विकासाची गंगा आली रे अंगणी...

विकासाची गंगा आली रे अंगणी...
विकासाची गंगा आली रे अंगणी...

खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या सीमेवर वाघुर प्रकल्प किंवा धरण उभारण्यात आले. त्यामुळे जामनेर तालुक्‍यातील वर्षानुवर्षे टंचाईग्रस्त, उजाड झालेल्या गावांमधील शिवार हिरवे झाले आहे. बारमाही बागायती सुरू झाली. समृद्धी चालून आली. सोबतच रोजगार वाढला. भाजीपाला शेतीसाठी धरणक्षेत्रातील लाभदायक गावांचे नाव झाले. विकासाची गंगा ‘वाघुर’मुळे खळखळ वाहू लागली. जामनेर (जि. जळगाव) तालुक्‍यातील विविध गावांतील शेती व शेतकऱ्यांची प्रगती त्यातून घडली.  खानदेशचा पट्टा केळी, भरीताचे वांगे, कापूस, कांदा, गहू आदी विविध पिकांसाठी प्रसिद्ध आहे. जामनेर तालुक्‍यातील गारखेडा, हिंगणे, चिंचखेडा, हिवरखेडा, पळासखेडा, खादगाव, माळपिंप्री आदी गावे पूर्वी जानेवारी, फेब्रुवारीत पाणीटंचाईचा सामना करायची. कापसाचा हंगाम आटोपला की शिवार उजाड व्हायचे. काही शेतकऱ्यांकडे विहिरी होत्या. पण, दोन तासही उपसा करू शकत नव्हत्या. भाजीपाल्याची जेमतेम शेती असायची. पाऊस जोरदार असलेल्या वर्षीच यातील काही गावांत हरभरा दिसायचा.  पाण्याचे संकट दूर झाले  पाणीटंचाई दूर करण्यासाठी व सिंचनाच्या दृष्टीने जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या सीमेवर वाघुर धरण प्रकल्प उभारण्यात आला. त्याद्वारे हिंगणे, चिंचखेडा भागातील भूगर्भात मुबलक जलसाठा झाला. पळासखेडा, नेरी, माळपिंप्री, हिवरखेडा आदी गावांतील शेतकऱ्यांनी वाघुर धरणातून पाच इंची जलवाहिन्या परवानी घेऊन टाकून घेतल्या. एका जलवाहिनीसंबंधी वर्षापोटी जुजबी म्हणजेच २८०० ते ३००० रुपये शुल्क पाटबंधारे विभागाकडे भरावे लागते. सुमारे १२ ते १३ हजार एकर क्षेत्र वाघुरच्या पाण्यामुळे बारमाही ओलिताखाली आले. पिण्याच्या पाण्याचे संकट कायमचे दूर झाले.  अवघे शिवार समृद्ध  पाण्यामुळे केळी, भाजीपाला, फळबागा यांचे क्षेत्र वाढले. वाघुर धरण ५० टक्के भरले, तरी या गावांमध्ये पाण्याची समस्या उद्‌भवत नाही. धरण शंभर टक्के भरले, तर जामनेरपासून अगदी जवळ असलेल्या हिवरखेडा, पळासखेडापर्यंत कांग नदीत ‘बॅकवॉटर’चे पाणी असते. खरिपात केळी व कापूस अधिक असतो. रब्बीत मका, हरभरा असतो. भाजीपाल्यांत काकडी, भेंडी, टोमॅटो, वांगी, गिलके, शेवगा आदी पिके असतात. कलिंगड, खरबुजाची शेतीही या भागात प्रसिद्ध आहे. ज्यांनी वाघुर प्रकल्पातून जलवाहिन्या आणल्या, ते आपल्या जुन्या विहिरींमध्ये पाण्याचा साठा करतात. मग या विहिरींमधून पाणी उचलून ते पिकांना ठिबकद्वारे दिले जाते.  शेतकऱ्यांमध्ये प्रेरणादायी बदल  वाघुरच्या पाण्यामुळे झालेल्या बदलाबाबत पळासखेडा (ता.