Agriculture success story in marathi, Exotic vegetable production by Vishnu Gadakh, Yelgaon, Tal. Dist. Buldana | Agrowon

विदेशी भाज्यांमधून अल्पभूधारक शेतकऱ्याला मिळतेय आर्थिक बळ
गोपाल हागे
शनिवार, 23 फेब्रुवारी 2019

येळगाव (ता. जि. बुलडाणा) येथील विष्णू गडाख या अल्पभूधारक शेतकऱ्याने नवीन प्रयोग करीत विदेशी भाजीपाल्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले. विदेशी भाजीपाला लागवडीची वाट धरत आभ्यासातून त्यांनी शेती यशस्वी करण्याची कला आत्मसात केली आहे. स्वतः हात विक्री करत प्रयत्नांतून ग्राहक मिळवत आर्थिक स्राेत बळकट केले आहेत.
 

येळगाव (ता. जि. बुलडाणा) येथील विष्णू गडाख या अल्पभूधारक शेतकऱ्याने नवीन प्रयोग करीत विदेशी भाजीपाल्याचे गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतले. विदेशी भाजीपाला लागवडीची वाट धरत आभ्यासातून त्यांनी शेती यशस्वी करण्याची कला आत्मसात केली आहे. स्वतः हात विक्री करत प्रयत्नांतून ग्राहक मिळवत आर्थिक स्राेत बळकट केले आहेत.
 
काहीतरी वेगळे करण्याची इच्छा असेल तर तुमच्या मार्गात अडथळे येऊनही यश मिळू शकते, हे येळगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्याने दाखवून दिले. विदेशी भाजीपाला पिकवून त्याला स्वतः ग्राहक तयार केले आणि मागील चार वर्षांत घेतलेल्या मेहनतीचे फळ आता पदरात पडू लागले. बुलडाणा शहराजवळ येळगाव धरणाला लागूनच गडाख यांची केवळ २० गुंठे विदेशी भाजीपाल्याची प्रयोगशील शेती आहे. गडाख यांची १९७६ साली वडीलोपार्जीत आठ एकर शेती धरणामध्ये गेली त्यामुळे चार भावांमध्ये त्यांच्या वाट्याला २० गुंठे शेती आली. यामध्ये ते पूर्वी पारंपरिक पिके घ्यायचे. वर्षभरात यातून सात-आठ हजारांपेक्षा अधिक काही हातात पडत नव्हते. त्यानंतर भाजीपाल्याकडे ते वळाले. यातही पुढे जात त्यांनी विदेशी भाजीपाला लागवडीकडे लक्ष केंद्रित केले. काळाची पावले ओळखत त्यांनी हा बदल करून २० गुंठे क्षेत्रातून उत्पन्नाचे स्राेत बळकट केले आहेत.

भाजीपाला लागवडीचे नियोजन
सन २०१५ पासून त्यांनी टप्प्याटप्याने हा भाजीपाला पिकवणे सुरू केले. यामध्ये अमेरिकन ब्रोकोली, लेट्यूस, रेड कॅबेज, यलो ग्रीन झुकीनी, बेबीकॉर्न, रेड रॅडीश अशा विविध विदेशी भाजीपाल्यांसह नवलकोल, शलगम आदी भाजीपाल्यांचीही लागवड करतात. सप्टेंबर ते आॅक्टोबर हा कालावधी या भाजीपाल्याच्या लागवडीसाठी अनुकूल असतो. मे- जून मध्ये लागवड करून पाहिली परंतु उत्पादन मिळाले नाही. नंतर अनुभवातून त्यांना सप्टेंबर ते आॅक्टोबर हा कालावधी अनूकुल असल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिसेंबर ते एप्रिल या कालावधीत उत्पादन मिळायला सुरवात होते. मे ते सप्टेंबर या काळात देशी वांगी आणि बेबी कॉर्नचे उत्पादन घेतले जाते. येत्या काळात चायनीज भाजीपाल्याचे उत्पादन घेण्याचा त्यांचा विचार आहे.

