शेळकेंच्या शेतातील उत्पादन सदैव ‘सर्वोत्कृष्ट’च!

शेळकेंच्या शेतातील उत्पादन सदैव ‘सर्वोत्कृष्ट’च!
शेळकेंच्या शेतातील उत्पादन सदैव ‘सर्वोत्कृष्ट’च!

दुष्काळी वातावरणात राहूनही प्रयत्नांती ‘उत्कृष्ट क्वाॅलिटी’ उत्पादन घेण्याचा ध्यास अनंता पाटीलबा शेळके (तांदूळवाडी, जि. बुलडाणा) यांनी घेतला आहे. एकसारखे दर्जेदार डाळिंब पिकवणे, जोडीला कापूस, कांदा बीजोत्पादन घेऊन पारंपरिक शेतीच्या तुलनेत उत्पन्न वाढवणे त्यांनी शक्य केले आहे. पाण्याची शाश्वतता व जमिनीची सुपीकता याबाबीही त्यांनी आत्मसात केल्या आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील बरीचशी शेती डोंगराळ स्वरूपाची अाहे. तालुक्यात मागील काही वर्षांपासून पावसाची सातत्याने अवकृपा होत अाली अाहे. पाण्याचा प्रश्न कायम उद्भवत राहतो. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी प्रयोगशीलता सोडलेली नाही हे विशेष! विशेष म्हणजे तालुक्यातील तरुण पिढी यात अधिक सक्रिय आहे. 

शेळके यांची प्रयोगशील शेती  तालुक्यातील तांदुळवाडी येथील अनंता पाटीलबा शेळके यांची सहा एकर शेती आहे. या क्षेत्राचे त्यांनी अत्यंत हुशारीने पीकनियोजन केले आहे. 

शेळके यांची शेती पद्धती 

  • सव्वा दोन एकर डाळिंब
  • कापूस- मात्र बीजोत्पादनासाठी- सुमारे १० वर्षांपासून
  • मूग, उडीद आदी कमी कालावधीची पिके
  • मागील वर्षापासून कांदा बीजोत्पादन 
  • ठिबक सिंचनाचा वापर
  • शाश्वत पाण्यासाठी शेततळे  
  • डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन तांदूळवाडीचा बहुतांश भाग डोंगराळ स्वरूपाचा अाहे. शेळके यांची शेतीही मध्यम, खडकाळ स्वरूपाची होती. मागील काही वर्षांत त्यांनी जमिनीचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न केले. गावपरिसरातील तलावातील सुमारे हजार ट्रॉली गाळ आणून शेतात टाकला. आज सव्वादोन एकरांत भगवा जातीच्या डाळिंबाची सुमारे साडेअाठशे झाडे १३ बाय ९ फूट अंतरावर उभी आहेत. मागचे उत्पादनाचे पहिलेच वर्ष असल्याने उत्पादन बऱ्यापैकी मिळाले. मात्र फळांचा दर्जा अत्यंत चांगला होता. एकूण क्षेत्रात सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदाही व्यवस्थापन चोख ठेवले. दृष्ट लागावी असा फळांचा दर्जा होता. प्रति झाड सुमारे १०० पर्यंत फळे होती. व्यापाऱ्याशी दर बांधून घेतले आहेत. आतापर्यंत १६ टन मालाची विक्री केली आहे. सुमारे ५० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे. अद्याप दोन टन मालाची विक्री होईल अशी अपेक्षा अाहे.

    निर्यातक्षम दर्जा  शेळके म्हणाले, की यंदा फळांचा दर्जा, आकार एकसमान होता. डाळिंबाचे दर सगळीकडेच घसरले असले तरी माझ्या फळांना किलोला ६५ रुपये दराने मागणी आली होती. दीडशे ग्रॅमपासून ते साडेपाचशे, साडेसातशे ग्रॅम वजनापर्यंत फळाचे वजन राहिले. जमिनीतून रासायनिक खतांचा कमी वापर, मात्र विद्राव्य खतांवर भर, शेणखताचा अधिक वापर यामुळे फळांचा दर्जा चांगला मिळाला.  डाळिंब बागेत कोणतेही आंतरपीक घेत नाही. त्यामुळेच दर्जा वाढण्यास मदत झाल्याचे शेळके म्हणाले.  कपाशी- बीजोत्पादनासाठी  शेळके कपाशीचे अर्थशास्त्र सांगताना म्हणतात, की नेहमीच्या कपाशी शेतीत एकरी १० क्विंटल उत्पादन व दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला तरी ५० हजार रुपये मिळतात. खर्च वजा जाऊन एकरी २० ते २५ हजार रुपयेच हाती पडतात. त्या तुलनेत बीजोत्पादन घेतले फायदा वाढतो. एकरी पाच ते आठ व काही वेळा १० क्विंटलपर्यंतही उत्पादन मिळते. एका खासगी कंपनीसोबत बीजोत्पादनासाठी करार केला आहे. त्यास २० हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळतो. खर्च वजा जाता सुमारे ७५ हजार रुपये ते एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. जे नियमित कपाशीपेक्षा अधिक असल्याचे शेळके सांगतात. 

    मूग, उडदाची साथ जोडीला मूग, उडीद आदीं कमी कालावधीची पिकेही घेतली जातात. मुगाचे एकरी सहा क्विंटल,  सोयाबीनचे ११ क्विंटल तर उडदाचे पाच क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

    पाणीटंचाईवर मात  शिवारातील जमीन टणक, खडकाळ स्वरुपाची अाहे. पाण्याची उपलब्धता सहज होत नाही. फळबाग उभी करताना पाणी लागणार हे अोळखून कृषी विभागाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेतून शेताजवळील जुन्या सिमेंट नालाबांधाचे खोलीकरण केले. यात चांगला पाणीसाठा होत असल्याने अाता विहिरीत १० अश्वशक्तीचा पंप अखंड चालतो. दोन वर्षांपूर्वी या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. मात्र या बंधाऱ्यामुळे मोठी मदत झाली.       

    येत्या काळातील बदल   डोंगराळ भागातील ही शेती सुधारण्यासाठी बरीच कसरत करावी लागली. शेतात तलावातील गाळ टाकणे, शेणखत वापरणे या माध्यमातून हे प्रयत्न झाले. कृषी विभागामार्फत शेततळे खोदले. अाता पॅकहाउस उभारणी, दुग्धोत्पादन, गांडूळ खत प्रकल्प, बंदिस्त शेळीपालन आदी प्रकल्प प्रस्तावित आहेत. ठिबकचा वापर आहेच. पुढील वर्षात शेताला तारेचे कुंपण तसेच शेताच्या चारही कोपऱ्यांत  ‘सीसीटीव्ही’ बसविण्याचा संकल्प आहे.  शेतीला अधिक प्राधान्य पाटीलबा शेळके यांना तीन मुले. पैकी दोघे शेती करतात. तर एकजण तलाठी अाहे. तिघांपैकी एक असलेले अनंता सहा एकरांचे व्यवस्थापन सांभाळतात. तांदूळवाडीचे पाच वर्षे उपसरपंचपद त्यांनी भूषविले अाहे. सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवडही झाली अाहे. साखरखेर्डा येथे त्यांचे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व दुरुस्ती विक्री केंद्र अाहे. राजकारणातही ते काही प्रमाणात सक्रिय आहेत. मात्र शेतीलाच अधिक प्राधान्य दिल्याचे ते सांगतात. बागेच्या व्यवस्थापनासाठी श्रीकृष्ण हरिभाऊ मारके यांची नेमणूक केली आहे.  

     : अनंता शेळके, ८०८७३७२५२५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com