थंडी वाढेल, हवामान कोरडे राहील

अाठवड्याचे हवामान
अाठवड्याचे हवामान

महाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर १०१२ हेप्टापास्कल इतका तर उर्वरित पश्‍चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहणार आहे. जेव्हा हवेचे दाब वाढतात, तेव्हा किमान तापमानात घट झालेली असते आणि हवामान थंड राहते. मात्र हे हवेचे दाब थंडीचे प्रमाण मध्यम स्वरूपात राखण्याइतपतच आहेत. त्याशिवाय हवामान ढगाळ राहण्यामुळे थंडीचे प्रमाण मध्यम प्रमाणात राखले जाईल. अर्थात उत्तर महाराष्ट्रात व विदर्भात किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल.

२५ डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा व पश्‍चिम महाराष्ट्रातही किमान तापमान ८ ते १० अंश सेल्सिअस राहणे शक्‍य असून, हे किमान तापमान गहू, हरभरा, रब्बी ज्वारी या पिकांना उत्तम असेल. याशिवाय उसामधील साखर उतारा वाढण्यास अनुकूल ठरेल. याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील सटाणा तालुक्‍यात वेगळ्या पद्धतीने द्राक्षाचा बहर धरला जातो. तेथील द्राक्षे तयार होण्याच्या अवस्थेत आहेत. मालेगाव तालुक्‍यातील काही द्राक्षबागांत माल तयार अवस्थेत येत आहे. तेथील द्राक्षांची गोडी वाढवण्यास हे हवामान अनुकूल राहील. २६ डिसेंबर रोजी उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र व विदर्भात थंडीचे प्रमाण कायम राहील.

२७ डिसेंबरपासून थंडीचे प्रमाण वाढेल आणि किमान तापमान संपूर्ण महाराष्ट्रात आणखी घसरण्यास सुरवात होईल. डिसेंबर महिन्याचा हा शेवटचा आठवडा असल्याने या आठवड्यात वर्षातील ५२ आठवड्यांपैकी अतिथंड हवामान राहते. परंतु, हवामान बदलामुळे गेले २ ते ३ वर्षे जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापेक्षाही थंड हवामान राहते. समुद्राच्या पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यच राहील. त्यामुळे हवामान ढगाळ राहील. पावसाची शक्‍यता नाही.

१) कोकण ः ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस आणि रायगड जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस कमाल तापमान राहील. ठाणे जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील, तर रायगड व गडचिरोली जिल्ह्यांत २१ ते २२ अंश सेल्सिअस आणि रत्नागिरी जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस किमान तापमान राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७७ टक्के, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ६४ ते ६६ टक्के आणि ठाणे जिल्ह्यात ५९ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे जिल्ह्यात २० टक्के इतकी कमी राहण्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. रायगड जिल्ह्यात केवळ २९ टक्के सापेक्ष आर्द्रता राहण्यामुळे हवामान दुपारी अत्यंत कोरडे राहील. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ७ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

२) उत्तर महाराष्ट्र ः जळगाव जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. जळगाव जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील, तर नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान केवळ १० अंश सेल्सिअस इतके कमी राहील. त्यामुळे सकाळी व दुपारी थंडी जाणवेल. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ४७ टक्के, तर उर्वरित नाशिक, नंदुरबार व धुळे जिल्ह्यांत ४० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

३) मराठवाडा ः जालना, औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. नांदेड जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर लातूर, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. लातूर व बीड जिल्ह्यांत किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान १४ अंश सेल्सिअस राहील. जालना जिल्ह्यात किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांत किमान तापमान १२ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात ११ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यांत ६२ ते ७५ टक्के राहील. तर लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ४१ टक्के राहील. परभणी, हिंगोली व औरंगाबाद जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५१ टक्के राहील. आणि उर्वरित जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३९ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ६ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा अाग्नेयेकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

४) पश्‍चिम विदर्भ ः पश्‍चिम विदर्भातील वाशीम जिल्ह्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील तर उर्वरित बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ९ अंश सेल्सिअस राहील तर वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता वाशीम जिल्ह्यात ४८ टक्के राहील तर अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांत ६० ते ६५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता बुलडाणा जिल्ह्यात ३० टक्के तर उर्वरित अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत १६ ते १८ टक्के इतकी कमी राहील. आणि त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

५) मध्य विदर्भ ः मध्य विदर्भात कमाल तापमान ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ५० टक्के, तर उर्वरित यवतमाळ व वर्धा जिल्ह्यांत ६० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २० ते ३० टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.

६) पूर्व विदर्भ ः पूर्व विदर्भातील चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान ८ अंश सेल्सिअस इतके कमी राहील, तर भंडारा जिल्ह्यात किमान तापमान ९ अंश सेल्सिअस राहील, आणि चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत किमान तापमान १० अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४७ ते ५५ टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत २१ ते २२ टक्के इतकी कमी राहील आणि भंडारा जिल्ह्यात ३० टक्के व गोंदिया जिल्ह्यात ३५ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किलोमीटर व वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्‍यता नाही.

७) दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः सांगली व सोलापूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस राहील व सातारा, पुणे व नगर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नगर जिल्ह्यात १० अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात किमान तापमान २० अंश सेल्सिअस राहील, तर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत १७ ते १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर जिल्ह्यात सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ टक्के राहील. नगर व सांगली जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७७ टक्के राहील. सातारा व पुणे जिल्ह्यांत ६१ ते ६२ टक्के आणि सोलापूर जिल्ह्यात ५६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ४४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ८ किलोमीटर राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील.   कृषी सल्ला ः

  • कलिंगड, काकडी, खरबूज, भेंडी, उन्हाळी भुईमूग या पिकांच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करावी. एक नांगराची पाळी देऊन जमीन तापू द्यावी.
  • थंडीपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी बागेत पहाटे जागोजागी शेकोट्या पेटवून धूर करावा, त्यामुळे बागेतील तापमान २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढेल आणि कडाक्‍याच्या थंडीपासून पिकांचे संरक्षण होईल.
  • कुक्कुटपालनाचे शेड, झाप बांधून बंदिस्त करावेत आणि लहान पक्षी असल्यास शेडमध्ये बल्ब लावून आतील तापमान वाढवण्याचा प्रयत्न करावा.
  • पिकांना सायंकाळी पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीचे तापमान योग्य राहण्यास मदत होईल.
  • (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ अाणि सदस्य संशोधन परिषद, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली व वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com