काटेकोर नियोजनातून साधले वांग्याचे पीक

क्रेटमध्ये वांगी भरताना अरुण सरवदे
क्रेटमध्ये वांगी भरताना अरुण सरवदेAgrowon

मालवंडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील अरुण आणि गोपाळ सरवदे बंधूंनी बाजारपेठेचा अभ्यास करत वांगी, पपई, झेंडू आणि कलिंगड लागवडीतून शेती किफायतशीर केली. प्रत्येक पिकाला ठिबक सिंचन, आच्छादन एकात्मिक खत व्यवस्थापन आणि वेळेवर कीड-रोग नियंत्रणातून दर्जेदार पीक उत्पादन घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

सोलापूर जिल्ह्यातील वैराग-माढा मार्गावर वैरागपासून सोळा किलोमीटरवर मालवंडी आहे. सुर्डी-मालवंडी अशी या गावाची ओळख. मालवंडीच्या सीमेवरच तुर्कपिंपरीनजीक सरवदे बंधूंची शेती आहे. त्यांचे वडील सदाशिव सरवदे हे प्रयोगशील शेतकरी. आज ते एेंशी वर्षांचे असले तरी मुलांबरोबर शेती नियोजनात तेवढेच लक्ष देतात. अरुण, राजेंद्र आणि गोपाळ ही त्यांची मुले. अरुण आणि गोपाळ हे शेती पाहतात. तर राजेंद्र हे मुंबईत जीएसटी विभागात उपायुक्त आहेत. ते स्वतः कृषी पदवीधर असल्याने शेतीबदलाच्या प्रयत्नामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे.

अरुण हे कॉमर्सचे विद्यार्थी, तर गोपाळ हेही पदवीपर्यंत शिकले आहेत. त्यांचे वडील ज्वारी, गहू पिकवणारे शेतकरी. मोठ्या जिद्दीने त्यांनी मुलांना उच्चशिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. मुले उच्चशिक्षित असल्याने शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि प्रयोगशीलता सुरू झाली. विहिरीमुळे पुरेशा पाण्याची सोय आहे. पंधरा एकर शेतीत सध्या पाच एकर वांगी आणि आठ एकरांवर पपईची लागवड आहे.

अरुण आणि गोपाळ यांनी शेती नियोजनात लक्ष घातल्यानंतर  शेतीचा चेहरा चांगलाच बदलला. पूर्वी द्राक्ष आणि पपईत त्यांनी काही प्रयोग केले. पण त्यात फारसे यश मिळाले नाही. अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी पुणे, मुंबईसारख्या शहरी बाजारपेठेच्या अभ्यासानुसार पीकबदल करत पुन्हा नव्या जोमाने सुरवात केली. शहरी बाजारपेठ लक्षात घेऊन त्यांनी गेल्या दोन वर्षांत आठ एकरावर पपई आणि पाच एकरांवर वांगी लागवडीचे सातत्य ठेवले आहे.   

पीक लागवडीचे नियोजन सरवदे बंधूंची जमीन हलक्या माळरानाची. वांगी लागवडीसाठी त्यांनी यंदा पाच एकर क्षेत्र निवडले. त्यापैकी दीड एकरावर मे महिन्यात आणि साडेतीन एकर क्षेत्रावर जुलै महिन्यात वांगी लागवड केली. जमिनीची चांगली मशागत करून मे महिन्यात सुरवातीला एकरी चार ट्रेलर गावखत, शेणखत मिसळले. याचबरोबरीने एकरी १८ः४६ः० आणि १०ः२६ः२६  प्रत्येकी शंभर किलो, निंबोळी पेंड २० किलो आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये २० किलो जमिनीत रोटरने मिसळले.

वांगी लागवडीबाबत गोपाळ सरवदे म्हणाले, की लागवड करताना गादीवाफ्याला महत्त्व दिले. जमिनीत शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खते मिसळून दोन फूट रुंद आणि दीड फूट उंचीचे गादीवाफे तयार केले. गादीवाफ्यावर लॅटरल टाकली. प्लॅस्टिक आच्छादन पेपर अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूला जोड ओळ पद्धतीत एक फूट अंतराने रोपांची लागवड केली. एकरी साधारण चार हजार रोपे लागली.

