सुतार कामातून सरिताताईंनी दिला संसाराला आकार

लाकडास पॉलिश करताना सरिताताई
लाकडास पॉलिश करताना सरिताताई

पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या सुतारकामामध्ये सौ. सरिता विश्‍वनाथ लोहार यांनी पतीला मदत करण्यास सुरवात केली. अनुभवी सुतार लाकडाला जसा आकार देतो, अगदी त्याच तडफेने त्यांनी लाकूड आणि संसारालाही आकार दिला. अंगमेहनतीच्या जोरावर सुतार व्यवसायात त्या पारंगत बनल्या आहेत.

नोकरी करायचीच नाही... व्यवसाय करायचा हे स्वप्न कोल्हापूर शहराजवळील हणमंतवाडी येथील सौ. सरिता विश्‍वनाथ लोहार यांनी प्रत्यक्षात उतरवले. पंधरा वर्षांपूर्वी सरिताताईंचा विवाह बेकनाळ (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील सुतारकाम करणारे व्यावसायिक विश्‍वनाथ लोहार यांच्याशी झाला. विश्‍वनाथ यांचे शिक्षण पाचवीपर्यंत झालेले, तर सरिताताई  बी. कॉम. पदवीधर. असे असतानाही सरिता यांनी विश्‍वनाथ यांना पती म्हणून स्वीकारले. शिक्षण फारसे झाले नसले तरी पतीची सुतार कामातील हुशारी व कामाचे कौशल्य पाहून त्यांनी सुतार कामात साथ द्यायचे ठरविले. बेकनाळ हे मूळ गाव असले तरी कामाच्या निमित्ताने लोहार कुटुंबीय कोल्हापूर शहराजवळील हणमंतवाडी येथे स्थायिक झाले. अनपेक्षितरीत्या मिळाला सुतारकामाचा अनुभव : सुतारकामात पारंगत असणाऱ्या विश्‍वनाथ यांना कोल्हापूर शहरातील एका कुटुंबाकडून बेड तयार करण्याचे काम मिळाले. बेडच्या खांबांना वाघाचा मुखवटा करायचा होता. पण विश्‍वनाथ यांना तो जमला नाही. त्यांनी तुटलेले लाकूड तसेच घरी आणले. या वेळी सरिताताईंनी सहजपणे त्यांना कलाकुसरीच्या काही टिप्स दिल्या. सरिताताईंच्या सूचनेनुसार विश्‍वनाथ यांनी वाघाचा मुखवटा बनविला. याचे सर्वांना आश्‍चर्य वाटले. याच गोष्टीने सरिताईंना आत्मविश्‍वास मिळाला. कोणाच्याही टीकेला दाद न देता पतीच्या प्रोत्साहनामुळे त्यांनी सुतारकाम करण्यास सुरवात केली. त्यांनी पहिल्यांदा पॉलिश काम शिकून घेतले. त्यानंतर होल कुसव, रेखकाम आदी कामात त्या पारंगत झाल्या. लाकडाला रंधा मारणे, लाकूड, प्लॉयवूड आखणीनुसार कापणे, आदी कामे सरिताताई आता सफाईदारपणे करतात. "करिअर"ने  घेतला आकार : सरिताताईंचे शिक्षण बी.कॉम झाले असले तरी नोकरी करायची नाही, हे त्यांनी आधीच ठरविले होते. सरिताताईंनी फॅशन डिझायनिंगचा कोर्सही केला. पण सुतारकामात करायचे हे नक्की नव्हते. पण एका छोट्याश्या घटनेने त्यांना सुतारकामाविषयी आवड निर्माण झाली. पुढे हेच काम त्यांच्या हौसेबरोबरच उदरनिर्वाहाचे साधन बनले. रंधा घासताना लाकडाला जसा आकार येत गेला, तसे त्यांच्या करिअरनेही आकार घेतला. अंशाच्या कोनात एकेक चौकट दारे, खिडक्‍या, टेबल, खुर्ची, सोफासेट, पलंग, टीपॉय, कपाट, कपाटाची दारे अशा प्रकारे फर्निचरचे सौंदर्य खुलत गेले. महिलेच्या जन्मजात सौंदर्य दृष्टीतून फर्निचरने लक्षवेधी आकार घेतला. या कामातून आत्मविश्‍वास वाढला. आता सरिताताई एकट्याच एखाद्या फ्लॅट, दुकानगाळ्यातील फर्निचरचे काम घेतात. सुतारकामात पतीला साथ देत असल्या तरी त्यांच्या अनुपस्थितीत साईटची जबाबदारी सरिताताई स्वत: सुतारकाम सांभाळतात. काम खंडीत होऊ देत नाहीत. सतत कार्यमग्न : सकाळी सहा वाजताच सरिताताईंचा दिवस सुरू होतो. घरात आलेले सुतारकाम दहा वाजेपर्यंत पती करतात. दहा वाजता बाहेरच्या साइटवर काम सुरू हाते. सायंकाळी उशिरापर्यंत दोघे जण साईटवर काम करतात. दोघेही सुतारकामात निपुण असल्याने कामगारांची गरज लागत नाही. दोघांचे सुतारकाम सफाईदार अाहे, त्यामुळे गुणवत्ता टिकून आहे. आतापर्यंत सरिताताईंनी पतीच्या सहाय्याने मोठ्या गुंतवणुकीची सुतार कामे घेतली आहेत. एखादे काम ठरविताना दोघेही संबंधित ठिकाणी एकत्र जातात. या वेळी काम ठरविताना महिला कशासाठी? असा प्रश्‍न काम देणाऱ्या व्यक्तीला पडतो. परंतु, दोघे मिळून सुतारकाम करत असल्याचे समजताच एक वेगळाच आपलेपणा समोरच्या व्यक्तीला वाटतो. हा फार मोठा आनंद असल्याचे सरिताताई सांगतात. मजुरी आणि खंडून अशा दोन्ही पद्धतीने सुतारकामे घेतली जातात. साहित्याच्या किंमतीच्या तीस टक्के मजुरी आकारली जाते. दोघेही सुतारकाम करत असल्याने मजुरीला पैसे द्यावे लागत नाही. याचा मोठा आर्थिक आधार लोहार कुटुंबीयांना आहे.  लोहार कुटुंबीयांना श्रुती व श्रावणी या दोन मुली आणि विराज हा मुलगा आहे. मुली हायस्कूलमध्ये तर मुलगा प्राथमिक शाळेत जातो. आईवडिलांचे कष्ट पाहून मुली स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळतात. दैनंदिन सुतार कामाचा व्याप असूनही मुलांच्या अभ्यासाकडे सरिताताईंचे लक्ष असते.

