दूध दीर्घकाळ टिकविण्यासाठी शून्य ऊर्जा शीतकक्ष

दूध
दूध

दूध काढल्यानंतर ते डेअरीमध्ये पोचेपर्यंत दीर्घकाळ टिकविणे याबाबतच्या तंत्रद्यानाची माहिती दूध उत्पादकांना असणे गरजेचे आहे. जेणेकरून दुधाची प्रतवारी टिकून राहील. दूध टिकविण्यातील या समस्या सोडविण्यासाठी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे शून्य ऊर्जा शीतकक्षावर संशोधन करण्यात अाले अाहे. त्यासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डिझेल अशा कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नाही.  दूध चांगल्या अवस्थेत टिकणे हे दुधातील सूक्ष्म जंतूच्या संख्येवर अवलंबून असते. कमी तापमानापेक्षा जास्त तापमानाला जंतूंची वाढ अनन्यसाधारण होते. (साधारणत: २०० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) त्यामुळे दूध काढल्यानंतर ताबडतोब थंड करण्यासाठी उपाययोजना केल्यास सूक्ष्म जंतूंची वाढ रोखली जाते व त्यामुळे दुधाची प्रतवारी टिकण्यास मदत होते.

दूध टिकविण्यातील समस्या

  • अस्वच्छ दूध काढण्याची पद्धत, वातावरणातील तापमान, दूध टिकविण्याच्या साधनांची कमतरता, दूध काढणाऱ्या व्यक्तीस असणाऱ्या वाईट सवयी, जसे धूम्रपान, तंबाखूचे सेवन करणे, अपुरी वाहतूक व्यवस्था, या कारणांमुळे दुधामध्ये सूक्ष्म जंतूंची वाढ झपाट्याने होते. त्यामुळे दूध नासून खराब होण्याची शक्यता असते.
  • दूध उत्पादनाची केंद्रे म्हणून बहुतांशी सर्व खेडी संकलन केंद्र आणि दूध प्रक्रिया केंद्र यापासून दूर अंतरावर आणि वाहतुकीच्या दृष्टीने आडमार्गावर अाहेत. अशा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना त्याच्याकडे उत्पादित झालेले दूध शहराकडे पाठविण्यासाठी वेगेवेगळ्या अडचणी येतात.
  • खेडेगावातून शहराकडे जाणारा एकच मार्ग असल्याने तसेच दूध वाहतूक करत असताना डोंगराळ भागतील अडथळे चढ-उतारात वाहने बिघडण्याची शक्यता, पर्यायाने वाहनांची अनिश्चितता अशा अनेक अडचणींना तोंड देऊन दूध वेळोवेळी चांगल्या स्थितीत पाठविणे ही अत्यंत जोखमीची बाब आहे.  
  • आपल्याकडे नियमितपणे दिवसातून सकाळ व संध्याकाळ असे दोन वेळा दूध काढले जाते. शासकीय योजना किंवा सहकारी संस्था यांमार्फत दिवसातून एकाच वेळा दूध एकत्र करून वाहतूक केली जाते. ही वाहतूक बहुतांशी सकाळच्या वेळीच केली जाते. त्यामुळे संध्याकाळी काढलेले दूध दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चांगल्या स्थितीत टिकेलच असे नाही.
  • दूध व्यवसायातील मोठे व्यावसायिक, सहकारी संस्था, यांकडे सुधारित शीतगृह, शीतपेटी इ. सारखे दूध दीर्घकाळ टिकवण्यासाठी साधने उपलब्ध असतात. या साधनांकरिता विजेची आवश्यकता असते. खेडेगावातील छोट्या व मध्यमवर्गीय दूध उत्पादकांना अशी साधने परवडणारी नसतात
  • ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित होण्याची समस्या.
  • बर्फ वापरून दूध थंड ठेवून दुधाची टिकवण क्षमता वाढवता येते, परंतु काही दूरवरच्या गावामध्ये बर्फ मिळत नाही.
  • विजेचा पुरवठा, पेट्रोल, केरोसीन, डिझेल इत्यादी इंधनावर चालणाऱ्या मोटारीद्वारे होणारी शीत उपकरणे खर्चिक असतात.
  • शून्य ऊर्जा शीतकक्ष दूध टिकविण्यातील या समस्या सोडविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे झालेल्या संशोधनानुसार दूध थंड करण्यासाठी एक अतिशय स्वस्त सुलभ असा शीतकक्ष वापरता येईल. त्यासाठी वीज, पेट्रोल, केरोसीन, डिझेल अशा कोणत्याही ऊर्जेची आवश्यकता नाही.

    शून्य ऊर्जा शीतकक्षाची बांधणी व रचना  

  • वाळू, विटा आणि नारळाच्या फांद्यांपासून विणलेले झाप यापासून शून्य ऊर्जा शीतकक्ष स्वत: घरच्या घरी तयार करता येतो.   
  • पायासाठी विटांचा एक थर लावावा आणि चारही बाजूंनी एकेरी विटांची भिंत रचावी. या दोन्ही भिंतीमधील (७.५ से.मी.) जागेत वाळूचा थर भरून घ्यावा.
  • शीतकक्षावर झाकण म्हणून नारळाच्या फांद्यांपासून विणलेले झाप वापरता येते. शीतकक्षामध्ये दूध ठेवण्यापूर्वी विटा व वाळूवर पाणी शिंपडावे. तसेच दुधाची किटली ठेवल्यानंतरही पाणी शिंपडावे जेणेकरून आतील वातावरण दूध टिकवण्यासाठी थंड राहील. यासाठी ठिबक संचाचाही वापर करणे शक्य आहे.
  • शीतकक्षाची उभारणी ही सावलीच्या ठिकाणी करावी. सर्वसाधारणतः ६० बाय ६० बाय ६० से.मी. आकाराच्या शीतकक्षात १० लिटर ठेवता येते.  
  • दुधाच्या किटलीच्या आकारानुसार आपणास अनुभवावरून शीतकक्षाचे आकारमान ठरविता येते.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील संशोधनावरून असे निदर्शनास आले आहे की, हिवाळा आणि उन्हाळा अशा दोन्ही हंगामात काढलेले दूध शीतकक्षामध्ये दुसऱ्या दिवशीपर्यंत चांगल्या प्रकारे टिकू शकते.
  • शीतकक्षाचा वापर केल्यामुळे कोकणात उन्हाळी हंगामात दूध काढल्यापासून १५ तास तर हिवाळी हंगामात १९ तासांपर्यंत दूध चांगल्या स्थितीत राहू शकते.
  • पावसाळी हंगामात कोकणात आर्द्रतेचे प्रमाण ८४ ते ९४ टक्के इतके जास्त असल्याने शीतकक्षाचे उपयोगिता विशेष अशी महत्त्वाची नसते.
  • विदर्भ, मराठवाडा यांसारख्या इतर भागांमध्ये जेथे वातावरणातील तापमान खूप अधिक असते. दुधातील सूक्ष्मजंतूंची वाढ झपाट्याने होत असते तेथेदेखील शीतकक्षाचा वापर करून दुधाची प्रतवारी टिकण्यास मदत होऊ शकते.
  • वातावरणातील तापमान जसे वाढेल तसे वाळू ओली राहील व शीतकक्षातील वातावरण थंड राहील याकडे विशेष खबरदारीने लक्ष देणे गरजेचे असते.
  • संपर्क ः अजय गवळी, ८००७४४१७०२ (के. के. वाघ कृषी जैव तंत्रद्यान महाविद्यालय, नाशिक)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com