agriculture story in marathi, water conservation, village development, sakhara, vashim | Agrowon

दुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’ 
गोपाल हागे, राम चौधरी 
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

विहिरीला पाणी वाढल्याने वर्षभर पिके घेण्याचे नियोजन करतो. पूर्वी दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत पाणी राहायचे. अाता दिवाळीनंतरही विहीर तुडुंब भरली अाहे. खरिपाबरोबर रब्बी हंगामातील व सोबत भाजीपाला पिके घेत अाहे. 
- ज्ञानेश्वर सखाराम इंगळे, साखरा 

लोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ शकतात. अशीच किमया वाशीम तालुक्यातील साखरा गावात घडली. कायम दुष्काळाशी झगडणाऱ्या या गावात यंदा पाण्याची तसूभरही टंचाई दृष्टीस पडत नाही. दिवाळीनंतर आटणाऱ्या विहिंरींची पातळी सद्यःस्थितीत अगदी वरती आहे. शेतीला संरक्षित सिंचनाची सोय होण्याबबरोबर पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटली. शासकीय योजनांचे पाठबळ, गावकऱ्यांचा हिरिरीचा सहभाग साखरा गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला आहे. 

वाशीम जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किलोमीटरवर साखरा हे आदर्श गाव आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. मात्र या गावचे शिवार सद्यःस्थितीत हिरवेगार असल्याचे दृष्टीस पडते. त्याचे कारण गावात पाणी आहे. सुरवातीला राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत साखरा गावाची निवड झाली होती. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी गावात भेट देऊन योजनेबाबत मार्गदर्शन केले होते. यातून खरी गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली. मग विकासाबाबतीत त्यावेळी मागे असलेले साखरा अाजचे अादर्श, पाणीदार गाव म्हणून अोळख तयार करण्यात यशस्वी झाले. 

अष्टसूत्रीत प्रत्येकाचे योगदान 
विकासात गावातील प्रत्येक कुटुंबाने योगदान देण्याचा निश्चय केला. त्यातूनच खऱ्या अर्थाने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरवात झाली. आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्रत्येक गावात नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, श्रमदान, बोअरवेलबंदी, लोटाबंदी आणि पाण्याचा ताळेबंद ही सप्तसूत्री अमलात आणली जाते. साखरा गावाने या सप्तसूत्रीत अाणखी भर घातली ती म्हणजे शिक्षणाची. या विषयाचा समावेश करून अष्टसूत्री तयार केली व त्याची अंमलबजावणी केली. 

विकासाची गंगा 
गावकऱ्यांचा लोकसहभाग आणि श्रम यांनी किमया घडवली. त्यातून गावाला राज्य स्तरावर ओळख मिळाली. विविध योजनांचे पुरस्कार मिळाले. सन २०१५-१६ या वर्षात राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात पहिल्याच वर्षी गावाची निवड करण्यात आली. साखरा हे १८९ उंबरठ्याची वस्ती असलेले सुमारे ११०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील दीडशेपेक्षा अधिक कुटुंबाचा व्यवसाय हा केवळ शेतीच आहे. हे गाव २०११ पूर्वी भीषण दुष्काळाला सामोरे जात होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेजारच्या गावांमध्ये भटकंती करावी लागे. शेतीची सारी भिस्त पावसाच्या पाण्यावरच होती. आज त्याच गावातील नाले जिवंत होऊन झुळूझुळू वाहतानाचा त्यांचा मंजूळ स्वर कानी पडतो. गाव जलसंपन्न झाल्याने परिसरातील गावे या ठिकाणावरून पाणी नेऊ लागली आहेत. शेतकरी खरीप, रब्बी पिकांसोबतच भाजीपाला, फळबागा घेऊ लागल्या अाहेत. 

जाणले पाण्याचे मोल 
गावच्या शिवारात पडणारा पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवण्यासाठी कामे झाली. अख्खे गाव जलसाक्षर झाले. जिरायती शेती करताना बहुतांश शेतकरी सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर घ्यायचे. उत्पन्नही जेमतेम मिळायचे. ग्रामसभेच्या माध्यमातून आदर्शगाव योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. खोल समपातळी चर तयार करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भात पाण्याची साठवणूक होऊ लागली. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला. तीन मीटर खोल आणि आठ मीटर रुंद असा अडीच किलोमीटर पर्यंत नाला खोलीकरण केले. 
या दरम्यान २२ ‘स्ट्रक्चर्स’ तयार केले. याच नाल्यावर चार ठिकाणी सिमेंट नालाबंधारे बांधले. जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातून चार गॅबियन बंधारे, चार ‘रिचार्ज शाफ्ट’ व एका भूमिगत बंधाऱ्याची निर्मिती केली. 

विहिरींच्या पातळीत वाढ 
नाला खोलीकरण, भूजलपातळी वाढ या माध्यमातून आजूबाजूला असलेल्या ६५ विहिरींतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नाल्याच्या दोन्ही बाजूची अडीचशे हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली. पाण्याच्या मुबलकतेमुळे रब्बीतदेखील हरभरा, गहू, भेंडी, पालक, दोडका, लसूण, कांदा, मेथी, कोबी, कोथिंबीर पिके घेणे शक्य झाले. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला. शेतकऱ्यांच्या हाती येणारा पैसा वाढला. पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. माजिक व आर्थिक सुधारणेसही मदत झाली. 

