दुधड झाले शेततळ्यांचे गाव

मराठवाडा विभागात यंदाच्या २४ ऑक्टोबरअखेर २०, २७० शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यातही औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६ हजार २७ शेततळी उभारण्यात आली आहेत.दुधड गावामध्ये सुमारे ६५ पर्यंत शेततळी निर्माण झाली आहेत. औरंगाबाद पाठोपाठ जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर विभागातील जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.
मदन चौधरी यांनी शेततळ्याच्या पाण्यावर फुलवलेली फुलशेती
मदन चौधरी यांनी शेततळ्याच्या पाण्यावर फुलवलेली फुलशेती

पावसाचे अनिश्चित प्रमाण. कोरडवाहू शेती पूर्णतः त्यावरच अवलंबून. त्याचा मोठा प्रतिकूल परिणाम शेतीवर व्हायचा. अौरंगाबाद जिल्ह्यातील दुधड गावची ही परिस्थिती होती. मात्र शेततळ्यांच्या उभारणीतून आता हे गाव पाण्याबाबत जवळपास स्वयंपूर्ण झाले आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात शेततळं उभारलं गेलंय. डाळिंब, भाजीपाला या पिकांना उन्हाळ्यात जलसंजीवनी मिळाली आहे. शेतकऱ्याचं अर्थकारण आता सुधारू लागलं आहे. औरंगाबाद शहरापासून सुमारे ३० किलोमीटरवर दुधड गाव आहे. लोकसंख्या सुमारे २,६६१ पर्यंत आहे. येथील शेतकरी पूर्वी ऊस, मोसंबी, कापूस, सोयाबीन, ज्वारी, डाळिंब आदी पिके घेत. परंतु सततच्या दुष्काळामुळं शेतकऱ्यांना डाळिंबासारखं व्यावसायिक पीक जगवणं शक्य होत नव्हतं. यंदाही पावसाचे प्रमाण कमी झाल्याने गावातील लहुकी तलाव कोरडा पडला आहे. पीकपद्धतीत बदल : सुमारे तीस वर्षांपूर्वी गावात उसाची लागवड जोमात व्हायची. कालांतराने शेतकऱ्यांनी मोसंबीचा मार्ग स्वीकारला. मात्र त्याला योग्य दर मिळत नसल्याने दुधडचे शेतकरी डाळिंबाकडे वळले आहेत. काहींनी फूलशेतीचा पर्याय निवडला आहे. दुष्काळ गावची पाठ काही सोडत नाही. मागील वर्षी लहुकी तलाव पूर्ण भरल्याने पीक परिस्थिती चांगली राहिली एवढेच काय ते समाधान! यंदा मात्र पावसाचे प्रमाण कमीच झाले.

शेततळ्यांची उभारणी : अौरंगाबादचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी ‘चला गावाकडे जाऊ, ध्यास विकासाचा घेऊ’ हे अभियान विभागात राबविण्यास सुरवात केली. त्यानुसार अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांनी दुधड गाव दत्तक घेतले. त्यानंतर विविध विकासकामांना सुरवात झाली. यात जलसंधारण, मागेल त्याला शेततळे आदी योजनांबाबतही जागृती निर्माण करण्यात आली.

शेततळ्यांंत अग्रणी स्थान  : दुष्काळ, उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई यामुळे शेतकऱ्यांना पिके जगवण्यात अडचणी येत असत. साहजिकच संरक्षित पाण्याचा पर्याय म्हणून शेततळ्यांचा मार्ग त्यांना योग्य वाटला. त्यातूनच या योजनेचा लाभ घेण्यास त्यांनी सुरवात केली. यंदा गावामध्ये सुमारे ६५ पर्यंत शेततळी निर्माण झाली आहेत. राज्यात औरंगाबाद विभागाने शेततळे निर्मितीत अव्वल स्थान मिळवलंय हे विशेष म्हणावे लागेल. मराठवाडा विभागात यंदाच्या २४ ऑक्टोबरअखेर २०, २७० शेततळी पूर्ण झाली आहेत. त्यातही औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ६ हजार २७ शेततळी उभारण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि लातूर विभागातील जिल्ह्यांचा क्रमांक लागतो.

