता येते.
  • एप्रिल- मे महिन्यात शेळ्यांना काटे विरहित निवडुंगाचे तुकडे खाऊ घालण्याचा प्रयोग राबविण्यात आला. यामध्ये असे दिसून आले की, एक शेळी दिवसाला ३ ते ४ किलो निवडुंगाचा हिरवा चारा खाते. त्यामुळे त्यांची शरीर वाढ योग्य पद्धतीने झाली. त्यांची पाण्याची गरज चांगल्या प्रकारे भागविण्यात आली.
  • शेळी, मेंढीप्रमाणे गाई, म्हशींना चाऱ्यामध्ये काटे विरहित निवडुंगाचे तुकडे मिसळून हिरव्या चाऱ्याची गरज भागवता येते.
  • निवडुंग रोपवाटिका आणि मातृवृक्ष लागवड:

  • रोपवाटिकेच्या माध्यमातून निवडुंगाची रोपे तयार करून प्रत्यक्ष शेतात लागवडीसाठी वापरता येतात. रोपवाटिका तयार करण्यापूर्वी किमान एक वर्ष वयाची पाने मातृ वृक्षावरून काढून घ्यावीत. पुढील पंधरा दिवस सावलीमध्ये सुकवावीत.
  • रोपनिर्मितीसाठी ४० भाग माती, ४० भाग वाळू आणि २० भाग शेणखत मिश्रण तयार करून ते पिशवी किंवा कुंड्यांमध्ये भरून ठेवावे. मर होऊ नये यासाठी लागवडीपूर्वी पाने बुरशीनाशकाच्या (मेटॅलॅक्झिल अधिक मॅन्कोझेब) द्रावणात (५ ग्रॅम प्रतिलिटर पाणी) बुडवावीत.
  • पानांची उपलब्धता कमी आणि जास्त प्रमाणात रोपे तयार करावयाची असल्यास पानांचे समान दोन किंवा चार भाग करून कुंडी किंवा पिशवीमध्ये लागवड करावी.
  • रोपवाटिकेत लागवडी दरम्यान पानाचा एक तृतीयांश कापलेला भाग मातीमध्ये खोचावा. पहिले आठ दिवस पाणी देऊ नये. त्यानंतर मात्र दर दहा ते पंधरा दिवसांनी थोडे पाणी द्यावे. शक्यतो लागवड पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान करावी. साधारणतः ६० दिवसात मुळांची वाढ होऊन नवीन फुटवे दिसण्यास सुरुवात होते.
  • तीन ते चार महिन्यांनंतर तयार झालेली रोपे प्रत्यक्ष शेतात लागवड करता येतात.
  • त्याचप्रमाणे अगोदरच लागवड केलेल्या जुन्या निवडुंग मातृवृक्षाची पाने काढून तीसुद्धा नवीन लागवडीसाठी वापरता येतात.
  • बाएफ संस्थेतील संशोधन

  • संस्थेच्या प्रक्षेत्रावर काटेविरहित निवडुंगावर संशोधन तसेच रोपवाटिका तयार करून उत्पादन तंत्रज्ञान विकसित झाले आहे.
  • लागवडीसाठी पानांची उपलब्धता कमी असल्यास रोपवाटिकेच्या माध्यमातून रोपनिर्मिती, प्रत्यक्ष शेतात लागवड, आहारशास्त्रीयदृष्ट्या वेगवेगळ्या प्रजातीचे मूल्यांकन, शेळ्यांना निवडुंग खाऊ घालून त्यांच्या वाढीचे निरीक्षण करण्यात आले.
  • काटे विरहित निवडुंगामध्ये संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील कृषी संस्थांकडून विविध जाती गोळा करून त्यांची लागवड करण्यात आली. वैयक्तिक स्तरावर शोध घेऊन गोळा केलेल्या काही जातींचा यात समावेश आहे.
  • आत्तापर्यंत सुमारे ९० हून अधिक जातींची लागवड प्रक्षेत्रावर असून त्यांची समाधानकारक वाढ आहे. या संशोधनाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे.
  • विशेष गुणधर्म:

  • निकृष्ट खडकाळ, मुरमाड, कुरण जमिनी, वालुकामय व शुष्क प्रदेश तसेच शेती बांध, वनशेतीमध्ये लागवड शक्य.
  • पौष्टिक चारा, फळे, भाजीसाठी बहुपयोगी वनस्पती.
  • उत्तम चारा पीक. दुष्काळप्रवण भाग, उच्च तापमान आणि धुके यांसारख्या वातावरणात तग धरण्याची क्षमता.
  • पाणी वापराची चांगली कार्यक्षमता.
  • अभिवृद्धी पानांद्वारे होत असल्याने मातृ वृक्षावरील परिपक्व झालेली किमान एक वर्ष वयाची पाने लागवडीसाठी वापरता येतात.
  • केवळ पावसाच्या पाण्यावर जगणारे पीक.
  • चाराटंचाई काळात निवडुंगापासून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत चाऱ्याची गरज भागवणे शक्य.
  • पौष्टिक मूल्य:

  • प्रथिने ः ५ ते ७ टक्के
  • तंतुमय पदार्थ ः ११ ते २० टक्के
  • शुष्क पदार्थ ः ७ ते ११ टक्के
  • खनिजे ः कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडीअम, फॉस्फरस, पोटॅशिअम.
  • संपर्क ः ०२०- २६९२६२६५ (बाएफ विकास अनुसंधान प्रतिष्ठान, उरुळीकांचन, पुणे)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com