संकटे हीच संधी मानून दुष्काळावर केली मात

वरुडी येथील अल्पभूधारक जयकिसन शिंदे यांनी आजही हे काम वेळ मिळेल तसे सुरू ठेवले आहे. पूर्वी मोसंबी, द्राक्षे अशी पिके घेतली. आज डाळिंब हे त्‍यांचे दीड एकरावर मुख्य पीक झाले आहे. तर उर्वरित क्षेत्रात शेततळे व त्यात मत्स्यपालन केले आहे.
संकटे हीच संधी मानून दुष्काळावर केली मात
संकटे हीच संधी मानून दुष्काळावर केली मात

शिक्षण काही तांत्रिक कारणांमुळे अर्धवट सोडावे लागले; परंतु अभ्यास व अनुभवातून पुढे जात वरुडी (ता. बदनापूर, जि. जालना) येथील अल्पभूधारक जयकिसन रामदास शिंदे यांनी एकात्मिक शेती पद्धतीतून आपली प्रगती साधली आहे. दुष्काळातही हार न मानता डाळिंब फळबाग, आंतरपिके, शेततळ्यातील मत्स्यपालन, शेळीपालन असे उपक्रम राबवित शेतीतील वाटचाल सकारात्मक केली आहे.  जालना जिल्ह्यातील वरुडी (ता. बदनापूर) येथील जयकिसन शिंदे यांची शेती केवळ तीन एकर ११ गुंठे. मात्र हीच विकासाची संधी मानून डाळिंब फळबाग, आंतरपीक, शेततळ्यातील मत्स्यपालन, शेळीपालन असे विविध उपक्रम राबवित त्यांनी शेतीतील वाट सुकर केली केली आहे. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सुरवातीला जमेल तशी शेती सुरू केली. इतरांच्याही शेतीचे निरीक्षण सुरूच होते. शेतीमध्ये बदल करावे हे पक्के ठरविले. 

प्रयोगशीलतेकडे वाटचाल शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत जरी मनात होती. तरी त्यावर मात करण्याची जिद्द मनी बाळगून होते. सुरवातीच्या काळात नोकरी आणि त्याचदरम्यान विद्युत मोटर दुरुस्तीचे काम करायला सुरवात केली. आजही हे काम वेळ मिळेल तसे सुरू ठेवले आहे. पूर्वी मोसंबी, द्राक्षे अशी पिके घेतली. आज डाळिंब हे त्‍यांचे दीड एकरावर मुख्य पीक झाले आहे. तर उर्वरित क्षेत्रात शेततळे व त्यात मत्स्यपालन केले आहे.  मत्स्यपालनाचा अनुभव काहीच नव्हता. मात्र, दापोली येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात पाच दिवसांचे प्रशिक्षण घेतले. त्यासाठी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेकडून अनुदानही मिळाले. त्यासाठी ‘आत्मा’चे अरुण शिसोदे यांनी सहकार्य करीत ३७५० रुपयांचे अनुदान दिले. तेथूनपुढे कृषी विभागाशी संबंध घट्ट झाला.

पाण्याची शाश्वती बदनापूर तालुका कायम दुष्काळी म्हणून अोळखला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना कायम त्याच्या झळा सहन कराव्या लागतात. शिंदे यांनी हीच समस्या आधी सोडवण्याचा निर्णय घेतला. शेतात स्वतःच्या मालकीची एक व सामायिक अशा दोन विहिरी अाहेत. त्यांचे पुनर्भरण केले आहे. विहिरीचे पाणी ५५ लाख लिटर क्षमतेपेक्षाही अधिक क्षमता असलेल्या शेततळ्यात घेतले आहे. सध्या त्यात पंधरा फुटांपर्यंत पाणी आहे. शेततळ्याची खोली तीस फूट आहे. शेताच्या बांधालगतच नाला असून, त्याचे खोलीकरणही स्वखर्चाने केले आहे. त्यावर कृषी विभागातर्फे सिमेंट बांध बांधला असल्याने त्याचा फायदा विहिरींना होतो. गेल्या चार वर्षांपासून याच शेततळ्यात रोहू, कटला, मृगल आदी माशांचे पालन सुरू केले आहे. दरवर्षी साधारण एक टनापासून दोन टन मत्स्योत्पादन घेतले जाते. वर्षाला सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न त्यातून मिळते. जे शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते असे शिंदे यांनी सांगितले.  दरवर्षी शेतात असलेल्या नाल्यावर स्वखर्चाने वनराई बंधारे बांधले जातात. त्यामुळे पावसाचे जे काही पाणी वाया जात होते ते आता शेतीला मिळू लागले आहे. 