जामनेर) येथील विजय वामन पाटील यांचा अनुभव खूप काही सांगून जातो. विजय, त्यांचे काका लक्ष्मण आणि भास्कर यांची शेती एकत्र आहे. त्यांचे बंधू संजय व चुलतबंधू अमोल शेती पाहतात. प्रदीप हे चुलतबंधू शिक्षक आहेत. त्यांच्याकडे सुमारे १० वर्षांपूर्वी ६० एकर शेती होती. विहिरी जानेवारीतच आटून जायच्या. दोन-चार एकरांत भाजीपाल्याची शेती ते करायचे. कमाल क्षेत्रात कोरडवाहू कापूस असायचा. पर्जन्यमान चांगले असले, तर काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू हरभरा पेरायचे. मार्चमध्येच शिवार उजाड व्हायचे. वाघुर धरणाच्या निर्मितीनंतर दहा वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या परवानगीने त्यांनी पाच इंची जलवाहिनी धरणातून टाकून घेतली. साठ एकरांतील ८० टक्के क्षेत्र बारमाही बागायतीखाली आले. केळी, संत्रा बागा वाढल्या. कापसावर हरभरा, कलिंगड घेण्यास सुरवात केली.  अशी साधली प्रगती  केळीची २१ किलोपर्यंतची रास मिळते. मागील हंगामात किलोला १४ रुपये दर मिळून उत्पन्नही चांगले मिळाले होते. कलिंगडाचे एकरी २० टन उत्पादन घेऊन ५० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.  कापसाचे एकरी १२ क्विंटल उत्पादन ते घेतात. मागील हंगामात सरासरी ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर होता. मागील १० वर्षांत ४० एकर शेती पाटील कुटुंबाने विकत घेतली. चिंचखेडा, हिंगणे, हिवरखेडा व पळासखेडा, जामनेरपर्यंत शेतीचा विस्तार झाला. वाघुरच्या पाण्याच्या जलवाहिन्या वाढविल्या. आजघडीला चार जलवाहिन्या आहेत. राष्ट्रीयीकृत बॅंकांनी त्यासाठी अर्थसाह्य केले. सुमारे २५ एकरांत दर वर्षी केळीच्या मृगबागा, तर २० एकरांत संत्रा व मोसंबीच्या बागा फुलताहेत. उर्वरित क्षेत्रात कापूस, ज्वारी व अन्य पिके असतात. दोन ट्रॅक्‍टर्स, चार बैलजोड्या, दुधाळ पशुधनाचे संगोपन पाटील करतात. सुमारे वीस महिला व १३ पुरुषांना बारमाही रोजगार त्यांच्याकडे उपलब्ध झाला आहे. आर्थिक स्थिती सुधारल्याने कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी स्वतंत्र निवासस्थानांचे बांधकाम केले. आता फक्त वडिलोपार्जित घराचे बांधकाम राहिले आहे. ही प्रगती वाघुर प्रकल्पामुळे झाल्याचे विजय सांगतात.  कोरडवाहू शेती ते उत्कृष्ट केळी उत्पादक  हिवरखेडा (ता. जामनेर) येथील जितेंद्र भिला पाटील यांची सुमारे ४५ एकर शेती आहे. साधारण १० वर्षांपूर्वी ती १०० टक्के कोरडवाहू होती. त्यांचे बंधू प्रभाकर नाशिक येथे बांधकाम व्यवसायात कार्यरत आहेत. पूर्वी गावात पिण्याच्या पाण्याचे संकट होते. शेतीला पाणी स्वप्नवतच होते. धरणाचे काम झाले तशी वाघुरमधून पाच इंची जलवाहिनी त्यांनी बसवली. त्यातून शंभर टक्के क्षेत्र ओलिताखाली आले. त्या आधारे केळीचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करणे त्यांना शक्य झाले.  प्रगतिशीलता हाच झाला परिचय  आघाडीचे केळी उत्पादक असलेले पाटील दर वर्षी सुमारे २५ हजार ते ३० हजार झाडांचे व्यवस्थापन करतात. सुमारे २२ किलोंची रास मिळते. दर्जेदार केळी व्यापारी थेट शेतात खरेदी करतात. पपईचीही लागवड असते. कापसाचे एकरी १२ ते १७ क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांनी घेतले आहे. कापसानंतर ज्वारी, हरभरा, कलिंगड घेतात. सुमारे १० मजूर वर्षभर त्यांच्याकडे कार्यरत असतात. त्यांच्याकडे एकच जलवाहिनी असून, पाणीवापरापोटी दर वर्षी ५५०० ते ५८०० रुपये ते पाटबंधारे विभागाकडे शुल्क म्हणून भरतात.  