हिवाळ्यातील दिनचर्या, अाहाराचे स्वरुप

स्त्रियांसाठी अायुवेर्द
स्त्रियांसाठी अायुवेर्द

थंडीमध्ये कोणते कपडे घालावेत यापासून ते आहार कसा असावा, काही छोटे मोठे आजार झाल्यास सहजपणे कोणते उपचार त्वरित केले पाहिजेत, पथ्य काय पाळले पाहिजे या विविध गोष्टींची माहिती असायला हवी.

वातावरणातील हा बदल मन प्रसन्न करतो खरा. पण शारीरिक आरोग्य साथ देतेच असे नाही. ऋतुनुसार काही आवश्‍यक बदल काही पथ्ये सांभाळावी लागतात. या ठिकाणी निष्काळजीपणा करून चालत नाही. विशेषतः श्रमजीवी कष्टकरी लोकांना काम करताना स्वतःची काळजी घ्यावी हे भान कित्येक वेळा राहतच नाही. त्यातूनच मग वारंवार सर्दी, खोकला, अंगदुखी या सारखी लक्षणे त्रास देऊ लागतात.

हिवाळ्यात घ्यायची काळजी

  • पहाटे प्रचंड थंडी असते. त्यामुळे उठल्यावर गरम पाणी करुन त्याने तोंड, हात, पाय धुवावेत. सकाळी उठल्यावर पाणी पिण्याची सवय असल्यास गरम पाणीच प्यावे.
  • कामाला जाण्याच्या घाईमध्ये गार पाण्याने आंघोळ करणे पूर्णपणे टाळावे. पाणी गार असेल तर सांधे दुखणे, हात पाय फुटणे, पायात पेटके येणे या तक्रारी उद्‌भवतात. म्हणून गरम पाण्याने स्नान करावे.
  • कानाला रुमाल बांधून किंवा लोकरी कानटोपी घालून मगच कामावर जावे. विशेषतः महिलावर्ग याकडे दुर्लक्ष करतात. कानाला गार वारे लागल्याने वारंवार सर्दीचा त्रास होण्याची शक्‍यता राहते.
  • नेहमीचे कपडे जाडसर असावेत आणि त्यावर स्वेटर किंवा चादर पांघरुन घ्यावी. थंडीच्या दिवसात ही काळजी घेतली नाही तर गार वारे हातापायावर बसून त्वचेला खाज येणे, गांधी उठणे, त्वचा कोरडी होणे या तक्रारी दिसून येतात. शक्‍य असल्यास आंघोळीपूर्वी तिळतेल किंवा खोबरेल तेल जरूर लावावे.
  • बाहेर पडताना खाऊनच बाहेर पडणे आवश्‍यक असते. आदल्या दिवशीचे शिळे अन्न शक्‍यतो खाऊ नये. त्यादिवशी घरातील ताजी पोळी, भाकरी, पोहे, घावन, गरम दूध घ्यावे. त्याने पोषक अंश पोटात जातात. पचनही बिघडत नाही.
  • काही न खाता फक्त चहाचा मारा शरीरावर पुष्कळ वेळा केला जातो. पण त्यामुळे गॅसेस होणे, पित्त होणे, डोके दुखणे, जळजळ होणे या तक्रारी जाणवतात. त्यामुळे फक्त चहा घेणे टाळावे.
  • जेवणाच्या वेळा हा भागही दिनचर्येत फार महत्त्वाचा आहे. शक्‍यतो नियमित वेळेला जेवण घेण्याची सवय लावावी.
  • हिवाळ्यात भूक जास्त लागते. त्यामुळे भुकेच्या वेळेस कोणतेही चहासारखे पेय न घेता अन्नच घ्यावे. नाही तर एखादे फळ, खजूर खावा. जर भुकेच्या वेळी चहा घेतला तर पित्त वाढून त्रास होतो.
  • आहार शेतात राबणारे मजूर, कामगार वर्ग किंवा शेतात राबणारे शेतकरी बांधव सर्वांना पौष्टिक आहाराची गरज असते.

  • साधे गव्हाचे पीठ व्यवस्थित भाजून त्यात तूप आणि पिठीसाखर मिसळून लाडू करावेत. शक्‍य झाल्यास त्यात खारकेची पूड मिसळावी. हे लाडू पौष्टिक आणि ताकद वाढविणारे असतात.
  • ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ समभाग घेऊन त्यात ओवा तिखटमीठ घालून पातळसर भिजवून केलेली धिरडी पौष्टिक असतात. प्रत्येक वेळी तिखट मिरची, ठेचा, लोणचे, भाकरी असे पदार्थ खाण्यापेक्षा सकाळी असे पदार्थ पौष्टिकता वाढवतात.
  • आदल्या दिवशीचे खाणे शक्‍यतो टाळावे. साध्या रव्याची खीर, साबुदाण्याची लापशी, नाचणी, सत्व जरूर घ्यावे. जेवणातील पदार्थ फार मसालेदार, तिखट असू नयेत.
  • फोडणी करतानाही कमी तेलाचा वापर करावा. हिरवी मिरची, लाल मिरची यांचा ठेचा, लोणचे यांचे प्रमाण कमी करावे. या पदार्थांनी उष्णता वाढून डोळ्यांचा त्रास होणे अशी लक्षणे जाणवतात.
  • आंबट ताक, शिळे पदार्थ टाळावेत. पाव, ब्रेड अशा पदार्थांच्या वारंवार सेवनाने या तक्रारी उद्‌भवतात. त्यामुळे भाकरी, पोळी, तांदळाचे धिरडे, भाजणीचे थालिपीठ, खिचडी, तूप, उसळी, दुधी भोपळा, गाजर, पडवळ, दोडका, पालक, लाल माठ, बीट, लाल भोपळा, सर्व शेंगभाज्या यांचा समावेश आहारात जरुर असावा.
  • शक्‍यतो मुळा, मेथी, हरभरा, पावटा यांचे प्रमाण कमी असावे. कारण मेथी पित्त वाढवणारी आहे आणि हरभऱ्याने गॅसेस होणे, पोटदुखी ही लक्षणे जाणवतात. हिवाळ्याच्या दिवसामध्ये गारठ्यामुळेही असा त्रास पुष्कळ वेळा होतो.
  • लेखिका पुणे येथे अायुर्वेद तज्ञ अाहेत.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com