ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला गावशिवारातील दुष्काळ

गेली अनेक वर्षे आेढ्यातील गाळ काढला नसल्याने बुजून गेला हाेता. गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला. लाेकवर्गणी आणि त्यातूनही कमी पडलेले पैसे आम्ही ज्येष्ठांनी वैयक्तिक स्वरूपात दिले. तरुणांचीही या कामास चांगली साथ लाभली. यामुळे काम फत्ते झाले. याचा फायदा उन्हाळ्यातील पिकांना होत आहे. - सीताराम काेरडे
बोरी बुद्रुक शिवारातील कोरडे मळ्यात अोढ्याचे खोली-रुंदीकरण
बोरी बुद्रुक शिवारातील कोरडे मळ्यात अोढ्याचे खोली-रुंदीकरण

पुणे जिल्ह्यातील बाेरी बुद्रुक (ता. जुन्नर) गावाने पाणीटंचाई, दुष्काळाच्या अनेक झळा सोसल्या. रब्बी, उन्हाळी हंगाम घेणे येथील शेतकऱ्यांना मुश्‍किलीचे झाले होते. यावर शाश्वत उपाय शोधण्याच्या प्रयत्नांतून गावाशेजारील काेरडे मळ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला. लाेकवर्गणी आणि स्वतःकडील पैसे खर्च केले. त्यातून शिवाराजवळील आेढ्याचे खाेली-रुंदीकरण केले. दाेन वर्षांपूर्वी झालेल्या या कामामुळे शिवारातील जाधववाडी, डेरेमळा, माळवाडी परिसरातील सुमारे ३०० एकर शेतीला फायदा झाला. उन्हाळ्यात सुमारे ३० विहिरी आणि ५० बाेअरना पाणी उपलब्ध झाले. त्यातून रब्बी हंगाम शाश्‍वत करण्यात गावाला यश आले आहे.  दरवर्षी येणाऱ्या दुष्काळाचा, पावसाच्या अनियमिततेचा महाराष्ट्रातील अनेक गावांना मोठा फटका बसला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठीच्या पाण्याचीही टंचाई अनेक गावे आजही सोसत आहेत. पुणे जिल्ह्यातील बाेरी बुद्रुक (ता. जुन्नर) हे असेच एक गाव. रब्बी हंगामात पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पाण्याची टंचाई निर्माण व्हायची. गावाच्या शिवाराशेजारून कुकडी नदी वाहते. मात्र विहिरी आणि बाेअरवेलचे पाणी कमी पडत असल्याने रब्बी धाेक्यात यायचा. पीक हातातून जायचे किंवा उत्पादन कमी मिळायचे. सन २०१५ मध्ये तर दुष्काळामुळे पाणीटंचाई जास्तच जाणवू लागली हाेती.    पाणीटंचाईवर शाश्वत उपाय  दरवर्षी भासणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिवारालगत असलेल्या मृत आेढ्याचे पुनरुज्जीवन करून अोढा वाहता करण्याचा विचार गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी केला. गावाजवळील काेरडे मळा शिवारातील सीताराम काेरडे, शंकर काेरडे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. काेरडे मळ्यातील शेतकऱ्यांची संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिरात मार्च २०१५ मध्ये बैठक घेण्यात आली. त्यात कामाचे स्वरूप सांगण्यात आले. त्यानुसार आखणी करण्याबाबत चर्चा झाली. सर्वांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत हाेणाऱ्या खर्चासाठी घरटी एक हजार रुपये लाेकवर्गणी काढण्याचा ठराव करण्यात आला. यानंतर सुमारे ७० हजार रुपये लाेकवर्गणी गाेळा झाली. आेढा खाेलीकरणाचा शुभारंभ २०१५ च्या गुढीपाडव्याला गावातील ज्येष्ठांच्या हस्ते झाला. 

कामाची अंमलबजावणी जलसंधारणाच्या या कामाला गावातील जेसीबी यंत्र व्यावसायिक रमेश येवले आणि राजू डेरे यांनी साथ दिली. केवळ डिझेलचा खर्च गावकऱ्यांनी करावा, या बाेलीवर त्यांनी जेसीबी यंत्र कामासाठी उपलब्ध करून दिले. स्थानिक आमदार शरद साेनवणे यांनी दाेन दिवस पाेकलँड यंत्र विनामूल्य उपलब्ध करून दिले. सुमारे १५ दिवसांच्या कामानंतर सुमारे २० फूट खाेल, ५०० फूट लांब तर २०० फूट रुंद एवढ्या आकाराच्या आेढ्याचे खाेली व रुंदीकरण करण्यात आले. हे काम गावातील ज्येष्ठांच्या निरीक्षणाखाली झाले. 

