agriculture story in marathi, vegetable farming & sericulture, takli kanada, amaravati | Agrowon

मजुरी करणाऱ्या अनंतरावांना दिला रेशीम शेतीने आधार 
विनोद इंगोले
शुक्रवार, 1 मार्च 2019

गावात वाढली रेशीम शेती 
अनंतराव खडसे यांनी टाकळी परिसरात पहिल्यांदा रेशीम शेतीचा प्रयोग केला. सन २००७ पासून त्यांचे या शेतीत सातत्य आहे. त्यांना या शेतीतून चांगले स्थैर्य मिळाल्याचे अभ्यासल्यानंतर गावशिवारातील अनेक युवा शेतकऱ्यांव्दारे रेशीम शेतीला पसंती दिली जात आहे. नव्याने तुती लागवड करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी कांद्याचे ठिबकवर आंतरपीकही घेतले आहे. 

परिस्थितीमुळे कधीकाळी मजुरी करण्याची वेळ आलेल्या अनंतराव खडसे टाकळी (कानडा) जि. अमरावती) येथील अनंतराव खडसे यांना भाजीपाला व रेशीम पिकांनी आर्थिक स्थैर्य देत सावरले. सुमारे २५ वर्षे भाजीपाला शेती व थेट विक्रीचा सज्जड अनुभव घेणाऱ्या अनंतरावांनी पुढील काळात रेशीम शेतीकडे लक्ष केंद्रित केले. अनेक वर्षांपासून त्यात सातत्य ठेवले. त्यांच्यापासून प्रेरणा घेत गावातील युवा शेतकरीही या पूरक व्यवसायाकडे वळू लागले आहेत. 
 
अमरावती जिल्ह्यात नांदगाव खंडेश्‍वर तालुक्यातील टाकळी (कानडा) येथे अनंतराव खडसे राहतात. 
त्यांच्यासह पाच भाऊ आणि दोन बहिणी व आईवडील असे मोठे कुटुंब होते. घरची पाच एकर शेती होती. मात्र वडिलांनी ती भाडेतत्त्वावर करण्यास दिली होती. साहजिकच दैनंदिन आर्थिक गरजा भागविताना ओढाताण व्हायची. त्यातूनच अनंतराव यांना गवंडी (बांधकाम) कामावर जाण्याची वेळ आली. प्रपंचाला हातभार लावण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. मग इयत्ता सातवीमध्येच शाळा सोडावी लागली. त्या काळात संपूर्ण परिवारानेच परिस्थितीचा सामना केला. 

भाजीपाला शेतीतील पंचवीस वर्षे 
नंतरच्या काळात अनंतरावांनी गवंडी कामासोबत घरच्या शेतीत राबण्यास सुरवात केली. टाकळी (कानडा) शिवारात अवघी तीन एकर शेती होती. टोमॅटो, पालक, कोबी, वांगी, मेथी आदी विविध भाजीपाला पिके घेतली जात. नांदगाव, बडनेरा, माहुली (चोर) या गावांत भरणाऱ्या आठवडी बाजारात उत्पादित भाजीपाल्याची विक्री व्हायची. जास्त उत्पादन झाल्यास अडत्याला घाऊक दराने काही वेळा माल दिला जायचा. सुमारे २५ वर्षे या पद्धतीने भाजीपाला उत्पादन व थेट विक्री अनंतरावांनी सांभाळली. 

मुलांचे शिक्षण केले पूर्ण 
अनंतरावांना तीन मुले. पैकी एक मुलगा कला शाखेतून पदवीधर, दुसरा पदव्युत्तर तर मुलगीदेखील पदवीधर आहे. ती खासगी संस्थेत शिक्षिका आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सारी आर्थिक सोय 
भाजीपाला शेतीतूनच झाल्याचे अनंतराव सांगतात. 

रेशीम शेतीची धरली कास 
मुलांच्या शिक्षणानंतर दोघापैकी एकाने ‘फॅब्रिकेशन’चा व्यवसाय स्वीकारला, तर दुसऱ्याने खासगी कंपनीत नोकरी पत्करली. दोन्ही मुले आपल्या पायावर उभी राहिल्याने अनंतराव थोडे निश्‍चिंत झाले होते. त्यांचेही वयोमान आता वाढले होते. शरीर पूर्वीसारखे साथ नव्हते. बाजारात जाऊन थेट भाजीपाला विक्री आता शक्‍य होत नव्हती. या जाणिवेतून उत्पन्नासाठी वेगळ्या पर्यायाच्या विचारात अनंतराव होते. गावाकडून बडनेरा शहरात भाजीपाला विक्रीसाठी नेत असताना ये-जा करण्याच्या वाटेतच रेशीम खात्याच्या वतीने उभारण्यात आलेले ‘रेशीम पार्क’ होते. रेशीम शेतीविषयी अनेकदा ऐकून असल्याने पार्कमध्ये जात त्याविषयी अधिक जाणून घेण्याचा निर्णय घेतला. सन २००७ मध्ये कृषी सहायक श्री. भोरे तसेच रेशीम विभागाचे सहायक संचालक श्री. हाते यांच्याकडून रेशीम व्यवस्थापनासंबंधीची माहिती घेतली. हा पर्याय अन्य पिके व व्यवसायांच्या तुलनेत फायदेशीर असल्याचे त्यांना वाटले. त्याविषयी अधिक चिंतन केल्यानंतर या व्यवसायाकडे वळण्याचा निर्णय घेतला. रेशीम पार्कमध्ये आवश्‍यक एक महिन्याचे पूरक प्रशिक्षणही पूर्ण केले. 