मे महिन्यात लागवड पूर्ण झाल्यानंतर पहिल्या महिन्यात खते दिली नाहीत, कारण गादीवाफ्यात पुरेशी खते मिसळली होती. दीड ते पावणेदोन महिन्यात रोपांना फुले दिसू लागली. त्या वेळी मात्र शिफारशीनुसार खते आणि कीडनाशकांचा वापर सुरू झाला. दर चार दिवसांनी कीडनाशक आणि बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारणी केली जाते. पीकवाढीच्या टप्यात १९ः१९ः१९ आणि १३ः४०ः१३  प्रत्येकी तीन किलो आणि दोन लिटर सूक्ष्म अन्नद्रव्ये अशी दर चार दिवसाआड एक याप्रमाणे आलटून पालटून मात्रा द्यायला सुरवात केली. हिच मात्रा पीक काढणीपर्यंत सुरू ठेवणार आहे. कीड नियंत्रणासाठी चिकट सापळे आणि कामगंध सापळे शेतात लावणार आहे.  

दर्जेदार उत्पादनावर भर वांगी उत्पादनाबाबत गोपाळ सरवदे म्हणाले, की ठिबकच्या वापरामुळे कमीत कमी पाण्याचा वापर झाला, मल्चिंगमुळे तणांचे चांगले नियंत्रण झाले. शिफारशीनुसार खत मात्रा आणि योग्य वेळी कीड, रोग नियंत्रणामुळे दर्जेदार फळांचे उत्पादन सुरू झाले. मे महिन्यातील लागवडीच्या क्षेत्राची जुलैच्या शेवटी वांगी तोडणीला सुरवात झाली. सध्या दर मंगळवार, शनिवारी वांगी तोडणी केली जाते.

वांगी विक्रीसाठी पुणे मार्केट सोयीचे आहे. जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आतापर्यंत दीड एकरात आठ टन उत्पादन मिळाले. पुणे बाजारपेठेत प्रतवारीनुसार सरासरी २० रुपये प्रतिकिलो दर मिळाला. हा दर गृहीत धरता मला आत्तापर्यंत एक लाख साठ हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले. मला रोपे, खते आणि मजुरी असा साधारणपणे चाळीस हजारांपर्यंत खर्च आला. पहिल्या दोन महिन्यांतच लागवड खर्च वसूल झाला आहे. आणखी किमान ८ ते दहा महिने वांगी उत्पादन मिळणार आहे.

पीक व्यवस्थापनाची सूत्रे

  1. बाजारपेठेनुसार वर्षभराचे पीक लागवडीचे नियोजन.

  2. योग्य पद्धतीने मशागत. गादीवाफ्यामुळे वांगी, पपईची चांगली वाढ. 

  3. पपईमध्ये कलिंगड, झेंडूचे आंतरपीक. त्यातून नफ्यात वाढ.

  4. शिफारशीनुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा. एकात्मिक पद्धतीने कीड नियंत्रणावर भर.

  5.  ठिबक, आच्छादनामुळे पाण्याची बचत, तणाचे नियंत्रण.

जनावरांचेही  संगोपन गोपाळ सरवदे यांच्याकडे सध्या सहा जर्सी आणि दोन खिलार गायी आहेत. यामुळे शेतीला शेणखत आणि गोमूत्राची उपलब्धता होते. क्षेत्र मोठे असल्याने काही प्रमाणात शेणखत विकत घ्यावे लागते. शेणखताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढत आहे.

पपई लगडली, आंतरपिकातून वाढविला नफा सरवदे बंधूंनी यंदाच्या मार्चमध्ये आठ एकर क्षेत्रावर आठ फूट बाय सात फूट अंतरावर गादीवाफे करून पपईची लागवड केली. याबाबत ते म्हणाले, की पपई लागवड करताना दोन टप्पे केले. पहिल्या चार एकर क्षेत्रावर आच्छादन करून लागवड केली. पंधरा दिवसांनी पुन्हा चार एकरांवर लागवड केली. त्यामध्ये आच्छादन केलेले नाही.

बाजारपेठेत टप्याटप्याने पपईची फळे जातील असे नियोजन आहे. पपईला शिफारशीत सेंद्रिय आणि रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. ठिबक सिंचनही केले आहे. येत्या पंधरवड्यात दोन एकर क्षेत्रावरील पपईची काढणी सुरू होत आहे. सध्या प्रतिझाड किमान ५० पपई लगडलेल्या आहेत.

पपईची रोपे लहान असताना पहिल्या तीन महिन्यांत चार एकर क्षेत्रावर आंतरपीक म्हणून झेंडू आणि कलिंगडाची लागवड केली. झेंडू आणि कलिंगडाची विक्री पुणे बाजारपेठेत केली. या काळात दोन्ही पिकांना चांगला दर मिळाल्याने सुमारे चार लाखांचे उत्पन्न मिळाले.

संपर्क : गोपाळ सरवदे ः ९८९०८०३०८७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com