भूमिगत निचरा प्रणालीमुळे पिके पुन्हा बहरली...

मौजे डिग्रज (जि. सांगली) येथील प्रकाश कोळी यांनी क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी शेतात भूमिगत सच्छिद्र प्रणालीचा वापर केला आहे. त्यानंतर लागवड केलेल्या उसाची झालेली जोमदार वाढ.
मौजे डिग्रज (जि. सांगली) येथील प्रकाश कोळी यांनी क्षारपड जमिनीच्या सुधारणेसाठी शेतात भूमिगत सच्छिद्र प्रणालीचा वापर केला आहे. त्यानंतर लागवड केलेल्या उसाची झालेली जोमदार वाढ.

नववर्ष २०१८ विशेष...   ------------------------------------------------------ काही वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यात ऊस लागवडीखालील जमिनी अतिपाणी, रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे क्षारपड झाल्या. जमिनी कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकरी हतबल झाले होते. मात्र, शास्त्रीय पद्धतीने भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब केल्याने याच क्षारपड जमिनी पुन्हा लागवडीखाली आल्या आहेत. 

सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज आणि मौजे डिग्रज गावातील बहुतांश जमिनी क्षारपड. या जमिनीत कोणतेच पीक यायचे नाही. यामुळे काही शेतकऱ्यांनी जमीन विक्रीला काढली. परंतु जमीन विकणे शेतकऱ्यांच्या जिवावर यायचे.

कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील कृषी संशोधन केंद्राची जमीनदेखील क्षारपड होती. त्यामुळे संशोधन केंद्राने क्षारपड जमीन लागवडीखाली आणायचे ठरवले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात २२ एकर क्षेत्रावर भूमिगत निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर करून जमीन लागवडीखाली आणली. याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांना मिळाली. आपली क्षारपड जमीन पुन्हा हिरवीगार होऊ शकते, याबाबत विश्‍वास आला आणि शेतकऱ्यांनी भूमिगत निचरा प्रणाली तंत्रज्ञान वापरास सुरवात केली.

सांगली जिल्ह्यात सुमारे ५२ हजार हेक्‍टर क्षेत्र क्षारपड आहे. मौजे डिग्रज (ता. मिरज) गावातील शेतकऱ्यांनी भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब करून सुमारे १०० एकर क्षेत्र लागवडीखाली आणले. शेतकऱ्यांनी वैयक्तिकपणे भूमिगत निचरा प्रणालीचा अवलंब केला. यामुळे ऊस उत्पादनात एकरी १५ ते २० टक्के वाढ मिळाली. वास्तविक पाहता वैयक्तिकरीत्या शेतकऱ्याला भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करता येतो. यामुळे एकाच शेतकऱ्याची जमीन लागवडीखाली येते. परंतु शेतकऱ्यांनी जर एकात्मिक निचरा प्रणालीचा वापर केला तर खर्चात बचत करणे शक्य आहे.

शासनाने द्यावा मदतीचा हात  क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी भूमिगत निचरा प्रणालीचा वापर करण्यासाठी शासनाने अनुदान दिले पाहिजे. यामुळे अधिक शेतकरी पुढे येतील. त्याचप्रमाणे एकात्मिक भूमिगत निचरा प्रणाली करण्यासाठी शेतकरी गट स्थापन केले पाहिजे. त्यामुळे भूमिगत निचरा प्रणालीचा अधिक प्रभावीपणे वापर होण्यास मदत मिळणार आहे.

जमिनीचे प्रकार 

  • पाणथळ : जास्त पाणी साचून राहिल्याने जमीन पाणथळ होते. पाण्याचा निचरा होत नाही.
  • क्षारयुक्त : अतिपाण्याचा वापर केल्याने जमीन क्षारयुक्त होते. क्षारता ४ पेक्षा जास्त, सामू ८.५ पेक्षा जास्त. सोडियम (इएसपी) १५ पेक्षा कमी. या जमिनीत पाण्यात विरघणारे क्षार जास्त प्रमाणात असतात. 
  • क्षारयुक्त चोपण : या जमिनीची क्षारता ४ पेक्षा जास्त. सोडियम (इएसपी) १५ पेक्षा जास्त.
  • चोपण : या जमिनीची क्षारता ४ पेक्षा कमी, सोडियम (इएसपी) १५ पेक्षा जास्त. सामू ८.५ पेक्षा जास्त. अशी जमीन नापीक होते.
  • भूमिगत निचरा प्रणालीचा वापर 