तुतीची लागवड 
प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष शेतीला सुरुवात दीड एकरांवर तुती लागवडीपासून झाली. रेशीम पार्कमधूनच बेण्याची खरेदी झाली. सुरुवातीच्या काळात पाल्याची उपलब्धता कमी असल्याने सुरुवातीला ५० अंडीपूंजांपासून रेशीमकोष निर्मिती सुरू झाली. 

कमी खर्चाच्या शेडची उभारणी 
सन २०१० मध्ये ५० बाय ३२ फूट क्षेत्रफळ आकाराच्या शेडची उभारणी केली. त्यासाठी विटांचा वापर केला. पूर्वी गवंडी कामावर जात असल्याने त्याचा अनुभव कामी आला. कमीत कमी खर्चात शेड उभारताना केवळ ७० ते ८० हजार रुपयांत हे काम झाले. शेड उभारणीमुळे कोष निर्मितीला स्थिरता येत उत्पादनालाही चालना मिळाली. 

पाण्याचा स्रोत 
शेतात एकाच विहिरीचा पाण्यासाठी स्त्रोत आहे. सन २०१२-१३ मध्ये पाऊस कमी झाल्याने विहिरीतील पाणी आटले. परिणामी शेताच्या दुसऱ्या भागात लागवड असलेल्या तुतीला पाणी कमी पडू लागल्याने ती सुकून गेली. मग सन २०१४ मध्ये शेडलगत असलेल्या भागात तुतीची लागवड केली. आता सव्वा एकरांवर तूती आहे. त्यातूनच रेशीम कीटकांची अन्नाची गरज भागविली जाते.  शेतीला कुंपण तसेच अळ्यांसाठी पाल्याची उपलब्धता असा दुहेरी हेतू साधत दीड एकरातील क्षेत्राच्या बांधावरही तुतीची झाडे लावली आहेत. 

शेणखताचा वापर 
शेतातील पालापाचोळा तसेच शेणखत एका खड्डयात बुजविण्यासाठी टाकले जाते. एस-० कल्चरचा वापरही यात केला जातो. त्यानंतर चांगल्या कुजलेल्या खताचा वापर शेतीत केला जातो. दरवर्षी अशा प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठांचा पुरवठा जमिनीला करण्यावर भर राहतो. त्यामुळे जमिनीचा पोत राखण्यास आणि तुतीचा दर्जेदार पाला मिळण्यास मदत होते, असा अनुभव आहे. 

उत्पादन 
पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षभरात पाच, सहा बॅचेस घेतल्या जातात. पुरेसे पाणी नसल्यास बॅचेसची संख्या चारवर येते. प्रतिबॅचमध्ये सुमारे दीडशे अंडीपुंज राहतात. हवामान पोषक आणि व्यवस्थापन योग्य राहिल्यास दीड क्‍विंटलपर्यंत कोष उत्पादन मिळते. प्रतिकूल परिस्थितीत हेच उत्पादन एक क्‍विंटलपर्यंत राहते, असा खडसे यांचा अनुभव आहे. 

विक्री व मार्केटिंग 
सुरवातीला बडनेरा (जि. अमरावती) येथील रेशीम पार्कमध्ये कोष विक्री केली. त्यानंतर हैदराबाद येथील मार्केटमध्ये विक्रीत सातत्य राहिले आहे. वाहतुकीसाठी अमरावती ते हैदराबाद खासगी आणि एसटी महामंडळाच्या बसेस आहेत. काही वेळा कोषांना कमाल दर ४०० ते ४५० रुपयांपर्यंत मिळतात. 
यावर्षी हे दर २०० ते २५० रुपये प्रतिकिलोपर्यंत राहिल्याचे खडसे यांनी सांगितले. 

नव्याने दोन एकर शेतीची खरेदी 
रेशीम शेतीने खडसे यांना आर्थिक स्थैर्य दिले. परिणामी कौटुंबिक गरजा भागविल्यानंतर पैशांची सोय झाल्याने धानोरा गुरव शिवारात नव्याने दोन एकर शेती खरेदी करणे शक्य झाले. प्रयत्नांत सातत्य असले की यश हमखास मिळते हा विश्‍वास कधीकाळी गवंडी कामावर जाऊन मजुरी करणाऱ्या अनंतरावांनी आपल्या कृतीतून सिद्ध केला आहे. 

संपर्क- अनंतराव खडसे- ९४२३१५३९५९

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...