अनुभव शेतकऱ्यांचे : गावात जुनी सुमारे चारशेपर्यंत शेततळी असतील. यंदा त्यांची संख्या ६० च्या वर गेली आहे. शेततळ्यांच्या माध्यमातून गावच्या विकासाला सुरवात झाली. येथील शेतकरी डाळिंब, पपई, फूलशेतीकडे वळला आहे. मी दोन वर्षांपूर्वी सुमारे २५ गुंठ्यांत शेततळे घेतले आहे. माझी एकूण पावणेचार एकर शेती आहे. संपूर्ण शेतीला त्यामाध्यमातून सिंचन केले जात आहे. शासनाचे अनुदान मात्र योग्य वेळेत व पूर्ण मिळणे गरजेचे आहे. मुख्य पीक डाळिंब असून काही जागेत बटाटा पिकाचे प्रात्यक्षिक केले आहे. कल्याण घोडके, सरपंच, दुधड, : ९९६०४६४६१९   माझ्याकडे साडेचार एकर शेती आहे. पूर्वीचे एक शेततळे माझ्याकडे आहे. यंदा २५ बाय २५ मीटर व ३२ फूट खोल अशा आकाराचे आणखी एक शेततळे घेतले आहे. त्याशिवाय पर्यायच नव्हता. शेतात दोन विहिरी आहेत. त्यांच्या आधारे शेततळे तुडुंब भरले आहे. तीन एकरामध्ये डाळिंबांची लागवड केली आहे. मार्चनंतर आवश्यक असलेल्या पाण्याची चिंताच शेततळ्यामुळे मिटली आहे. शासनाचे ५० हजार रुपयांचे अनुदान शेततळे खाेदाईसाठी मिळाले आहे. आता पीक व्यवस्थापन योग्य प्रकारे होऊन वार्षिक उत्पन्न निश्चित चांगले मिळेल, अशी आशा आहे. - बाबासाहेब वानखरे : ९८२३१८३२७०

सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसतो आहे. माझी सहा एकर डाळिंब बाग आहे. जुनी ५०० तर नवी एक हजार अशी पंधराशेपर्यंत झाडे आहेत. त्यांच्यासाठी मी यंदा तीस गुंठ्यात शेततळे घेतले. पूर्वी मार्चपर्यंतच बागेला पाणी पुरायचे. उन्हाळ्यात डाळिंबाचे हाल व्हायचे. आता संरक्षित पाणी उपलब्ध झाल्याने काही प्रमाणात भाजीपाला घेण्याचाही मानस आहे. खरे तर शेततळे उभारणी, त्यातील प्लॅस्टिक पेपर, तारा, कंपाउंड व अन्य मिळून सुमारे साडेतीन लाख रुपये खर्च आला आहे. मात्र शासकीय अनुदान केवळ ५० हजार रुपयांचेच अद्याप मिळाले आहे. प्लॅस्टिक पेपरसाठी ते मिळाले तर काहीतरी आर्थिक दिलासा मिळेल. यंदा पाऊस झाल्याने शेततळ्यात पुरेसे पाणी आहे. साहजिकच अन्य पिकांचाही विचार येथील शेतकरी करू लागला आहे. किशोर चौधरी,  : ७५८८५३६५२५ डाळिंब लागवडीसाठी संरक्षित पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही २५ बाय २५ मीटर आणि 32 फूट खोल अशा पद्धतीने शेततळे उभारले आहे. शेतात असलेल्या विहिरीच्या माध्यमातून ते संपूर्ण भरले आहे. शिवसिंग फुलसिंग घुशिंगे मागेल त्याला शेततळे या योजनेची माहिती ग्रामसभेतून मिळाली. दुधड गावातील शेतकऱ्यांनी शेत तिथं शेततळे असा निर्धार केल्याने गावात मोठ्या प्रमाणात शेततळी उभारण्यात आली आहेत. गावाच्या समृद्धीसाठी ही चळवळ महत्त्वपूर्ण आहे. प्रभाकर काकडे, कृषिमित्र

शेतकऱ्यांनी शक्य तिथे आपल्या शेतात शेततळी घ्यावीत. सरकार त्यासाठी अनुदान देणार असल्याने त्याचा लाभ प्रत्येकानेच घ्यायला हवा. दुधडमधील यंदा जवळपास ६५ लाभधारक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. इतर गावांनीही या गावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास गावात जलसमृद्धी अवतरल्याशिवाय राहणार नाही. डॉ. विजयकुमार फड, अप्पर विभागीय आयुक्त, औरंगाबाद,  :  ९४२२२१६४४८ (लेखक औरंगाबाद येथे माहिती केंद्रांतर्गत माहिती सहायक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com