मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर उघडीप शक्‍य

डॉ. रामचंद्र साबळे
डॉ. रामचंद्र साबळे

सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्राच्या सर्वच भागात पावसाची शक्‍यता कमी-अधिक प्रमाणात राहील. ता. १५ ऑक्‍टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. ता. १६ ऑक्‍टोबरपासून पुढे पावसाची शक्‍यता कमी होईल. ता. १९ व २० ऑक्‍टोबर रोजी पूर्वेकडील विदर्भाच्या भागात पावसाची शक्‍यता राहील. एकूणच या आठवड्यातील १७ ऑक्‍टोबरनंतर हवामान ढगाळ राहणार नाही. पावसाची शक्‍यताही कमी होईल.

महाराष्ट्राच्या उत्तर-दक्षिण दिशेने सह्याद्री पर्वतरांगांपासून ते कोकण किनारपट्टीपर्यंत १००६ हेप्टापास्कल हवेचा दाब राहणार असल्याने कोकणात अल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. तसेच दक्षिणेकडील बंगालच्या उपसागराच्या भागावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार असल्याने त्या भागाच्या जवळील पूर्वकिनारपट्टीवर म्हणजेच तमिळनाडू भागात जोरदार पावसाची शक्‍यता राहील.

रविवारी (ता. १५) कोकण किनारपट्टी ते सह्याद्री पर्वतरांगा आणि त्यास लागून असलेल्या प्रदेशात तसेच उत्तर व दक्षिण महाराष्ट्रात आणि मराठवाडा व विदर्भात अल्प ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. ता. १७ ऑक्‍टोबरपर्यंत हे वातावरण कायम राहील. मात्र त्यावेळी बंगालच्या उपसागराच्या भागात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल आणि पूर्व किनारी भागात पावसाचा जोर वाढणे शक्‍य आहे. ता. १८ ऑक्‍टोबर रोजी बंगालच्या उपसागरात चक्रिय वादळ तयार होण्याची शक्‍यता आहे. ता. १९ ऑक्‍टोबर गुरुवार रोजी ओरिसा भागात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव वाढेल आणि पाऊस होईल. त्याचा प्रभाव पूर्व मराठवाडा व पूर्व विदर्भावरही जाणवेल. ता. २० ऑक्‍टोबर, शुक्रवार रोजी विदर्भाच्या पूर्व भागात व मराठवाड्याच्या व पश्‍चिम महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागावर म्हणजेच, पुणे, सातारा, सांगलीचा पूर्व भाग, सोलापूर तसेच उस्मानाबाद, लातूर, बीड, नांदेडच्या भागातही पावसाची शक्‍यता आहे. कारण त्याभागावर १००४ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे.

एकूण सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी महाराष्ट्राच्या सर्वच भागात पावसाची शक्‍यता कमी-अधिक प्रमाणात राहील. ता. १५ ऑक्‍टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे. ता. १६ ऑक्‍टोबरपासून पुढे पावसाची शक्‍यता कमी होईल. ता. १९ व २० ऑक्‍टोबर रोजी पूर्वेकडील विदर्भाच्या भागात पावसाची शक्‍यता राहील. एकूणच या आठवड्यातील १७ ऑक्‍टोबरनंतर हवामान ढगाळ राहणार नाही. पावसाची शक्‍यताही कमी होईल.

कोकण रत्नागिरी जिल्ह्यात काही दिवशी १५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवशी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. रायगड व ठाणे जिल्ह्यांत काही दिवशी ८ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत येत्या दोन दिवस पावसाची शक्‍यता असून, प्रतिदिनी ८ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस आणि धुळे व जळगाव जिल्ह्यात किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

मराठवाडा नांदेड, बीड जिल्ह्यांत येत्या दोन ते तीन दिवसांत प्रतिदिनी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, परभणी जिल्ह्यात १२ मिलिमीटर आणि लातूर व हिंगोली जिल्ह्यात औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यात ८ मिलिमीटर व जालना जिल्ह्यात काही दिवशी ६ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.

बीड व नांदेड जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र या आठवड्यातील काही दिवशी ११ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत ७ ते ९ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत अग्नेयेकडून सांगली, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत नैऋत्येकडून तर नगर जिल्ह्यात वायव्येकडून राहील. सोलापूर व पुणे जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील, तर कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील आणि उर्वरित जिल्ह्यांत ते ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील.

पश्‍चिम विदर्भ  वाशीम जिल्ह्यात १० मिलिमीटर पावसाची या आठवड्याचे पहिल्या दोन ते तीन दिवसांतच शक्‍यता राहील. उर्वरित बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत केवळ ४ ते ५ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. आणि बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील.

अकोला जिल्ह्यात किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील, तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

मध्य विदर्भ नागपूर जिल्ह्यात या आठवड्याच्या पहिल्या २ ते ३ दिवसांत १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ५ ते ८ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे.  कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील तर किमान तापमान २१ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील.

पूर्व विदर्भ गडचिरोली जिल्ह्यात या आठवड्यातील पहिल्या २ ते ३ दिवसांत प्रतिदिनी १० मिलिमीटर पावसाची शक्‍यता असून, गोंदिया जिल्ह्यात ४ मिलिमीटर व भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांत ६ ते ७ मिलिमीटर पावसाची शक्‍यता आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. आणि गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कृषी सल्ला

  • पावसात उघडीप होताच खरीप पिकांच्या काढण्या कराव्यात. हळव्या जातीच्या भाताची काढणी करून झोडणी करावी. धान्य उन्हात वाळवून साठवण करावी.
  • कोबी, नवलकोल, फ्लॉवर, कांदा, कोबी यांच्या रोपवाटिका तयार कराव्यात. गादी वाफ्यावर रोपे तयार करावीत.
  • कांदा पिकाच्या पातीची विक्री करण्यासाठी रोपे तयार असल्यास लागवड करावी. पीक ६० दिवसांचे  होताच जुड्या बांधून विक्री करावी.
  • गहू पेरणीसाठी जमिनीची तयारी करावी. हरभरा पिकाची पेरणी  पुर्णकरून सारे व पाट पाडावेत.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com