सघन केसर अांबा बागेतून दर्जेदार फळांचे उत्पादन

योग्य व्यवस्थापनातून परमानंद गव्हाणे यांनी केसर आंब्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे.
योग्य व्यवस्थापनातून परमानंद गव्हाणे यांनी केसर आंब्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले आहे.

बेळंकी (ता. मिरज, जि. सांगली) येथील परमानंद मल्लाप्पा गव्हाणे यांनी दोन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची सघन पद्धतीने लागवड करून निर्यातक्षम गुणवत्तेच्या आंब्याचे उत्पादन घेण्यात सातत्य राखले आहे. द्राक्ष, सीताफळ अाणि पेरू बागेसोबतच अांब्याची निर्यात करीत त्यांनी शेती फायदेशीर केली अाहे.  मिरज तालुक्‍याचा पूर्व भाग तसा दुष्काळी. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पाणी या भागात फिरले आणि शेती ओलिताखाली आली. पूर्वीपासून हा भाग पानवेलीसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी शाश्‍वत पाण्याची सोय झाली आणि पीक पद्धतीत बदल होत गेला. द्राक्ष, ऊसपिकाच्या क्षेत्रात वाढ झाली. पूर्व भागातील बेळंकी (ता. मिरज) गावात परमानंद मल्लाप्पा गव्हाणे यांची एकूण ९ एकर शेती. बहुतांश शेती माळरान. गाळमाती टाकून त्यांनी सर्व जमिन बागायती बनवली. परमानंद हे तसे निसर्ग कवी. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या परमानंदांना निसर्गावर कविता करता करता शेतीचाही चांगलाच लळा लागला. त्यांच्याकडे  केसर आंबा, द्राक्ष बाग, सीताफळ आणि पेरू, अशी फळबागेची शेती आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून त्यांना द्राक्ष शेतीचा अनुभव अाहे. दोन वर्षापुर्वी एक एकरावर त्यांनी सीताफळ बागेची लागवड केली अाहे तर अाठ महिन्यापुर्वी एक एकर क्षेत्रावर पेरुची लागवड केली अाहे. दोन एकरावरील आंबा निर्यातीतून यंदा त्यांना प्रतिकिलोसाठी सुमारे १११ रुपये दर मिळाला. यातून त्यांना चांगला फायदा मिळाला आहे.  आंबा लागवड आंबा लागवड करण्याअगोदर गव्हाणे हे पपई, केळी, मिरची, कापूस ही पिके घेत असत. या पिकातून अपेक्षित दर अाणि उत्पादन मिळत नाहीये, असे त्यांना अभ्यासातून दिसून अाले. पूर्वीपासूनच गव्हाणे अभ्यासू वृत्तीचे. द्राक्षपिकासोबत अांब्याचे अापल्याला चांगले उत्पादन घेता येईल, असे त्यांनी ठरवले. शिवाय, द्राक्ष बागेतील मजूर कमतरतेमुळे खर्चही जास्त होत होता. घराशेजारी २० केसर अांब्याची झाडे होती. त्यातून त्यांना वर्षाला एक ते दिड लाखाचे उत्पादन मिळत होते. यातून ते अांबा लागवडीकडे वळले. सन २०१२ साली सुमारे दोन एकर क्षेत्रावर केसर आंब्याची बाग लावण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर येथील शासकीय रोपवाटिकेमधून ४० रुपयांना एक कलम विकत घेतले. कलमांची लागवड सघन पद्धतीने बारा बाय चार फूट अंतरावर केली.   स्थानिक विक्रीचे व्यवस्थापन आंब्याच्या बागेतून जास्तीचे उत्पन्न मिळावे, त्यासाठी गव्हाणे यांनी सुरवातीपासूनच नियोजन केले. मात्र, गुजरातचा आंबा बाजारात आला, तर आंब्याचे भाव कमी होतात. त्यामुळे गुजरातचा आंबा बाजारपेठेत येण्याअगोदर कसा विक्री होईल, त्याचे नियोजन केले. राहिलेल्या आंब्याची विक्री गावातील आठवडे बाजारात केली जाते. सरासरी २०० ते २५० रुपये डझन असा दर मिळातो. पण बाजारात विक्री करत असताना ग्राहक मोठे आंबे विकत घेऊन जाऊ लागले. त्यामुळे लहान आंब्यांना कमी दर मिळू लागला. हे लक्षात आल्यानंतर यंदा किलोवर आंब्याची विक्री करण्यास प्रारंभ केला. १२५ रुपये प्रतिकिलो या दराने विक्री केली. यामध्ये लहान मोठ्या आकाराच्या आंब्याची विक्री शक्‍य झाली. यामुळे अपेक्षित नफा मिळाला. आंब्याची चव चाखल्यानंतर परिसरातील ग्राहक घरी येऊन आंब्याची खरेदी करतात. परिसरातील किरकोळ व्यापाऱ्यांना ८० ते ९० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जाते. निर्यात आणि स्थानिक विक्रीतून गव्हाणे यांना चांगला नफा मिळतो. अांबा लागवडीची वैशिष्ट्ये

  • सघन पद्धतीने १२ बाय ४ फूट अंतरावर लागवड.
  • सघन पद्धतीमुळे झाडाची उंची जास्तीत जास्त ९ फूट होते.
  • उंची कमी असल्याने वादळी वाऱ्याने नुकसान होत नाही.
  • दोन एकरांत सुमारे १६०० झाडे.
  • २०१५ पासून उत्पादन मिळण्यास सुरुवात.
  •  एका झाडापासून सरासरी १० किलो फळांचे (४० ते ५० फळे) उत्पादन.
  • गव्हाणे यांची शेती द्राक्ष - पाच एकर केसर आंबा - २ एकर सीताफळ - १ एकर पेरू - १ एकर

    निर्यातीसाठी योग्य नियोजन 

  • सेंद्रिय खताचा ७० टक्के, तर रासायनिक खतांचा ३० टक्के वापर. 
  • कीड, रोग नियंत्रणासाठी निंबोळी अर्क अाणि दशपर्णी अर्काचा वापर. ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन.
  • शेतातील काडीकचरा, पालापाचोळ्याचा आच्छादनासाठी वापर. 
  • नोव्हेंबरमध्ये मोहोर आल्यानंतर काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन केले जाते म्हणजे सुरवातीला दहा मिनिटे पाणी त्यानंतर हळूहळू पाणी देण्याच्या वेळेत वाढ केली जाते.
  • अांब्याची निर्यात झारखंडच्या व्यापऱ्यामार्फत लंडनला केली जाते. 
  • पाच ते सहा दिवसाच्या अंतराने व्यापाऱ्यामार्फतच अांब्याची काढणी होते. 
  • तीन वर्षांचे आंबा उत्पादन अाणि मिळालेला दर  सन २०१५ -  ५ टन - ८० रु. किलो सन २०१६   - ८ टन - १०० रु. किलो सन २०१७ -  १४ टन - १०५ रु. किलो सन २०१८   - टन विक्री  - ११ रु. किलो अजून ७ टन अपेक्षित

    माझ्याकडे द्राक्ष, सीताफळ अाणि पेरूच्याही बागा अाहेत. परंतु, सांगली भागात अांबा लागवडीसाठी पोषक वातावरण अाहे. त्यामुळे हा भाग पुढे केसर अांब्याचा भाग म्हणून अोळखला जाऊ शकतो.  परमानंद गव्हाणे, ७४४८२३१३५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com