अभ्यास, योग्य नियोजनातून प्रक्रिया उद्योगाचा विस्तार

गीताराम कदम विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करतात.
गीताराम कदम विविध प्रक्रियायुक्त पदार्थांची निर्मिती करतात.

शेतीमाल प्रक्रियेतून अधिक नफा मिळविता येऊ शकतो, हे ओळखून न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील उच्चशिक्षित गीताराम कदम यांनी प्रक्रिया उद्योग उभारला. विविध पदार्थांची ‘आनंदघना’ ब्रॅंडने थेट विक्री सुरू केली. यामुळे कदम यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांची प्रक्रिया उद्योगाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.

शिरूर तालुक्यापासून दक्षिणेकडे साधारणपणे २२ किलोमीटर अंतरावर सुमारे चार ते पाच हजार लोकसंख्येचे न्हावरे हे गाव. पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे येथील जमिनी पडीक आणि माळरानाच्या आहेत. गावात खरीप हंगाम हाच मुख्य हंगाम. चांगला पाऊस झाल्यास बाजरी, कांदा, गहू, हरभरा, भाजीपाला इ. पिके घेतली जातात. शेतकरी कुटुंबातील गीताराम रामचंद्र कदम हे मेकॅनिकल इंजिनिअर. सुरवातीला गीताराम एका कंपनीमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीला होते. घरची एकूण १२ एकर शेती. गीताराम यांचे वडील रामचंद्र शेती पाहायचे. त्यामुळे त्यांचा शेतीशी फारसा संबंध नव्हता. परंतु, शेतीमालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे वडिलांची होणारी निराशा त्यांना दिसायची. चांगला दर मिळत नसल्याने अनेक शेतकरी शेतीमालाची कमी भावात विक्री करतात. यातून शेतीमालावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या मालाची थेट विक्री करून अधिक नफा मिळू शकतो हे त्यांच्या लक्षात आले.  २०१३ मध्ये त्यांनी शेतीमाल ग्रेडिंग, क्लिनिंग व पॅकिंग प्रकल्पाची उभारणी केली. यातून शेतीमालाचे ग्रेडिंग, क्लिनिंग व पॅकिंग करण्यास सुरवात केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी शेतीमालावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या मालाची थेट विक्री करण्याचा निर्णय घेतला.   

प्रक्रिया उद्योगात प्रवेश  

हैदराबाद येथील अन्नप्रक्रिया संस्थेमध्ये जाऊन कदम यांनी विविध शेतीमाल प्रक्रिया उत्पादनाची माहिती मिळाल्यानंतर २०१६ मध्ये प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. मेकॅनिकल इंजिनिअर असल्यामुळे स्वतःचे तंत्रज्ञान वापरून गुजरात येथून प्रक्रियेसाठी लागणारी विविध यंत्रे तयार करून घेतली. शेतात पाच गुंठे क्षेत्रावर शेडची उभारणी करून भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्यास सुरवात केली. 

कदम यांच्या बारा एकर शेतीत सध्या आंबा दोन एकर, संत्रा दोन एकर, कोथिंबीर पाच गुंठे, कांदा दीड एकर, पालक पाच गुंठे, तुळस दोन गुंठे अशी विविध पिके आहेत. प्रक्रियेसाठी लागणाऱ्या विविध पिकांची टप्याटप्याने लागवड केली जाते. पाणीटंचाईमुळे वर्षभर शेतीमाल उपलब्ध होत नाही. यावर पर्याय म्हणून परिसरातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या विविध शेतीमालाची योग्य दरात खरेदी केली जाते. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च, हमालीचा खर्च वाचला असून अधिक नफा मिळू लागला आहे. 