शासन करणार आेढ्याचे मजबुतीकरण नदीशेजारील गाव असल्याने जलयुक्त शिवार याेजनेत त्याचा समावेश करण्यात आला नाही. मात्र संपूर्ण ग्रामस्थांनी एकी दाखवत हे काम पूर्णत्वास नेल्यानंतर आता शासनानेही मदतीचा हात पुढे केला आहे. आेढ्याची मजबुती आणि रुंदीकरणासाठी शासनाने नुकतेच सर्व्हेक्षण केले अाहे. लवकरच आेढ्यालगतच्या रस्त्यांची उंची वाढवून आेढ्याच्या किनाऱ्यांचे दगडांद्वारे पिचींग करून मजबुतीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती गावातील ज्येष्ठ नागरिक सीताराम काेरडे यांनी दिली.     ॲग्राेवन स्मार्ट व्हिलेजमध्ये बोरी गावाची निवड   ‘सकाळ-ॲग्राेवन’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट व्हिलेज’अंतर्गत बाेरी बुद्रुक गावाची निवड करण्यात आली आहे. इस्त्राईलच्या धर्तीवर गावातील शेतीचा विकास करण्याची प्रक्रिया सुरू अाहे. त्या अनुषंगाने वेळाेवेळी इस्त्राईल देशातील शेती आणि प्रक्रिया उद्याेग क्षेत्रातील तज्ज्ञांनी गावाला भेटी देऊन येथील शेतीविकासाचा आराखडा बनविला आहे. ज्येष्ठांचा महत्त्वाचा सहभाग  गावातील ज्येष्ठ नागरिक दरराेज कामाच्या ठिकाणी उभे राहून कामावर देखरेख करायचे. या वेळी ट्रॅक्टर; तसेच अन्य यंत्रचालकांची चहा, नाश्‍ता, जेवणाची व्यवस्थाही पाहण्यात येत होती. आेढ्याचे काम झाल्यानंतर कॅनाॅलला पाणी साेडले हाेते. त्याच्या पाझरामुळे पहिल्याच वर्षी आेढ्यामध्ये पाण्याचा चांगला साठा झाला. या कामांच्या विविध टप्प्यांवर सतीश जाधव आणि गणेश आैटी यांनीदेखील मदत केली.  पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर आमदार शरद साेनवणे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. जलसंधारणासाठी पुढाकार घेतलेल्या ज्येष्ठांमध्ये शंकर बबन काेरडे, सीताराम देवराम काेरडे, पाेपट रानबा काेरडे, बाळशिराम बाळाजी काेरडे, बबन भाऊ काेरडे, ठकाशेठ बनब काेरडे, सतीश दशरथ काेरडे आदींचा समावेश राहिला. झालेल्या कामांचा फायदा शिवारातील जाधववाडी, डेरेमळा, माळवाडी परिसरातील सुमारे ३०० एकर शेतीला झाला. उन्हाळ्यात सुमारे ३० विहिरी आणि ५० बाेअरना पाणी उपलब्ध झाले. त्यातून रब्बी हंगाम शाश्‍वत करण्यात गावाला यश आल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले. 

नदीकाठचे गाव असूनदेखील उन्हाळ्यात शेतीला पाणी कमी पडत होते. पाण्याच्या उपलब्धततेसाठी आेढा खाेलीकरणाचे प्रयत्न अनेक दिवस सुरू हाेते. मात्र संपूर्ण गावाने सहभाग दिल्याने हे काम पूर्ण झाले. उन्हाळ्यात पाण्याअभावी पिके वाया जाण्याचा धाेका आता कमी झाला आहे. शिवारातील शेतकऱ्यांना आता पिकांवर मर्यादा न राहाता विविध हंगामांत पिके घेणे शक्य झाले आहे.  - राेहिणी काेरडे,  ७०२८२७०२३६, ग्रामपंचायत सदस्या

एेन उन्हाळ्यात पाण्याअभावी ऊस जळायचा. आता आेढा खाेलीकरणामुळे पाटाचे पाणी पाझरून आेढ्यात साठत आहे. यामुळे शिवारातील विहिरी, बाेअरवेल यांना पाणी उपलब्ध हाेत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी मिळाल्यामुळे धना (काेथिंबीर), बीट आदी पिके घेता आली. गहूदेखील चांगला आला.   - नीलेश काेरडे, ७३८७१८५९८५

‘माझी काेरडे मळा शिवारात ३९ गुंठे शेती आहे. आेढा खाेलीकरण झाल्याने उन्हाळ्यात विहिरीला पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. त्यामुळे फ्लाॅवर, टाेमॅटाे, मका आदी विविध पिके घेणे शक्य झाले आहे.  - शिवाजी रामचंद्र काेरडे  

आमच्या शिवाराजवळून कॅनॉल जातो. उन्हाळ्यात त्यातून पाझरणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी आेढा खाेलीकरण करणे आवश्‍यक हाेते. गेली अनेक वर्षे आेढ्यातील गाळ काढला नसल्याने आेढा बुजून गेला हाेता. गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला. लाेकवर्गणी आणि त्यातूनही कमी पडलेले पैसे आम्ही ज्येष्ठांनी वैयक्तिक स्वरूपात दिले. तरुणांचीही या कामास चांगली साथ लाभली. यामुळे काम फत्ते झाले. याचा फायदा उन्हाळ्यातील पिकांना होत आहे. भविष्यात आेढ्याशेजारी जेष्ठ नागरिकांसाठी उद्यान उभारण्याचा मानस आहे.  - सीताराम काेरडे, ८८५००४३३१६ 

पाच सहा वर्षांपूर्वी काेरडे मळ्यातील आेढ्यालगत पाणंद रस्ता तयार केला हाेता. त्यानंतर दाेन वर्षांपूर्वी या आेढ्याचे खाेली व रुंदीकरण केले. त्यानंतर शेजारून जाणाऱ्या कॅनॉलचे पाणी पाझरून आेढ्यात येत आहे. पूर्वी एेन उन्हाळ्यात शेतीला पाणी कमी पडायचे. अनेक वेळा दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळदेखील आली. आता मात्र पुरेसा पाणीसाठा राहत असल्याने परिसरातील दाेन अडीच किलाेमीटर परिघातील विहिरी, बाेअरवेल्स यांना पाणी उपलब्ध हाेत अाहे. उन्हाळ्यातील पाण्याची चिंताही कमी झाली आहे.   - पुष्पा काेरडे, ९०९६५१४७५९, सरपंच, बाेरी बुद्रुक. 

Water conservation sakal sakal relief fund Bori

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com