agriculture success story in marathi, Dahyari, Dist. Sangali, Maharashtra | Agrowon

नोकरीपेक्षा शेतीतच केले उत्तम ‘करियर’
शामराव गावडे
मंगळवार, 8 मे 2018

कंपनीतील खासगी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय दह्यारी (जि. सांगली) येथील तरुण शेतकरी सचिन जालिंदर पाटील- दमामे यांनी घेतला. त्यातून आर्थिक स्थैर्य निर्माण करीत आपला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. चौदा एकरांतील ऊस व्यवस्थापन अभ्यासूपणे व नेटक्या पध्दतीने करीत एकरी १०७ टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. जोडीला दुग्धव्यवसायातूनही उत्पन्नाचा स्त्रोत वाढवला आहे.

कंपनीतील खासगी नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय दह्यारी (जि. सांगली) येथील तरुण शेतकरी सचिन जालिंदर पाटील- दमामे यांनी घेतला. त्यातून आर्थिक स्थैर्य निर्माण करीत आपला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. चौदा एकरांतील ऊस व्यवस्थापन अभ्यासूपणे व नेटक्या पध्दतीने करीत एकरी १०७ टन उत्पादनापर्यंत त्यांनी मजल मारली आहे. जोडीला दुग्धव्यवसायातूनही उत्पन्नाचा स्त्रोत वाढवला आहे.

कऱ्हाड - तासगाव रोडवर सांगली जिल्ह्यात ताकारी गावाजवळ आतील बाजूस दह्यारी गाव लागते. कृष्णा नदीकाठावर वसलेल्या या गावात सचिन पाटील यांची चौदा एकर जमीन आहे. त्यांचे वडील जालिंदर व चुलते विनायक यांचे एकत्रित कुटुंब. दहावी शिक्षणानंतर सचिन यांनी ‘आयटीआय’ मधून अभ्यासक्रम पूर्ण केला. जवळच असलेल्या किर्लोस्करवाडी औद्योगिक कारखान्यात नोकरीस सुरवात केली. दरम्यानच्या काळात अभियांत्रिकी पदविकेसाठी प्रवेश घेतला. नोकरीच्या वेळा सांभाळून ते घरच्यांना शेतीत मदत करायचे. यात धावपळ व्हायची. शेतीतही नवे काही करावे वाटत होते.

नोकरी सोडून पूर्णवेळ शेती
दरम्यान सचिनचे वडील जालिंदर यांचे निधन झाले. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सचिन व चुलते यांच्यावर पडली. सचिन यांनी नोकरी व शेती अशी दुहेरी कसरत करावी लागत होती. यात अधिक ओढाताण होत होती. अखेर पूर्ण लक्ष घालून शेतीतच चांगल्या प्रकारे प्रगती करायची अशी मनाशी खूणगाठ बांधत नोकरी सोडली.

जमीन सुपीकतेवर दिले लक्ष
आपल्या चौदा एकरांपैकी निम्मी जमीन कमी निचऱ्याची आहे. या जमिनीत उत्पादनही जेमतेम व्हायचे. त्यामुळे नदीकाठची तांबडी माती सुमारे एक फुटाच्या जाडीने त्यात टप्प्याटप्प्याने भरून घेतली. पाचट कुट्टी वापरण्यावर भर दिला. जमिनीची सुपीकता वाढवण्यावर भर दिला.

उसाचे एकरी उत्पादन शंभर टनांपुढे
शेतीत पूर्ण लक्ष घातल्यावर सचिन यांनी उत्पादनवाढीसाठी वेगवेगळ्या प्रयोगांवर लक्ष केंद्रित केले. कुंडल येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनांत ते सहभागी झाले. यामध्ये पाचट, रोप पद्धतीने लागवड, माती परीक्षण, खतांच्या काटेकोर मात्रा, संजीवके यांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले. त्यातून ऊस उत्पादनात टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. त्याचेच फलित म्हणून २०१४-१५ मध्ये संबंधित कारखान्याकडून आदर्श ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सचिन यांना गौरवण्यात आले.
ऊस पिकातील आपला अनुभव व ज्ञान यांचा फायदा इतरांनाही व्हावा, यासाठी सचिन प्रयत्नशील असतात.

असे राहिले ऊस उत्पादन (एकरी)
२०१४-८० टन
२०१५- १०० टन
२०१६- १०५ टन
२०१७- १०७ टन

अन्य पिकांचेही केले प्रयोग
वास्तविक ऊसबिलाची रक्कम हाती पडायला दीड वर्षाहून अधिक कालावधी जावा लागतो. शेतकरी कुटुंबाला प्राधान्याने या उत्पन्नावरच अवलंबून रहावे लागते. त्यामुळे उत्पन्नाचा स्त्रोत वाढवण्यासाठी
तसेच पीक फेरपालट होण्याच्या दृष्टीने आले, हळद ही पिकेही घेतली. पुढे मुळकुजव्या रोगाचा प्रादुर्भाव तसेच अर्थकारणही न जुळल्याने ही पिके थांबवत उसावरच पूर्ण भर दिला.

