कवठ प्रक्रियेला आहे संधी

कवठ प्रक्रिया
कवठ प्रक्रिया

कवठ हे तसे दुर्लक्षित फळ. आंबट, गोड चवीमुळे कवठापासून बनविलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांना शहरी भागात चांगली मागणी आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या कवठापासून घरगुती स्तरावर विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून चांगला फायदा मिळवता येतो. कवठाची साल हिरवट, पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगाचा असून चवीला आंबट-गोड असतो.

औषधी गुणधर्म कवठामध्ये ‘ क ’ जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ‘क’ जीवनसत्त्वासह लोह, कॅल्शिअम, पिष्टमय पदार्थ, फायबर असे सर्व मूलद्रव्य कवठामध्ये असतात.

उपयोग कवठे हे मधुर, आम्लरसाचे असल्यामुळे भूक कमी लागत असेल तर याच्या सेवनाने भूक वाढीस मदत होते. कवठ हे उत्तेजक असून अपचन, आमांश आणि अतिसार इ. विकरांवर उपयुक्त आहे.

प्रक्रियायुक्त पदार्थ रस

  • पिकलेली कवठ फळे स्वच्छ करावीत.
  • त्याचे बाहेरील आवरण काढून अतील गराचे छोटे तुकडे करावेत.
  • १ किलो तुकड्यामध्ये ७५० मिली पाणी मिसळावे.
  • तुकड्यांचा स्क्रु टाईप ज्युस एक्स्ट्रॅक्टर मशिनने रस काढावा.
  • रस ८० ते ८२ अंश सेल्सिअस तापमानाला तापवावा.
  • थंड करून २४ तास स्थिर ठेवून गाळणीने रस गाळूण घ्यावा.
  • रसाची टिकवण क्षमता वाढविण्यासाठी ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानाला रस उकळून ६०० पीपीएम सोडिअम बेन्झोएट मिसळावे.
  • तयार रस निर्जंतुक बाटलीत भरुन झाकण लावून हवाबंद साठवावा.
  • चटणी

  • पिकलेली कवठ फळे स्वच्छ धुऊन फळातील गर काढावा.
  • सम प्रमाणात गर व गूळ यांचे एकत्रित मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घ्यावे.
  • त्यात सोललेला लसूण, लाल तिखट, मिठ, जिरे एकत्रित मिश्रण करावे.
  • मिक्सरमधून काढलेले मिश्रण म्हणजे गोडसर तिखट चटणी तयार होईल.
  • जॅम

  • जॅम तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली मोठ्या आकाराची कवठ फळे निवडावीत.
  • कवठ फोडून त्यातील गर काढून घ्यावा.
  • १ किलो गरामध्ये २०० मिली पाणी मिसळून ते मिक्सरमधून काढून घ्यावे.
  • पातेल्यामध्ये १ किलो गर व १ किलो साखर एकत्रित करून तापवावे.
  • पहिल्या उकळीनंतर त्यात २ ग्रॅम सायट्रिक ॲसिड मिसळावे.
  • गर घट्ट होत आल्यानंतर त्याचा ब्रिक्स मोजावा. ६८ डिग्री ब्रिक्स येईलपर्यंत जॅम शिजवावा.
  • जॅम घरी तयार करत असताना एका प्लेटमध्ये पाणी घेऊन शिजवलेले मिश्रण चमच्याने थोडे घेऊन पाण्यामध्ये ठेवावे.
  • जर मिश्रण पाण्यामध्ये पसरले तर अजून शिजविण्याची गरज आहे असे समजावे.
  • जर मिश्रणाची न पसरता गोळी तयार झाली तर जॅम तयार झाला असे समजावे.
  • तयार जॅम निर्जंतुक केलेल्या बाटल्यात भरावा.
  • जेली

  • पिकलेल्‍या मोठ्या आकाराच्या कवठ फळातील गर काढून घ्यावा.
  • गर आणि पाणी १:२ प्रमाणामध्ये टाकावे.
  • गर गरम करावा. गरम केलेला गर जर १ किलो असेल तर त्या ७५० ग्रॅम साखर, १ ग्रॅम पेक्टीन व १ ग्रॅम सायट्रीक ॲसिड मिसळावे.
  • मिश्रणाला सतत हलवत राहावे.
  • मिश्रण घट्ट होत आल्यानंतर थेंब एका पाणी असलेल्या प्लेटमध्ये टाकावा.
  • जर घट्ट गोळी तयार झाली तर जेली तयार झाली असे समजावे.
  • जेलीचा मध्यांक हा ६८ डिग्री ब्रिक्स असतो. तयार झालेली जेली निर्जंतुक बाटलीमध्ये भरावी.
  • संपर्क ः मनीषा गायकवाड, ७०२८९७४११७ (शिवरामजी पवार, अन्नतंत्र महाविद्यालय, कंधार, जि. नांदेड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com