गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यपालनातून प्रयोगशीलता

गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यपालनातून प्रयोगशीलता
गडचिरोली जिल्ह्यात मत्स्यपालनातून प्रयोगशीलता

गडचिरोली जिल्ह्यातील वडधा बोरी (ता. आरमोरी) येथील लंकेश भोयर यांचे भात हेच मुख्य पारंपरिक पीक आहे. मात्र शेतीत नव्या वाटा चोखाळल्या तरच प्रगती होते हे जाणून त्यांनी मत्स्यपालनाकडे आपला कल वळवला आहे. मागील वर्षी त्यांनी २५ क्विंटल माशाची विक्रीही साधली. जोडीला राईस मीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तांदूळ तयार करून देऊन पूरक उत्पन्नाचे साधन त्यांनी मिळवले आहे. 

गडचिरोली जिल्ह्यातील वडधा (ता. आरमोरी) हे लंकेश भोयर यांचे गाव. तेथून बोरी हे दोन किलोमीटवर गाव आहे. या परिसरात भोयर यांची पाच हेक्टरपर्यंत शेती आहे. भात हेच या भागातले मुख्य पीक आहे. लंकेश यांनी एमए (अर्थशास्त्र) व एमए (राज्यशास्त्र) या पदव्या घेतल्या आहेत.  एका खासगी संस्थेत ते शिक्षक आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेएकरा वाजेपर्यंत त्यांची नोकरीची वेळ असते. त्यानंतरचा दिवस ते पूर्णवेळ शेतीला देतात. लंकेश यांचे वडील बाबूराव पाटील भोयर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक होते. त्यांच्या निधनानंतर लंकेश यांचे लहान बंधू दुर्वेश संचालकपदाची जबाबदारी सांभाळतात. लंकेशदेखील जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. 

शेतीचे बाळकडू लंकेश यांचे वडील सहकार क्षेत्रात कायम कार्यरत राहात. अशावेळी त्यांच्या आईवर घरच्या शेतीची जबाबदारी राहायची. आईकडून लंकेश यांना शेतीचे धडे मिळत गेले. लंकेश यांचा मुलगा मंगेश आज वडिलांसोबत शेती करतो. मुलगी तृप्ती बीएचएमएसचे शिक्षण नागपूरला घेत आहे. 

शेतीतील प्रयोगशीलता लंकेश यांचे बहुतांश सर्व क्षेत्र भातपिकाखालीच (धान) आहे. धानाच्या बांधावर तूर लागवड करतात. धानाचे एकरी १५ क्‍विंटलपर्यंत उत्पादन मिळते. रब्बीत हरभरा घेतला जातो.  

मत्स्यशेतीकडे वाटचाल मागील वर्षापासून लंकेश यांनी मत्स्यशेतीवर भर दिला आहे. पहिल्या वर्षी केवळ एक मत्स्यतळे घेतले होते. यंगा त्यात तीन तळ्यांची वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून तळे खोदले. बोरी शिवारातील याच शेतात विहीर असून त्यातील पाण्याचा वापर करून तळ्यातील पाण्याची ‘लेव्हल’ कायम ठेवली जाते. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय सूर्यवंशी, प्रताप कोपनार यांचे मार्गदर्शन त्यांना मिळते. 

मत्स्यशेतीचा अभ्यास मत्स्यशेती करण्यापूर्वी लंकेश यांनी छत्तीसगड, ओरिसा राज्यात जाऊन तेथील मत्स्यव्यवसायाची माहिती घेतली. ओरिसा राज्यात मत्स्यशेतीच्या विकासाकरिता अनेक योजना आहेत. मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना धरणाचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यासाठी कोणते शुल्क आकारले जात नाही. त्यासोबतच सौर ऊर्जेवरील दिव्यांसाठी ८० टक्‍के अनुदान देण्याची तरतूद आहे. तळे खोदण्यासाठी ५० टक्‍के अनुदान दिले जाते. दर चार ते पाच वर्षांनी तलावातील गाळ काढण्यासाठीही अनुदान देण्याची सोय आहे. हॅचरी किंवा मत्स्यखाद्य लघू उद्योग उभारणीसाठीही तेथे ५० टक्‍के अनुदान दिले जाते. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या अशा योजनांचा मात्र महाराष्ट्रात अभाव असल्याची खंत लंकेश यांनी व्यक्‍त केली. गोड्या पाण्यातील माशांच्या संगोपनासाठी खास प्रकारचे खाद्य लागते. राजनांदगाव (छत्तीसगड) येथे अशा प्रकारचे उत्पादन होते. तेथून वाहतुकीचा खर्चासह हे खाद्य सुमारे ३५ रुपये प्रति किलो दराने विकत आणले जाते. यात धानाच्या तणसाचाही वापर होतो. गडचिरोली जिल्ह्यात हा सहज उपलब्ध होणारा घटक आहे. त्यामुळे मत्स्यखाद्यावरील खर्च कमी करण्याकरिता स्वतःच मत्स्यखाद्य उत्पादन करण्याचे त्यांनी ठरवले आहे. त्यासाठी बॅंकेकडून कर्ज घेण्याचा विचार आहे. 

माशांचे उत्पादन  लंकेश म्हणाले, की स्थानिक भाषेत ज्याला जरंग म्हणतात अशा माशाची पाच हजार बोटुकली अोरिसातून आणली. त्याचे उत्पादन सुरू होण्याचा कालावधी १० महिन्यांचा आहे. एक ते दीड किलोपर्यंत त्याचे वजन मिळाले आहे. मागील वर्षी एकूण २५ क्विंटल माशांचे उत्पादन मिळाले. सुमारे १०० ते ९० रुपये प्रति किलो दराने त्याची व्यापाऱ्यांना विक्री केली. साधारण १०० रुपयांचा मासा तयार करण्यासाठी ७० रुपयांपर्यंत खर्च येतो. तीस टक्के नफा शिल्लक राहतो. यंदाच्या वर्षी १८ हजार चौ.मी. चे एक, १२ हजार चौमी.ची दोन तर १० हजार चौ. मी. आकाराचे एक अशी शेततळ्यांची संख्या चार झाली आहे. त्यात रोहू, कटला आदी माशांचे उत्पादनही घेतले जात आहे.  

राईसमिलमध्ये होते प्रक्रिया भोयर यांची राईसमिल आहे. शेतकऱ्यांना धानावर ८० रुपये प्रति क्‍विंटलप्रमाणे प्रक्रिया करून दिली जाते. हंगामात सरासरी एकहजार क्‍विंटल एवढी प्रक्रिया होते. यातून अतिरिक्‍त उत्पन्न मिळते. लंकेश यांना शेतीत प्रयोगशीलता टिकवण्यासाठी ॲग्रोवनची मोठी मदत होते. गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात ॲग्रोवननेच शेती शिकविली असे ते म्हणतात.    : लंकेश भोयर, ९६०४२२६२६३   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com