पहिल्याच प्रयत्नात कलिंगड ठरले आश्वासक
यंदा उसाचा खोडवा डिसेंबर महिन्यात तुटला. दरवर्षी खोडवा उसानंतर जमिनीला विश्रांती देऊन पुढे खरिपातच आडसाली उसाची लागवड केली जाते. यंदा मात्र या मधल्या काळात कलिंगडाची लागवड करण्याचे ठरवले. त्यादृष्टीने व्यवस्थापनही काटेकोर केले. दोन एकरात ४५ टन म्हणजे एकरी साडे २२ टन उत्पादन मिळाले. कलिंगडाच्या पहिल्याच प्रयत्नाने आशादायक चित्र तयार झाले. कऱ्हाड येथील व्यापाऱ्यांनी सहा रुपये प्रति किलो दराने खरेदी केली. संपूर्ण खर्च वजा जाता दोन एकरांत सव्वा लाख रुपयांपर्यंत नफा हाती आला. पुढील पिकासाठी भांडवल हाती आले. याच क्षेत्रात आता आडसाली उसाची लागवड होईल. सचिन यांना शेतीत चुलत बंधू सुहास यांची मोलाची मदत मिळते.

दुग्धव्यवसायातून उत्पन्नवाढ
उसाला पूरक म्हणून दुग्धव्यवसायही केला जातो. गोठ्यातच तयार केलेल्या चार ते पाच गायी व दोन म्हशी आहेत. जनावरांचे व्यवस्थापन, धारा काढणे ही कामे दोघे बंधू मिळून करतात. गळित हंगाम सुरू असताना स्वतःच्या शेतातील उसाचे मिळणारे वाढे उपलब्ध होतात. त्याची कुट्टी करून मुरघास तयार केला जातो व बॅगांमधून साठवला जातो. उन्हाळ्यात त्याचा चांगला उपयोग होतो. दररोज सरासरी २८ ते ३० लिटर दूध संकलन होते. उत्पन्नवाढीला या व्यवसायाचा चांगला हातभार लागला आहे.

सचिन यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • जमीन सुपीकतेसाठी वेळोवेळी नदीकाठच्या गाळमातीचा वापर.
  • सेंद्रिय कर्ब वाढीसाठी पाचटकुट्टीचा वापर. त्यावर पाला कुजवणाऱ्या जिवाणूंचा वापर.
  • आडसाली व को ८६०३२ ऊस वाणाला प्राधान्य
  • लागवडीच्या उसाचे एकरी १०० टनांपुढे तर खोडव्याचे ६५ ते ७० टनांपर्यंत उत्पादन
  • आडसाली उसात सोयाबीनचे आंतरपीक. वरंब्यावर एक काकरी या पद्धतीने. एकरी दहा ते बारा क्विंटलपर्यंत उत्पादन
  • अन्य तरुण शेतकऱ्यांना मार्गदर्शन

खासगी कंपनीत ज्याप्रमाणे कामांचे वेळापत्रक पाळले जाते त्या पद्धतीने शेतीत काम केले तर यश हमखास मिळते. शेतीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे हे मी अनुभवातून शिकलो आहे.
सचिन पाटील - दमामे - ९७६७६३४८८१

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
वीज पडून जाणारे जीव वाचवामागील जूनपासून सुरू झालेला नैसर्गिक आपत्तींचा कहर...
जल व्यवस्थापनाच्या रम्य आठवणीजलव्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी कुठलेही पुस्तक...
कापूस उत्पादकतेत भारताची पीछेहाटजळगाव ः जगात कापूस लागवडीत पहिल्या क्रमांकावर...
अडीच कोटींचे अनुदान ‘हरवले’पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यासाठी केंद्र...
उन्हाचा चटका काहीसा कमी पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून उन्हाच्या चटक्यात...
ऊस पट्ट्यात द्राक्ष शेतीतून साधली...लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (ता. चाकूर) हे गाव ऊस...
खारपाणपट्ट्यात कृषी विद्यापीठाने दिला...खारपाणपट्ट्यात विविध हंगामात पिके घेण्यावर...
शेतीमाल दरवाढीचे लाभार्थी सधन शेतकरीचमिलिंद मुरुगकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या...
व्यवस्था परिवर्तन कधी?सतराव्या लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. एक...
राज्यातील दहा मतदारसंघांत आज मतदानपुणे ः लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात...
मराठवाड्यात सव्वाचार लाख जनावरे चारा...औरंगाबाद : गत आठवड्याच्या तुलनेत औरंगाबाद, बीड व...
नुकसानीचे पंचनामे होणार केव्हा?जळगाव  ः खानदेशात सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच...
जीपीएसद्वारे टँकर्सचे नियंत्रण करा ः...मुंबई : राज्यातील धरण व तलावांमध्ये उपलब्ध...
राज्यात कोरड्या हवामानाचा अंदाजपुणे : पूर्वमोसमी पावसाच्या सर्वच भागात हजेरी...
चीनची दारे भारतीय केळीसाठी बंदच जळगाव ः अतिथंडी व फी जारियम विल्ट या रोगामुळे...
वादळी पावसाने दाणादाणपुणे  : सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, विजा,...
उत्पादन वाढले; पण उठाव ठप्पशेतकऱ्यांच्या दृष्टीने चालू ऊस हंगाम फारसा ठीक...
शुभवार्तांकनावर शिक्कामोर्तबअर्धा देश दुष्काळाने आपल्या कवेत घेतला आहे....
'कोरडवाहू'साठी एक तरी शाश्‍वत पीक...माझ्याकडे उत्तम बागायतीची सुविधा असून, गेल्या २०-...
खानदेशात चाराटंचाईचे संकटजळगाव : खानदेशातील पशुधनाच्या रोजच्या गरजेपेक्षा...