इंटरनेटवरून मिळवली माहिती
विदेशी भाजीपाला या भागात पिकेल किंवा नाही याची काहीही माहिती त्यांना सुरवातीला नव्हती. परंतु अनेकदा इंटरनेटवर अशा भाजीपाल्याची माहिती त्यांनी बघितलेली असल्याने याबाबत उत्सुकता वाढली होती. यात उतरण्यापूर्वी त्यांनी चार वर्षांपूर्वी युट्युबवर असंख्य व्‍हिडिओ बघितले. या भाज्यांचे गुणधर्म काय आहेत, या माहितीची जुळवाजुळव सुरू केली. एकाएका भाजीपाल्याची माहिती गोळा करीत लागवडीला सुरवात केली. यासाठी लागणारे बियाणे ऑनलाइन मागविले. येळगाव परिसरात भाजीपाल्याच्या शेतीसाठी वातावरण पोषक असल्याने या विदेशी भाज्या घ्यायला कुठलीही अडचण तयार झाली नाही. आता त्यांना या भाज्यांच्या लागवडीपासून काढणीपर्यंत कुठली कामे करावी लागतात, कुठला हंगाम चांगला राहतो याचा अनुभव मिळाला.

स्वतः विक्रीतून ग्राहकांची समस्याही सोडविली
विदेशी भाज्यांची चव पंचताराकिंत हॉटेल्समध्ये सहसा खायला मिळते. सामान्य ग्राहक त्याबाबत अनभिज्ञच आहे. अशा स्थितीत बुलडाण्यासारख्या भागात विष्णू यांनी विदेशी भाजीपाला लागवडीचे धाडस केले. भाजीपाल्याची संपूर्ण माहिती गोळा करीत पत्रके बनविली.

भाज्याचे अर्थकारण
स्वतः उत्पादित केलेल्या या भाज्यांची बुलडाण्याच्या बाजारात स्वतः हात विक्री सुरू केली. सुरवातीला अनेक दिवस ग्राहक यायचे, भाज्या पाहून आश्‍चर्य व्यक्त करायचे; मात्र खरेदी करण्याचे धाडस करीत नव्हते. त्यामुळे सुरवातीला या भाज्यांच्या लागवडीचा जेमतेम खर्च निघत होता. विष्णू यांनी मात्र जिद्द सोडली नव्हती. सुशिक्षित ग्राहकांना प्रयत्नांतून या भाज्यांचे गुणधर्म पटवून दिले. त्यातून ग्राहक जुळू लागले. आज ते हा भाजीपाला घेऊन जेव्हा बाजारात जातात त्या वेळी ग्राहकांना फारशी माहिती देण्याची गरज पडत नाही. आता ग्राहक त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करतात. या भाज्यांना किलोला ६० ते ८० रु. भाव मिळतो. दररोज विक्रीतून ८०० ते १००० रुपये मिळतात.

संघर्षमय वाटचाल
पदवीधर असलेले विष्णू हे येळगावात गेली अनेक वर्षे इंग्रजी विषयाची शिकवणी घेतात. सकाळी लवकर उठून योगा करून आजही ते सकाळी ११ वाजेपर्यंत चार बॅचेस घेतात. त्यानंतर पत्नीसह शेतात कामाला येतात. दुपारपर्यंत भाजीपाला काढून सायंकाळी ४ ते ९ वाजेपर्यंत बुलडाण्याच्या बाजारात स्वतः विक्री करतात. शेतात जायला बारमाही रस्ता नाही. अशा स्थितीत दुचाकीला क्रेट बांधून त्याद्वारे वाहतूक करतात. ही सर्व कामे कुठल्याही अडचणी न सांगता ते आनंदाने करतात. त्यांच्याकडे जे-जे शेतकरी भेटी द्यायला येतात त्यांना या विदेशी भाजीपाल्याच्या शेतीची माहिती कुठलीही आडकाठी न ठेवता देतात. प्रवचन, आध्यात्मातून त्यांनी आपले छंद जोपासले आहेत.