  • हलकी प्रत : या जमिनीत एक ते दीड मीटर खोलीमध्ये ६० मीटर अंतरावर दोन पाइपचा वापर. 
  • मध्यम व भारी : यामध्ये सव्वा मीटर खोलीवर २० ते ४० मीटर अंतरावर दोन पाइपचा वापर. 
  • समांतर निचरा प्रणाली.
  • हाडाच्या सापळ्यासारखी रचना असणारी प्रणाली. 
  • ​हेक्‍टरी खर्च : सुमारे  सव्वा ते दीड लाख रुपये.
  • तंत्रज्ञानाचा वापर करताना 

  • भूमिगत निचरा प्रणाली तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर.
  • तीन वर्षांतून एकदा सब साॅयलरने खोल मशागत.
  • मोल नांगराचा वापर फायदेशीर. 
  • हिरवळीची पिके, कंदवर्गीय पिके घेतल्याने सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत. 
  • जमीन वाफशावर लवकर येते, पिकांची चांगली वाढ.
  • वीस मीटर अंतरावर पाइपचा वापर केल्याने जमिनीतील क्षार पाण्याबरोबर लवकर निघून जातात.
  • पिकांची फेरपालट आवश्यक. हरभरा, गहू, कंदवर्गीय पिकांना प्राधान्य द्यावे.
  • शेतकऱ्यांचे अनुभव :  ‘माझ्या शेतात पाणी साचायचं. साचलेलं पाणी निचरा होत नव्हतं. त्यामुळे शेतात कोणतेही पीक यायचे नाही. उन्हाळ्यातदेखील शेतात पाणी असायचे. सहा वर्षांपूर्वी भूमिगत निचरा प्रणालीचा वापर केला. हळूहळू पीक उत्पादनात वाढ मिळू लागली. मला पूर्वी उसाचे ३५ टन उत्पादन मिळत होते, आज ६० टनांपर्यंत गेले आहे. माणिक आवटी,  (मौजे डिग्रज, जि. सांगली) ८६०००१३८१५ 

    ‘मी यंदाच्या वर्षीपासून भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणालीचा वापर केला आहे. या शेतात ऊस लागवड केली. पूर्वीपेक्षा उसाची चांगली वाढ झाली. भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणाली करताना दोन पाइपमधील योग्य अंतर ठेवल्याने पाण्याचा निचरा लवकर होण्यास मदत झाली. याचा पीकवाढीस फायदा होत आहे. प्रकाश कोळी , (मौजे डिग्रज, जि. सांगली) ९८५०३४५३८३ ‘माझी जमीन चांगली होती. पण काही वर्षांपूर्वी क्षारपड होण्यास प्रारंभ झाला. जमीन अधिक क्षारपड होऊ नये यासाठी अगोदरच मी काळजी घेतली. मी २००५ साली भूमिगत सच्छिद्र निचरा प्रणालीचा अवलंब केला. पूर्वहंगामी उसाचे मला एकरी ४० टन उत्पादन मिळायचे. आता मला ६० टन उत्पादन मिळाले. आडसाली उसाचे  ८० टन उत्पादन मिळत आहे. दीपक फराटे, (मौजे डिग्रज, जि. सांगली) ८८८८८१९५७१  एकात्मिक निचरा प्रणालीचा वापर फायदेशीर  ‘शेतकरी क्षारपड जमीन लागवडीखाली आणत आहेत.  ही चांगली गोष्ट आहे. एकात्मिक निचरा प्रणाली करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्रितपणे पुढे आले पाहिजे. यामुळे क्षारपड जमिनीचे क्षेत्र कमी होईल.अशा जमिनीमध्ये पाण्याचे नियोजन काटेकोर करावे, तरच या जमिनी लवकर क्षारमुक्त होतील. प्रा. एस. डी. राठोड, ९८५०२३६१०३  (सहायक प्राध्यापक, जलसिंचन  व निचरा अभियांत्रिकी, कृषी संशोधन  केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com