सतत ढेकर येण्याची कारणे

महिला आरोग्य
महिला आरोग्य

उत्तम जेवण झाल्यावर ‘ढेकर येणे'' हे व्यवस्थित पोट भरण्याचे लक्षण आहे. ही नैसर्गिक गोष्ट आहे. पण बऱ्याचदा दिवसभर सारखे ढेकर येत राहतात. मग कधी आंबट, करपट तर कधी नुसतेच तर कधी खाल्लेल्या अन्नाची ढेकर येते. ढेकर नाही अाली तर त्या व्यक्तीला फार अस्वस्थ वाटते आणि पोटात जडपणा जाणवतो. सारखे ढेकर येणे विकृतीचे लक्षण आहे. यामागे कोणती कारणे असू शकतात, हे जाणून घेऊया.

कारणे

  • सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे जेवणाची वेळ चुकणे! आपल्या घरी सणवार असल्यास कामाच्या नादात काही न खातापिता चहाचा मारा केला जातो. शिवाय पाहुणे, घरातील मोठी माणसे जेवल्याशिवाय जेवणार नाही हा नियम पाळल्याने पित्त बिघडते, पचनशक्ती मंदावते.
  • अवेळी उशिरा केलेले जेवण नीट पचत नाही आणि गॅसेस होतात, ते ढेकरद्वारे बाहेर पडतात.
  • चहा रिकाम्या पोटी घेतल्याने पित्त वाढते. परिणामी, कधी आंबट ढेकरही येतात. सण वारा व्यतिरिक्तसुद्धा अधूनमधून बऱ्याचदा ढेकर येण्याचा त्रास अनेकांना होताना दिसतो. फार काळजी करावी इतके गंभीर नसले तरी पचनावर परिणाम झाला असल्याने दुर्लक्ष करणे योग्य नाही.
  • मलावरोध, उपवासाचा अतिरेक, कोरडे जेवणे, चणे फुटाणे, तसेच सतत फरसाण, चुरमुरे खाण्याची सवयही आपल्या नकळत कारणीभूत ठरते. या सवयी कमी करणे महत्त्वाचे आहेच पण त्याच्याजोडीने काही उपाय केले, तर चांगला फायदा होतो.
  • उपाय

  • सर्वप्रथम गरम पाण्यात लिंबू पिळून मीठ घालून त्वरित प्यावे.
  • ओवा आणि मीठ चावून खावे आणि गरम पाणी प्यावे. ओवा, जिरे, हळीव, मेथ्या न भाजता समप्रमाणात एकत्र करून पावडर करावी व अर्धा चमचा प्रमाणात गरम पाण्यातून घ्यावी. त्यामुळे पोटाचा जडपणा कमी होतो.
  • बडीशेप (मीठ न लावलेली) पाण्यात उकळून ते पाणी प्यावे. आले आणि लिंबाचा रस मधाबरोबर घ्यावा. त्यामुळे पचन सुधारते आणि गॅसेस कमी होऊन ढेकर येणे थांबते. ही सर्व औषधे स्वयंपाकघरातील असल्याने त्वरित उपाय करता येतो.  
  • कितीही कामाचा व्याप असला तरी सकाळची न्याहारी झालीच पाहिजे. रिकाम्या पोटी चहा कॉफी कधी घेऊ नये. जेवणाची वेळ चुकली तर फार पोटभर न जेवता त्या वेळी थोडेच खावे आणि रात्री लवकर जेवावे. कारण अवेळी खाल्लेले अन्न पचण्यास कठीण जाते.  
  • वारंवार ढेकर येणे हा त्रास जुना असला तर नियमितपणे औषधे घ्यावी. वातूळ पदार्थ, भेळ फुटाणे शक्‍यतो टाळावेत, पोट साफ ठेवावे.
  • करपट ढेकर येत असतील तर मोरावळा, सुतशेखर वटी खावी. डाळिंब खावे.   - डॉ. विनिता कुलकर्णी (लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ज्ञ अाहेत.)
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com