ऑक्‍टोबरमधील उष्णतेमुळे होणारे त्वचाविकार

ऑक्‍टोबरमधील उष्णतेमुळे होणारे त्वचाविकार

ऑक्‍टोबर महिन्यात वातावरणात प्रचंड उष्णता वाढल्याने शारीरिक तक्रारी उद्‌भवतात. जास्त प्रमाणात त्वचेवरच लक्षणे दिसू लागतात. ऑक्टोबरमधील उष्णता सुसह्य व्हावी म्हणून आणि त्वचेचे सौंदर्य टिकावे म्हणून सुरवातीपासूनच काळजी घ्यावी.   ऑक्‍टोबरमध्ये जास्त त्रास होण्याची कारणे म्हणजे वातावरणातील उष्णता, दगदगीचे आयुष्य, उन्हात श्रम करणे, जेवणात तिखट मसालेदार पदार्थ घेणे, दही, आंबट ताक, लस्सी, बाहेरचे तळलेले पदार्थ, चायनीज पदार्थ, निरनिराळी व्यसने या कारणांनी शरीरातील उष्णता वाढते व तक्रारींना प्रारंभ होतो.

घामोळे येणे, त्वचा कोरडी होणे, उन्हातून जाऊन आले की त्वचा लालसर होऊन रॅश उठणे, खाज येणे, नागीणसदृश फोड येणे, त्वचा काळवंडणे अशी कितीतरी लक्षणे दिसतात. पूर्वीचे त्वचाविकार या ऋतूत पुनश्‍च त्रास देऊ लागतात. त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे, पथ्य काय पाळले पाहिजे याची  कल्पना असायला हवी.  

लक्षणे

  • व्यक्ती आणि व्याधींनुरूप लक्षणे भिन्नभिन्न आढळून येतात. खरूज या प्रकारात खाज भरपूर प्रमाणात असते. त्यात कोरडी खरूज असल्यास बारीक फोड सर्वांगावर येतात. काही वेळा त्यात पूयोत्पत्तीसुद्धा होते. अशावेळी आग होणे हे लक्षण जाणवते. याला ‘स्कॅबीस’ म्हणतात.
  • पित्तप्रधान प्रकृती असल्यास पुंजक्‍याच्या स्वरूपात फोड येतात. आग होणे, वेदना ही लक्षणे असून, त्या फोडात पाणी भरलेले असते, हे फोड पसरत जातात. त्याला नागिणीचे फोड म्हणतात. शरीरावर कुठेही हे फोड येतात. प्रचंड आगीने रुग्ण त्रस्त होतो.
  • ऑक्‍टोबरचा उन्हाळ्यात हा त्रास अधिक जाणवतो. या दिवसांत आणखी आढळून येणारे लक्षण म्हणजे त्वचा काळवंडणे, उन्हामुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊन त्वचेचा रंग बदलतो. मानेवर, पाठीवर जास्त उठते. काही जणांमध्ये त्वचा खूप कोरडी पडून प्रचंड खाज येते.
  • उपचार

  • सर्वप्रथम अंगाला साबण लावणे बंद करावे. त्याऐवजी मसुरीच्या डाळीचे पीठ किंवा चण्याच्या डाळीचे पीठ दुधात कालवून लावावे. खरूज कोरडी असेल तर दुधात कालवून लावावे.
  • स्नानाच्या आधी त्वचेवर खोबरेल तेल लावावे. त्वचा कोरडी असेल तर तेल लावल्याने फायदा होतो; पण त्वचेवर पाण्याचे फोड असतील तर मात्र पोटात औषधे घ्यावीत. त्याला तेल लावू नये.
  • चंद्रकला वटी, प्रवाळपिष्टी वटी यामुळं आग कमी होते. दशांग रक्तशुद्धीक औषधे वापरल्यास फायदा होतो; पण त्याची मात्रा लक्षणांच्या तीव्रतेनुसार ठरते.
  • औषधांच्या जोडीला दुर्वांचा रस लावल्यानेही फायदा होतो. आग कमी होते. नागिणीच्या फोडांवर चांगला परिणाम होतो. हे फोड जेव्हा सुकतात, तेव्हा फार खाज येते.  
  • दशांग लेप लावल्यानेही परिणाम चांगला होतो. गुळवेल, अडुळसा, कडुलिंबाची साल, वाटाण्याची शेंग यांचा काढा त्वचेतरीला फोडांवर उपयोगी ठरतो. त्याचप्रमाणे धमासा, गुळवेल, धने पाण्यात रात्री भिजत घालून सकाळी सेवन केल्यास नागीण, उष्णतेचे फोड कमी होण्यास मदत होते.
  • या पाण्याने शरीरातील उष्णता कमी होते. बऱ्याचदा उन्हात खूप काम केल्याने त्वचा काळवंडते व कोरडी बनते. अशावेळी अनंत मूळ, चंदन, ज्येष्ठमध यांची पावडर दुधात मिसळून व चेहऱ्याला लेप लावल्यास फायदा होतो. पोटात औषधे घेणे आवश्‍यक असतेच.
  • घेण्याची काळजी  

  • आहारात दही, टोमॅटो, लोणचे, पापड, तळलेले चमचमीत पदार्थ थोडे दिवस वर्ज करावेत.
  • उन्हात जाताना सनकोट वापरावा.
  • कोकम सरबत, फळे, फळांचे रस, गोड ताक यावर भर द्यावा. पाणी भरपूर प्यावे.
  • (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com