केवळ रेशीम शेतीतून अर्थकारण केले सक्षम

रेशीम शेती समर्थपणे सांभाळणारे बनसोडे दांपत्य
रेशीम शेती समर्थपणे सांभाळणारे बनसोडे दांपत्य

अवर्षणग्रस्त पुणदी गावात (जि. सांगली) आपल्या तीन एकरांच्या आधारे केवळ रेशीम शेती करून कुटुंबाचे अर्थकारण सक्षम करण्याची किमया संगम बनसोडे यांनी केली आहे. जिद्द, वेगळ्या वाटेवरून जाण्याची हिंमत, परिश्रम, सातत्य आदींच्या जोरावर त्यांनी यशस्वी रेशीम उत्पादक अशी आपली अोळख तयार केली आहे.  

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका द्राक्षासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. तालुक्‍याचा पूर्व भाग दुष्काळी. या भागात द्राक्ष घेण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र पाणीटंचाईवर मात करुन निर्यातक्षम द्राक्षे पिकवणारे शेतकरी येथे पाहायला मिळतात. तासगाव शहरापासून काहीच किलोमीटरवर पुणदी गाव लागते. येेथील संगम बनसोडे यांनी मात्र नगदी पिकांच्या मागे न लागता शेतीत वेगळी म्हणजे रेशीम शेतीची वाट पकडली. त्यात सातत्य ठेवत आज जे यश मिळवले त्याची प्रेरणा घेत आज भागात अनेक रेशीम उत्पादक तयार झाले आहेत.  

प्रवास- मुंबई ते पुणदी  संगम यांचे मूळ गाव पुणदी असले तरी ते मुंबईतच वाढले. त्यांचे वडील जहाज बांधणीच्या ठिकाणी नोकरी करायचे. पुढे संगम यांनाही त्या ठिकाणी नोकरी मिळाली. पुढे टेलरींग व्यवसायाचा अनुभव घेण्यास सुरवात झाली. हळूहळू ते कोट स्पेशालिस्ट झाले. व्यवसायात स्थिरता येत आहे असे लक्षात येत असतानाचा गावाकडे घरी जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी वडीलधाऱ्या मंडळींनी संगम यांच्यावर टाकली. मग ते पुणदीला आले ते कायमसाठीच. वडिलोपार्जित तीन एकर शेती होती. पण पाणी नसल्याने केवळ पावसावर येणारी पिकं घेतली जायची. टेंभू आणि आरफळ योजनेचे पाणी आले. पण वेळेत ते मिळत नाही. टेलरिंगच्या व्यवसायातूनही उदरनिर्वाह होत नव्हता. 

भावाने सोपी केली वाट  पाण्याची शाश्‍वत सोय केली तरच चांगली शेती करणे शक्य होते. मग २००० मध्ये विहिर घेतली.ऊस, हळद, फूलपिके अशा विविध अंगानीं शेती बहरू लागली. पण प्रतिकूल हवामान, मिळणारे कमी दर यामुळे अर्थकारण काही सुधारेना. अशात म्हैसूर येथे इंजिनियर असलेला भाऊ प्रमोद देवासारखा धावून आला. कर्नाटक राज्यातील रेशीम शेतीची त्याला चांगली माहिती होती. त्यानेच या पर्यायाबाबत भावाला प्रेरणा दिली. संगम यांनीही मग त्यास प्रतिसाद देत कर्नाटकातील रेशीम उद्योग पाहिले. त्याचे अर्थकारण भावले. त्यानंतर व्यवसायाची आखणीदेखील सुरू केली. 

सुरवातीचे प्रयत्न  तुती लागवडीतून व्यवसायाचा श्रीगणेशा केला खरा. पण अपुऱ्या अनुभवामुळं अपयश आलं. पण मागे हटायचे नाही हा इरादा पक्का होता. व्यवसाय उभा करण्यासाठी हाती पैसे नव्हते. पण बॅंकेचे कर्ज काढून हा प्रश्न सोडवला.  