कारखाना अडचणीत येताच शेतीने तारले  चिंचखेडा (ता. जामनेर) येथील ज्ञानेश्‍वर दौलत कोळी यांनाही वाघुरच्या पाण्यामुळे शेती करण्याचे बळ मिळाले. ज्ञानेश्‍वर हे कल्याण (ठाणे) येथे कुटुंबासह राहायचे. उल्हासनगर येथे जीन्स पॅन्ट निर्मितीचा कारखाना ते चालवायचे. गावी १० एकर शेती होती. पण, ती ‘लीज’वर दिलेली. बंधू नामदेव हे सातारा जिल्ह्यात शिक्षक. कोळी यांचा कारखाना सहा वर्षे सुरू होता. सुमारे ५० मजूर तेथे काम करायचे. परंतु, काही कारणांमुळे कारखाना अडचणीत आला, तसे दोन वर्षांपूर्वी कोळी कुटुंबासह गावी आले.  शेतीनेच तारले  कोळी यांच्याकडे विहीर आहे. वाघुर धरणानजीकच क्षेत्र असल्याने त्यात मुबलक पाणीसाठा असतो. पहिल्या हंगामात केळी वगळता मिरची व अन्य पिकांमध्ये ते फारसे यशस्वी झाले नाहीत. मग तज्ज्ञांच्या मदतीने काकडी, वांग्यांची शेती केली. केळीमध्ये कोथिंबीर घेतली. मागील ऑक्‍टोबरमध्ये घेतलेल्या वांग्यांतून ताजा पैसा मार्चअखेरपर्यंत घरी येत होता. जानेवारीअखेरीस वांगी व त्यात काकडी घेतली. पाच एकरांत ऊतिसंवर्धित केळी, दोन एकरांत वांगी व काकडी अशी पीक पद्धती आहे. गावातील १० महिला मजुरांना वांगी, काकडी काढणीचे काम उपलब्ध झाले आहे. प्रतिदिन सात ते आठ हजार रुपयांच्या वांगी, काकडीचे उत्पन्न ते घेतात. त्यांची काकडी जळगावच्या बाजारात प्रसिद्ध आहे. केवळ नावावर त्यांच्या काकडीची विक्री होते. केळीची २० किलोपर्यंतची रास ते मिळवितात. मागील हंगामात एकरी दोन लाखांपर्यंत, तर या हंगामातही दीड लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न त्यांनी साध्य केले. लहान काकडीची यंदा फेब्रुवारीत प्रथमच दोन एकरांत लागवड केली. दीड महिना काढणी सुरू होती. प्रतिकिलो १० ते १५ रुपये दर बाजारात मिळाला. काकडीत लहान, हिरव्या, काटेरी वांग्यांचे उत्पादन घेतले. त्यात दीड महिन्यानंतर एक दिवसाआड सहा क्विंटल वांगे व त्याला प्रतिकिलो ५ ते १० रुपये दर मिळाला.  वाघुर धरणाची वैशिष्ट्ये 

  • तापी खोरे विकास महामंडळांतर्गत येणारा वाघुर नदीवरील मोठा प्रकल्प. 
  • जळगाव तालुक्‍यातील रायपूर येथे धरणाची जागा. 
  • त्याचे २१४९ चौरस किलोमीटर एवढे पाणलोट क्षेत्र. 
  • सुमारे ७९१.४२ वार्षिक सरासरी पर्जन्यमान. 
  • सध्याचा व भविष्यातील पाणीवापर ८३. १४ दलघमी 
  • बुडीत क्षेत्र ४९८१ हेक्‍टर 
  • बुडीत क्षेत्रातील गावे- रायपूर (ता.जळगाव), खादगाव, डोहरी, शिंगायत, हिंगणे, चिंचखेडा बुद्रुक (ता. जामनेर). 
  • हिवरखेडा (ता. जामनेर) हे गाव अंशतः बाधित. 
  • एकूण पाणीसाठा- ३२५ दलघमी 
  • मृतसाठा- ७६.७९ दलघमी 
  • धरणाची एकूण लांबी १०८० मीटर 
  • दगडी धरणाची लांबी ४२०. ७० मीटर 
  • माती बांधकामाची लांबी ६५९.३० मीटर 
  • धरणाची उंची-३९.३० मीटर 
  • डावा कालवा- १६. ८५ किलोमीटर 
  • उजवा कालवा-२४ किलोमीटर 
  • दरवाजे-२० 
  • सांडव्याची लांबी - २९७.२५ मीटर 
  • संपर्क- विजय पाटील (पळासखेडा) ९४०३०१९६६०  जितेंद्र पाटील (हिवरखेडा)- ७३५०११९७७५  ज्ञानेश्‍वर कोळी (चिंचखेडा)-९८९१८६५४७३v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com