सेंद्रिय निविष्ठांचा वापर
लागवड करताना खर्च आवाक्‍यात कसा राहील, यासाठी ते सुरवातीपासूनच प्रयत्नशील आहेत. दरवर्षी ५ ते ६ ट्रॉली शेणखत मिसळले जाते. भाज्यांचे बियाणे आॅनलाइन किंवा पुण्यातून घेतले जाते. ७ ते १० ग्रॅम बियाण्यांसाठी ३० ते १००० रु. खर्च होतो. बीजोत्पादन करण्याचाही प्रयत्न केला परंतु तो फसला. या शिवाय कीड, रोगाच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क, गोमूत्र, पिवळ्या चिकट सापळ्यांचा उपयोग करतात. गरज असेल तरच फवारणी केली जाते. त्यांची प्रयोगशील शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी भेट देतात. कृषी विभागानेही विष्णू यांच्या शेतीची दखल घेतली आहे. छोटे क्षेत्र असल्याने बैलजोडी बाळगणे परवडत नाही. गरजेच्यावेळी भाड्याने मशागत करून घेतात. आंतरमशागतीसाठी सायकलचलीत कोळपणी यंत्राचा वापर केला जातो. पिकात कोळपणी, मातीचा भर देणे, सरी तयार करणे आदी कामांसाठी हे यंत्र उपयोगी ठरते असे विष्णू सांगतात.

अभिनेता आणि प्रवचनकारही !
विष्णू गडाख यांना अभिनयाची आवड आहे. या छंदातून त्यांनी पाच मराठी चित्रपटात विविध भूमिका साकारल्या. देव माझा शेगावीचा गजानन, युगप्रवर्तक सावित्रीबाई फुले, हीच बायको पाहिजे अशा चित्रपटांमध्ये अभिनय केला. सोबतच ते व्याख्यानेही देतात. वारकरी संप्रदायाची कास धरीत त्यांनी अध्यात्मिक विचार समाजात नेण्यासाठी ते प्रवचनही करतात.

संपर्क ः विष्णू गडाख, ९८६००३५८८३ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
तेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...
बचत गटांमुळे मिळाल्या रोजगाराच्या संधीनेवासा (जि. नगर) येथे नऊ वर्षापूर्वी बारा...
पीक बदलातून शेती केली किफायतशीर...जलसंपदा विभागात कार्यरत असणाऱ्या नारायण अात्माराम...
दर्जेदार गांडूळखताला तयार केले मार्केटकोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव (ता. कागल)...
ग्रेडिंग, कोटींगद्वारे संत्र्याचे...सालबर्डी (जि. अमरावती) येथील संत्रा उत्पादक नीलेश...
स्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...
जरंडीच्या पाटलांनी जोपासली देशी संकरित...राज्यात, देशभरात बहुतांश क्षेत्र बीटी कापसाखाली...
जास्त पावसाच्या प्रदेशात निर्यातक्षम...जास्त पावसाच्या भागात द्राक्षशेती आणि तीही...
तूप, खवा निर्मितीसह उभारली सक्षम...दहावीपर्यंत शिक्षण झालेले. रोजगारासाठी दूध संघात...
मका पिकाला दुग्धव्यवसायाची जोड खेडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील अरुण व दीपक या...
दर्जेदार शेती अवजारे निर्मितीत उंद्री...बुलडाणा जिल्ह्यातील उंद्री गावाने शेती उपयोगी...
विणकर महिलांच्या आयुष्याला पैठणीची...स्वतःमधील क्षमतेची जाणीव झाल्याने 'आम्ही विणकर'...
वडिलांच्या अपंगत्वानंतर धडाडीने सावरली...लोणवाडी (जि. नाशिक) येथील वडील विजय दौंड यांना...
विकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...
दुर्गम गोंदियात एकात्‍मिक शेतीचा आदर्श भाताचे मुख्य पीक आणि दुर्गम प्रदेश अशी गोंदिया...
भूमिहीन मापारी यांची कोकणात कलिंगड शेती मुंबईतील ‘प्रेस’ चा व्यवसाय बंद करून सुरेश मापारी...
दुग्धव्यवसायाला हळद शेतीची जोडआजकाल सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावतानाच...
आडसाली उसाचे एकरी १२९ टन उत्पादन सांगली जिल्ह्यात सावळवाडी (ता. मिरज) येथील...