कमी वेळेत चांगल्या मशागतीसाठी रोटाव्हेटर

रोटाव्हेटर
रोटाव्हेटर

१९३०च्या दशकात रोटरी कल्टिव्हेटर (रोटा + व्हेटर) ही संकल्पना अमेरिकेत प्रसिद्ध झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर रोटाव्हेटरचा प्रसार पाश्‍चात्त्य देशांत झाला. दोन दशकांपासून रोटाव्हेटर भारतात प्रसिद्ध झाला. एकदा रोटाव्हेटर फिरविल्यास एक नांगरणी व दोन कोळपण्या होत असल्याने पारंपरिक अवजारांपेक्षा रोटाव्हेटरला पसंती मिळते. अशा या रोटाव्हेटरमध्ये रोटाव्हेटर शाफ्ट, ब्लेड्स, गिअर बॉक्स असेम्ब्ली, स्पर गिअर असेम्ब्ली, रोटर असेम्ब्ली, ट्रेलिंग बोर्ड इ. भाग असतात.

रोटाव्हेटर अाणि ट्रॅक्टर

  • रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यांसाठी जास्त शक्तीची गरज असते. ही शक्ती रोटाव्हेटरचा रोटर फिरविण्यासाठी, ट्रॅक्‍टरला योग्य गती देण्यासाठी; तसेच खोलवर मशागत होऊन माती मिसळण्यासाठी आवश्‍यक असते, तेव्हा पुरेशा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर असावा.
  • रोटाव्हेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्‍टरचा पी.टी.ओ. शाफ्ट सरळ रेषेत कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी.
  • ट्रॅक्‍टर व रोटाव्हेटरला जोडणाऱ्या प्रोपेलर शाफ्टची लांबी योग्य प्रमाणामध्ये ठेवावी. जेव्हा रोटाव्हेटर उचललेला असेल, तेव्हा युनिव्हर्सल जॉइंटचा कोन ४० अंशांपेक्षा जास्त नसावा. पी.टी.ओ. शाफ्टला योग्य प्रकारे वंगण द्यावे.
  • वंगणाअभावी ट्रॅक्‍टरच्या पी.टी.ओ. शाफ्टमधील आणि रोटाव्हेटरच्या गिअर बॉक्‍समधील बेअरिंग्ज आणि सील खराब होणार नाहीत.
  • रोटाव्हेटरची ब्लेड्स ही J, C, L इ. आकाराची असतात. ही ब्लेड्स शाफ्टवर फ्लेंजला नटांद्वारे जोडली जातात.
  • रोटाव्हेटर वापरताना घ्यावयाची काळजी

  • रोटाव्हेटरच्या पात्यांचा (ब्लेड) वेग एका मिनिटाला ३५० फेरे इतका असतो. त्यामुळे अशा चालत्या रोटाव्हेरच्या पात्याच्या संपर्कात येऊ नये.
  • वाफसा असलेल्याच शेतात मशागत करावी, अन्यथा माती शाफ्ट आणि आजूबाजूला चिकटते व रोटाव्हेटर कार्यक्षमतेने काम करू शकत नाही.
  • शेतात मोठे दगड असतील तर ते बाजूला करावेत किंवा अशा शेतात रोटाव्हेटर करताना काळजी घ्यावी, कारण दगड पात्यात मध्ये आल्यास ते फिरताना अडचण येते व शाफ्टचा लॉक नट तुटतो. हा लॉक नट शक्यतो लोड आल्यावर तुटेल असाच वापरावा, जास्त जड, न तुटणारा नट वापरू नये, कारण त्यामुळे गिअर बॉक्सला अडचण येऊ शकते.   
  • ट्रॅक्टर व रोटाव्हेटरला जोडणारा शाफ्ट व्यवस्थित खाचेत लॉक करावा, जेणेकरून फिरताना तो निघू नये.
  • दररोजची देखभाल

  • रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी. आवश्‍यकता असल्यास त्वरीत वंगण तेल भरावे.
  • रोटाव्हेटरच्या रोटावरची नांग्यांची पाती ढिली, वाकलेली किंवा मोडलेली नसावीत. नांग्यांच्या पुढच्या कडांची झीज तपासावी.
  • संपूर्ण मशिनला वंगण द्यावे व सर्व ग्रीसिंग पॉइंट्‌सना ग्रीस लावावे.
  • मशिनचे सर्व नट-बोल्ट्‌स घट्ट आवळून बसवावेत.
  •  रोटरच्या बेअरिंगमध्ये काडी-कचरा, तार किंवा अन्य काही गुंडाळलेले नाही याची खात्री करून घ्यावी.
  • कालांतराने करावयाची देखभाल

  • रोटर व रोटरवरील नांग्यांच्या पात्यांची मांडणी तपासावी.
  • गिअरबॉक्‍समधील वंगण तेलाची पातळी तपासावी, तसेच सर्व वंगण तेल बाहेर काढून गिअरबॉक्‍स स्वच्छ करावा व नवीन वंगण तेलाने भरावा.
  • नांग्यांची पाती वाकलेली असल्यास हूक - पाना वापरून सरळ करावीत. नांग्या खराब झाल्या असल्यास बदलाव्यात.
  • रोटाव्हेटरचे चेनकव्हर काढून चेन व स्प्रॉकेट चाकाची झीज तपासावी, तसेच चेनचा ताणही तपासावा व चेनला वंगण द्यावे. सर्व बेअरिंग्ज तपासून वंगण द्यावे.
  • रोटाव्हेटरचे फायदे

  • कोणत्याही प्रकारच्या मातीमध्ये याचा वापर करू शकतो.
  • मुळापासून उपटून काढावयाच्या ऊस, कापूस, केळी, ज्वारी इ. पिकांमध्ये कार्यक्षम वापर
  • पारंपरिक अवजारांपेक्षा कमी वेळेत चांगली मशागत करता येते.
  • हिरवळीचे खत बारीक करून जमिनीत गाडण्यासाठी.
  • चिखलणी करण्यासाठी
  •  निंदणी करण्यासाठी.
  •   वैभव सूर्यवंशी, ९७३०६९६५५४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com