डाळिंबावर आधारित शेती  मागील सतत तीन वर्षे दुष्काळात गेली. पाण्याअभावी मोसंबी आणि द्राक्षबागही तोडली. आर्थिकदृष्टीने सगळीकडून ओढाताण होऊ लागली. पण त्यापुढे शरणागती पत्करली नाही. शेततळ्यातील थोड्याशा पाण्यात मत्स्यपालन सुरूच ठेवले. उत्पन्नाचा हा स्राेत कायम ठेवला. त्यातून दुष्काळाच्या झळा कमी केल्या. पाण्याची थोडीशी उपलब्धता होताच कमी पाण्यावर येणाऱ्या भगवा वाणाच्या डाळिंबाची लागवड केली. आज सुमारे साडेपाचशे झाडांचे संगोपन होत आहे. एका बहाराचे उत्पादन व उत्पन्न आत्तापर्यंत घेतले आहे. एकरी किमान चार टन उत्पादन व ४० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे.  झाडांचे वय वाढत जाईल तसे उत्पादन अजून वाढत जाणार आहे. 

आंतरपिकांनी दिले पैसे  डाळिंबाची नवी बाग असल्याने त्यात तूर, मूग अशी पिके घेतली. दीड एकरात मागील वर्षी साडेतीन क्विंटल तूर तर अडीच क्विंटल मूग झाला. यंदाही हीच आंतरपिके घेतली. यंदा मूग सव्वा क्विंटल झाला. मागील वर्षी काही प्रमाणात तुरीची डाळ तयार केली. धान्यमहोत्सवात सुमारे ७० रुपये प्रतिकिलो दराने विकली. यंदाही अशीच विक्री करणार असल्याचे शिंदे म्हणाले. आंतरपिकांच्या उत्पन्नातून मुख्य पिकातील खर्च कमी केला आहे. 

जमीन केली सक्षम  आज नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीवर अधिक भर देत शेतीतील उत्पादन खर्च सुमारे ५० टक्के कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. जमीन सुधारली तरच उत्पादन वाढेल, अन्यथा शेतीवरील खर्च वाढत राहील हे मागे घेतलेल्या प्रशिक्षणादरम्यान उमगले होते. त्यादृष्टीने कंपोस्ट खत, गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क, सापळा पिके अशा विविध उपायांचा वापर सुरू केला. शेतातील काडी कचरा न जळता त्याचा आच्छादनासाठी व कंपोस्ट खतासाठी उपयोग केला जातो. आज त्याचा फायदा दिसून येत आहे. अलीकडेच केलेल्या मातीपरीक्षणानुसार जमिनीतील कर्बाचे प्रमाण ०.८ टक्के झाले आहे. रासायनिक खते वापरण्याचे प्रमाणही खूप कमी झाले आहे. जमिनीत गांडूळांचे प्रमाण वाढले आहे. जमिनीची पोत सुधारून पीक उत्पादनही वाढले आहे. यंदा अनेक दिवसांचा पावसाचा खंड पडला तरीही कोरडवाहू पीक उत्तम आहे

 बांधही पिकविला  बांधावर चिंचेचे झाड आहे. त्यापासूनही काही उत्पन्न मिळते. शिवाय सीताफळ, बोरं अशीही फळझाडे आहेत. शेतजमीन कमी असल्याने शेताचा इंच न इंच भाग उपयोगात आणण्यासाठी शिंदे यांचा सतत प्रयत्न असतो.

प्रशिक्षण ठरले महत्त्‍वाचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र रत्नागिरी, मत्स्यपालन प्रशिक्षण केंद्र, दापोली, पाणी प्रशिक्षण संस्था; तसेच अन्य संस्थांमधून प्रशिक्षण घेतले. कृषी विभागाचे मेळावे, नैसर्गिक शेतीचे शिबिर व कृषी विभागाच्या शैक्षणिक सहली यामधून शेतीविषयक चांगले ज्ञान प्राप्त झाले. याचा आपसूकच शेतीच्या विकासासाठी फायदा झाला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, तालुका कृषी अधिकारी रामदास पाटील यांनी मार्गदर्शन केले. ‘आत्मा’चा उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तसेच नाशिक येथील दोन पुरस्कारांनी युवा शेतकरी म्हणून शिंदे यांना गौरवण्यात आले आहे. शिंदे, पत्नी व आई वडील असे हे कुटुंब शेतातच राहते. दिवसातील सुमारे १२ ते १३ तास ते शेतालाच देतात. त्यामुळे मजुरांची फारशी गरज पडत नाही. त्यावरील खर्चात त्यामुळे मोठी बचत झाली. शेतीतील ठळक बाबी  सध्या अजून एका पूरक उत्पन्नाची जोड म्हणून शेळीपालनास सुरवात केली अाहे. त्यासाठी शेडचे बांधकाम पूर्ण केले आहे. सध्या १३ शेळ्या आहेत. येत्या काही दिवसांत कडकनाथ कोंबडीपालनाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. पारंपरिक शेती वाट्याला आली. त्याबरोबर त्यावरील कर्जही वाटणीस आले. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त. मात्र, मोटर दुरुस्तीची कला अवगत असल्याने खर्चाची तोंडमिळवणी कशीबशी होत होती. त्यातून कमी खर्चिक पीक पद्धतीची रचना करीत व उत्पन्नाचे स्राेत वाढवले. - जयकिसन शिंदे- ९५९५६१४०७० (लेखक अंबड, जि. जालना येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com