गावची शाळा लई भारी! 
गावात सध्या ६२८ विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. नर्सरीपासून अाठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा अाहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ अनेक ठिकाणी अाली असताना साखरा येथे मात्र शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतात. सोडत काढून प्रवेश दिला जातो. या शाळेत परिसरातील २२ गावांमधील मुले शिक्षणासाठी येतात. यातूनच शाळेचा लौकीक स्पष्ट होतो. गावकरी व शिक्षकांची मेहनत यामागे कारणीभूत आहे. पहिली ते अाठवीपर्यंत ४४८ तर ‘कॉन्व्हेंट’मध्ये १८० विद्यार्थी अाहेत. 

भूषणावह शाळा 
जिल्हा परिषद अांतरराष्ट्रीय अोजस शाळा साखरा असे नाव शाळेला मिळाले आहे. देशात अांतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० व राज्यात १३ शाळा उघडण्यात येणार अाहेत. त्यापैकी साखरा गावची शाळा अाहे. याचे गावकऱ्यांना भूषण आहे. या ठिकाणी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशनल बोर्ड’चा अभ्यासक्रम शिकवला जातो. ग्रामीण भागातील पिढी यामुळे अांतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच घेऊ शकणार अाहे. गावकऱ्यांनी शाळेसाठी एकजुटीतून सुमारे २० लाख रुपये संकलित केले. यातून शाळेसाठी जागा खरेदी केली. भौतिक सुविधा, खेळांसाठी साहित्य अाणले. जिल्हा परिषदेची दुमजली शाळा असून, प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या आहेत. 

प्रतिक्रिया
आठ वर्षांत सातत्याने होत असल्याने कामांमुळे अामच्या गावाचे चित्र पालटले. अादर्श गाव, जलयुक्त शिवार व अन्य योजनांच्या माध्यमातून छोटेसे साखरा पाणीदार झाले अाहे. यासाठी प्रशासनाचे सहकार्य, गावकऱ्यांचा लोकसहभाग महत्त्वाचा ठरला. 
- सुखदेवराव इंगळे 
ग्रामकार्यकर्ता तथा जलमित्र, साखरा,
संपर्क- ९६२३६४५३१२ 

माझ्या सात एकर शेतातील विहिरीत अवघ्या १० फुटांवर पाणी अाहे. वर्षभर ते पिकांना पुरेल. 
लिंबाची अर्धा एकर बाग लावली. भाजीपालाही घेत अाहे. 
- लक्ष्मण राऊत, शेतकरी, साखरा 

गावाने लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. गावात शांतता, समृद्धी नांदते अाहे. निवडणुका बिनविरोध होऊ लागल्या आहेत. मलाही सरपंचपदी बिनविरोध निवडून देण्यात आले आहे. 
- चंद्रकलाबाई नामदेव इंगळे, सरपंच, साखरा

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
गिलक्‍याने दिले अर्थकारणाला बळबाजारपेठेची गरज ओळखून कठोरा (ता. जि. जळगाव) येथील...
सेवानिवृत्तीनंतर शिक्षकाची शेतीत सेवा...आयुष्यभर नोकरी करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा...
विदर्भात उत्कृष्ट व्यवस्थापन असलेली २३...वर्धा जिल्ह्यात केळी पिकाला पुन्हा गतवैभव प्राप्त...
वर्षभरात पाच हंगामात दर्जेदार कोथिंबीरपाणी व हवामान यांचा विचार करून वर्षभरात सुमारे...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...
पशुपालन, प्रक्रिया उद्योगात नेदरलॅंडची...शास्त्रीय पद्धतीने पशुपालन, दुग्धोत्पादन आणि...
आदिवासी पाड्यावर रुजली कृषी उद्योजकताकोणे (ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) येथील आदिवासी...
दोनशे देशी गायींच्या संगोपनासह ...सुमारे दोनशे देशी गायींचे संगोपन-संवर्धन यासह...
अर्थकारण उंचावणारी उन्हाळी मुगाची शेती वाशिम जिल्ह्यातील पांगरी नवघरे येथील दिलीप नवघरे...
शंभर एकरांत सुधारित तंत्राने शेवग्याची...नाशिक जिल्ह्यातील पवारवाडी (ता. मालेगाव) येथील...
निर्धारातून टाकोबाईची वाडीच्या...सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग...
निसर्गरम्य पन्हाळा तालुक्यात ...कोल्हापूर जिल्ह्यातील डोंगराळ, निसर्गरम्य पन्हाळा...
दुष्काळात स्वयंपूर्ण शेतीचा आदर्श,...नव्वद क्विंटल तूर, ३० क्विंटल ज्वारी व हरभरा, १५०...
उच्चशिक्षित कृषी पदवीधराने उभारला...गोपालपुरा (जि. आणंद, गुजरात) येथील एमएस्सी...
अभ्यासातून शेतीमध्ये करतोय बदलवेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील महाविद्यालयात...
आळिंबी, गव्हांकुर उत्पादनातून बचत गटाची...गोद्रे (ता. जुन्नर, जि. पुणे) गावातील महिलांनी...
कुटुंबाची एकी, सुधारित तंत्र, शिंदे...नांदेड जिल्ह्यातील वसंतवाडी येथील शिंदे परिवाराला...
दुष्काळात बाजरी ठरतेय गुणी, आश्‍वासक... कमी पाणी, कमी कालावधी, अल्प खर्चातील बाजरी...
AGROWON AWARDS : नैसर्गिक, एकात्मिक...ॲग्रोवन महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कार...
रडायचं नाही, आता लढायचं : वैशाली येडे पुणे : सावकाराचे कर्ज डोक्यावर ठेवून पतीने...