अभ्यासातून प्रश्न सोडवला रेशीम शेतीचा अनुभव नसला तरी चिकाटी वृत्ती होती. तुतीची शेती, रेशीम अळी संगोपन शेड यांनाच प्रयोगशाळा बनवली. अळ्यांना होणारे रोग, खाद्य व्यवस्थापन, कोषनिर्मिती असे विविध बारकावे टिपण्यास सुरवात केली. आर्थिक नुकसानही झाले. पण हे अनुभव दिशादर्शक ठरले. कोणत्याही परिस्थतीत हार मानली नाही. या सर्व प्रवासात संगम यांनी पत्नी सौ. वैशाली यांनाही प्रशिक्षित केले. आज पती- पत्नी मिळून हा व्यवसाय नेटक्या पद्धतीने सांभाळतात.  

मार्गदर्शन  सांगली जिल्हा रेशीम कार्यालयातील समूह प्रमुख एम. एस. सावंत यांनी तांत्रिक तसेच कोषांसाठी बाजारपेठेपर्यंतची इत्यंभूत माहिती दिली. शेडसाठी एक लाख रुपये, ठिबकसाठी ५० हजार रुपये असे अनुदानही मिळाले. बेळंकी (ता. मिरज) येथील महादेव कोथळे यांच्या रेशीम उद्योगाचा अभ्यासही महत्त्वाचा ठरला. 

बाजारपेठ  कर्नाटक राज्यातील रामनगर ही मुख्य. अथणी ही दुय्यम. या मार्केटपेक्षा रामनगर येथे नेहमीच रेशीम प्रति किलो १०० ते १५० रुपयांचे दर चढे मिळतात. 

उत्तम सायकलस्वार   बनसोडे यांनी उत्तम सायकलस्वार म्हणूनही अोळख मिळवली आहे. उमेदीच्या काळात मुंबई-दिल्ली, मुंबई-गोवा, पुणे अशा विविध सफरीत त्यांनी आवर्जून भाग घेत विविध प्रमाणपत्रे मिळविली. अनेकवेळा पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवल्याचेही ते अभिमानाने सांगतात. सर्व प्रकारचे कोट शिवण्याचा छंद त्यांनी आजही आवर्जून जोपासला आहे.   

 मुलांचे शिक्षणही रेशीम शेतीतूनच   केवळ तीन एकर क्षेत्रात रेशीम शेती घडवून त्यातूनच मोठी मुलगी सोनालीस ‘टेक्‍सटाईल इंजिनिअर’ बनवणे संगम यांना शक्य झाले. दुसरी मुलगी मोना संगणक विषयात ‘इंजिनिअरिंग’ चे तर साक्षी आणि मुलगा कुणाल शालेय शिक्षण घेत आहेत.

अर्थशास्त्र 

  • प्रति बॅच सुमारे १० ते १२ हजार रुपये खर्च
  • रेशीम कोषांना अलीकडील काळात किलोला किमान दर ३०० रुपये मिळतो. हाच दर ४०० ते ५५० रुपयांपर्यंतही वाढतो. दर वाढले की नफ्याचे प्रमाण वाढते.
  • या शेतीत आम्ही दोघे म्हणजे पती-पत्नी असेच मुख्य राबतो. प्रसंगी दोन मजुरांची मदत घेतली जाते. मात्र मजुरांवरील बहुतांश खर्च वाचवल्याचे संगम म्हणाले.   
  • बनसोडे यांच्या रेशीम शेतीतील वैशिष्ट्ये  

  • अनुभव सुमारे सात ते आठ वर्षे
  • तुतीचे व्ही -१ वाण. आत्तापर्यंत दोन एकर तुती क्षेत्र. यंदा सर्व म्हणजे तीन एकर 
  • प्रति बॅच शंभर अंडीपुंजांची- त्याचे ७० ते ९० किलोपर्यंत कोष उत्पादन. व्यवस्थापन जितके चोख तेवढे उत्पादन अधिक.  
  • वर्षाला सुमारे सात बॅचेस 
  • संगम म्हणतात की वेळ, तत्परता या बाबींची या शेतीत गरज. अंडीपूंज ते कोषनिर्मिती टप्प्यापर्यंत रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते. 
  • शेडमध्ये कायम स्वच्छता  
  • कोषांची प्रतवारी. लहान कोष काढून टाकल्याने एकसमान आकाराचे कोष मिळतात. त्यामुळे अधिक दर मिळण्यास मदत 
  • शेडमधील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी शेडच्या चारही बाजूंनी ठिबक सिंचन तर पत्र्यावरती तुषार सिंचन 
  • संपर्क : संगम बनसोडे, ९७६४५९५२८५  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com