प्रक्रियेची पद्धत

  •  भाजीपाल्याची स्वच्छ धुऊन प्रतवारी
  •  ड्रायरद्वारे निर्जलीकरण
  •  इलेक्ट्रॉनिक चक्कीद्वारे पावडरची निर्मिती
  •  प्लस्‍टिक पाऊचमध्ये ५० ते ५०० ग्रॅम वजनामध्ये पॅकिंग
  •  कमीतकमी प्रतिकिलो ३०० ते जास्तीत जास्त ५०० रुपये दराने पावडरची विक्री 
  • स्वतः शोधले मार्केट  

    शेतीमालाची विक्री करण्यासाठी सुरवातीला कदम यांना अडचणी आल्या. मात्र, कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी गोंविद हांडे यांच्या माध्यमातून एक वर्षापूर्वी दिल्ली येथे भरलेल्या अन्नप्रक्रिया प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनात जगभरातील विविध देशांतून आलेल्या कंपन्यांच्या प्रतिनिधीशी चर्चा करून मालाच्या मागणीचा अभ्यास केला. त्यातून काही प्रतिनिधीकडून सॅम्पल म्हणून मालाला मागणी मिळाली. प्रक्रियायुक्त मालाला चांगली मागणी असल्याचे लक्षात आल्यानंतर स्वतःच मालाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे शहरातील विविध व्यापारी, उद्योजक यांच्याशी चर्चा करून त्यांना मालाचा पुरवठा करण्यास सुरवात केली. याशिवाय बंगळूर, पाॅँडेचेरी, चेन्नई, इंदौर, अहमदाबाद अशा विविध शहरात मालाला मागणी आहे. कॅनडा, दुबई येथूनही मागणी येत आहे.

    सोलर प्लॅंटची उभारणी

    भारनियमनामुळे उत्पादनाच्या निर्मितीमध्ये मोठ्या अडचणी येत होत्या त्यामुळे सुरवातीला मोठे नुकसान व्हायचे. त्यासाठी फार्मवर सुमारे सात लाख रूपये खर्च करून गेल्यावर्षी सोलर प्लँन्ट बसवण्यात आला आहे. त्यामुळे विजेची बचत झाली, शिवाय वीजटंचाईवर मात करणे शक्य झाले.  

    अर्थकारण

    सुरवातीला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी ७० लाख रुपयांचा खर्च आला. आता गेल्या दोन वर्षांत झालेला खर्च निघून निव्वळ उत्पन्न सुरू झाले आहे. सध्या दर महिन्याला टक्के खर्च वजा जाता दीड ते पावणेदोन लाख रूपयांचे निव्वळ उत्पन्न मिळते. 

    शेतकऱ्यांना प्रशिक्षण

    कदम यांनी शेतावरच शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. फार्मवर राहण्याची सुविधाही आहे. त्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येते. आत्तापर्यत सुमारे १५० शेतकऱ्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आत्माअंतर्गत आलेल्या शेतकऱ्यांचा सहभाग अधिक आहे. याशिवाय अनेक शेतकरी या प्रकिया उद्योगाला भेट देऊन अधिक माहिती घेतात.  

    तयार केला ‘अानंदघना’ ब्रॅंड

    गीताराम विविध पदार्थांची विक्री अनंदघना ब्रॅंडने करतात. महाराष्ट्र शासनामार्फत भरत असलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांच्या प्रदर्शनात या मालाची थेट विक्री करून ब्रँडचा प्रचार व प्रसार केला जात आहे. 

    उत्पादनाची वैशिष्ट्ये

  • मेथी, कोथिंबीर, बीट, गाजर, लसूण, आले, हिरवी मिरची, पुदीना, कढीपत्ता, भोपळा, टोमॅटो, पालक, तुळस, कांदा, मूग, मटकी पावडर, रताळे, बटाटा, डाळिंब, अंजीर, आवळा, पेरू इ. शेतीमालावर प्रक्रिया
  •   बटाटा, बीट, गाजराचे आॅइलफ्री चीप्स
  •   यावर्षीपासून ज्वारी, बाजरीच्या पौष्टिक बिस्‍किटांची निर्मिती
  •   बेबी फूड, गर्भवती महिलांसाठी खास पौष्टिक पदार्थ बनविण्यासाठी अभ्यास सुरू आहे.
  • प्रक्रिया उद्योग वाढविण्याकडे वाटचाल

    गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आंध्रप्रदेश सरकारसोबत शेतीमालावर प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी करार करण्यात आला आहे. चालू वर्षी हा प्रक्रिया उद्योग आंध्रप्रदेशमधील चित्तूर येथे उभारण्यात येणार आहे. त्याचा फायदा दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.  राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आनंदघना ब्रॅँड पोचविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

     गीताराम कदम, ९९२२९४६५४०

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com