सरिताताईंचा गौरव : सरिताताईंच्या सुतार कामाची दखल घेऊन वसुंधरा सामाजिक सेवा संस्थेने उत्कृष्ट महिला कारागीर म्हणून गौरविले आहे. त्यांनी अनेक ठिकाणी कलाकुसरीची कामेही केली आहेत. सतत सुतार कामात व्यस्त असल्याने त्यांना कोठे परगावी जाता येत नाही की, महिलांच्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होता येत नाही. पण त्यांना याची खंत नाही. व्यवसायात पारंगत असलेल्या पतीला ज्या वेळी त्या काही सूचना करतात त्या वेळी त्यांच्यातील चिकीत्सकपणा प्रत्येक टप्प्यात जाणवतो. पत्नी आपल्याबरोबरीने सुतार काम करते, याचा मोठा अभिमान विश्‍वनाथ लोहार यांनाही आहे.

इंटेरिअर डिझायनिंगला करणार सुरवात : सरिताताई म्हणाल्या की, शिक्षणामुळे मला अधिकारी होणे मला फार कठीण नव्हते. थोड्या जिद्दीने आणखी अभ्यास केला असता तरी मीही अधिकारी झाले असते. पण सुतारकामात फारशा महिला नाहीत. या क्षेत्रात आपण काम केले तर वेगळे काही काम केल्याचा आनंद होईल. त्याचबरोबर कष्ट व प्रामाणिकपणे काम केले की, त्याचा मिळणारा मोबदलाही शंभर टक्के प्रामाणिक असतो. याचे समाधान दीर्घकाळ लाभते. हेच समाधान माझ्या हाताची ताकद वाढवते. पतीची साथ आत्मविश्‍वासाचे बळ देते. सरिताताई येत्या काळात इंटेरिअर डिझायनिंगचे प्रशिक्षण घेणार आहे. त्यात त्यांना भविष्यात काम करायचे आहे.

संपर्क : सौ. सरिता लोहार, ९६५७१४५६२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com