अंजिराचे पॅकिंग, ब्रॅंडिंग अन् नावीन्यपूर्ण जॅमही...

अभियंता तरुण शेतकऱ्याने मिळवली सक्षम बाजारपेठ ‘बेस्ट क्वालिटी’ उत्पादन, पॅकिंग, ट्रेडनेमद्वारे ब्रॅंडिंग, सुपर मार्केटना माल पुरवून मिळवलेली सक्षम बाजारपेठ. खोर (जि. पुणे) येथील समीर डोंबे या इंजिनियर युवा शेतकऱ्याची अशा विविध वैशिष्ट्यांनी साकारलेली अंजीर शेती शेतीतला उत्साह कमालीचा वाढवणारी आणि प्रेरणादायी आहे.
खोर, (जि. पुणे) येथील समीर डोंबे हा युवा शेतकरी अंजिराची उत्तम शेती करतो. त्याने पनेट पॅकिंगमधून अंजिरे सादर केली आहेत. अंजिराचा वैशिष्ट्यपूर्ण जॅमही तयार केला आहे.
खोर, (जि. पुणे) येथील समीर डोंबे हा युवा शेतकरी अंजिराची उत्तम शेती करतो. त्याने पनेट पॅकिंगमधून अंजिरे सादर केली आहेत. अंजिराचा वैशिष्ट्यपूर्ण जॅमही तयार केला आहे.

‘बेस्ट क्वालिटी’ उत्पादन, पॅकिंग, ट्रेडनेमद्वारे ब्रॅंडिंग, सुपर मार्केटना माल पुरवून मिळवलेली सक्षम बाजारपेठ. खोर (जि. पुणे) येथील समीर डोंबे या इंजिनियर युवा शेतकऱ्याची अशा विविध वैशिष्ट्यांनी साकारलेली अंजीर शेती शेतीतला उत्साह कमालीचा वाढवणारी आणि प्रेरणादायी आहे. अंजिरापासून जॅम या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या निर्मितीतून प्रक्रिया उद्योजक म्हणूनही समीर पुढे येत आहे. पुणे जिल्ह्यातील खोर (ता. दौंड) हे चहूबाजूंनी डोंगर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले गाव आहे. येथील समीर डोंबे हा अवघ्या सत्तावीस वर्षाचा युवक अत्यंत धडाडीने, आत्मविश्वासपूर्वक व दूरदृष्टी ठेवून शेतीत विधायक काही घडवतो आहे. विविध समस्यांचा सामना करताना प्रचंड सकारात्मक दृष्टिकोनातून शेतीत नवे आविष्कार घडवण्याचे आव्हान पेलतो आहे. समीरचे वडील मोहनराव रावसाहेब डोंबे शिक्षक आहेत. त्यांना तीन भाऊ. या संयुक्त कुटुंबाची ६५ एकर शेती समीर आपल्या भावांच्या सहकार्याने कसतो आहे. सन २०१३ मध्ये समीरने बीई मेकॅनिकलची पदवी घेतली. दहावी, बारावीला गावात प्रथम येण्याचा मान पटकावून बुद्धीची चुणूक त्याचवेळी दाखवली. डिप्लोमा, बीईपर्यंत शैक्षणिक ‘मेरीट’चा आलेख असाच उंचावता ठेवला.   प्रगतिशील शेती हेच ध्येय  बीईची पदवी, जोडीला बुद्धिमता कौशल्य असल्याने पुण्यात खासगी कंपनीत चांगली नोकरी व पगार मिळवणे समीरला कठीण गेले नाही. दीड वर्षे तिथं अनुभव घेतला. पण स्वतःच्याच शेतीत भरीव काही घडवण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. पण आपल्या पोरानं चांगली नोकरी सोडून शेतीची कास धरावी हे स्वीकारणं घरच्यांना अवघडच गेलं. पण समीरनं दृढनिश्चय ढळू न देता नोकरीचा राजीनामा देत शेतीतलं करियर सुरू केलं. अंजीर हे मुख्य पीक, त्याशिवाय डाळिंब, कांदा पिकं होती.  मार्केट व्यवस्था केली मजबूत  शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने दर्जेदार अंजीर पिकवयाचे. पण त्याचा दर मात्र व्यापाऱ्यांनी ठरवून ते देतील ते पैसे मुकाटपणे स्वीकारायचे हे समीरला पटायचे नाही. बाजारातील मध्यस्थांचे जाळे, मालाचे वजन शेतकऱ्यांच्या समक्ष न करणे, रूमाली पद्धत या गोष्टी त्याला अस्वस्थ करीत. याच विक्री पद्धतीमुळेच शेतकरी तोट्यात असल्याच्या निष्कर्षापर्यंत तो आला. सक्षम बाजारपेठ मिळवण्याच्या अन्य पर्यायांचा शोध तो घेऊ लागला.   सुपर मार्केटवर लक्ष केंद्रित  पुणे भागातील विविध सुपर मार्केट समीरच्या नजरेस पडायची. त्यातूनच हडपसर भागातील छोटे सुपर मार्केट समीरला अंजिरांसाठी उपलब्ध झाले. पुणे-सोलापूर हायवेवरील एका हाॅटेलच्या आवारात स्टॉल लावूनही बॉक्स पॅकिंगमधून अंजिराची थेट विक्री सुरू केली. उद्योजक प्रकाश कुतवळ यांच्या पाहण्यात हा प्रयोग आला. त्यांनी समीरला चक्क कंपनीत बोलावून घेतले. शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या मालाच्या मार्केटिंगचे स्वतःच प्रयोग केले तर आर्थिक प्रगतीपासून ते फार दूर राहणार नाहीत, असा संदेश दिलाच. शिवाय एका मोठ्या सुपर मार्केटशी संपर्कही करून दिला. त्यानंतर समीरने मागे वळून पाहिले नाही.  प्रभावी मार्केटिंगचे प्रयत्न  मोठे सुपर मार्केट मिळवण्याची संधी समीर यांनी सोडली नाही. तेथे आपल्या अंजिराची ‘क्वालिटी’ दाखवली. मात्र हे फळ नाशवंत असल्याने सुपर मार्केटद्वारे विक्री कठीण असल्याचे सांगत तेथील अधिकाऱ्यांनी फारसा उत्साह दाखवला नाही. पण चिकाटी सोडेल तो समीर कसला? माझ्या जबाबदारीवर माल पुरवतो. विकला जाईल तेवढ्याच मालाचे पैसे द्या असा विश्वास त्याने त्या अधिकाऱ्यांना दिला. कोरूगेडेट पॅकिंग आणि फळाची उत्तम क्वालिटी यातून आॅर्डर्स आणि विक्रीही वाढत गेली. त्यानंतर समीर एकापाठोपाठ एक सुपर मार्केट काबीज करीत निघाला.  मातीत काम करण्याचा अभिमानच  समीर म्हणतो की नोकरीपेक्षा शेतीच जास्त भरवशाची आहे. शेतीचे व्यवस्थित ‘प्लॅनिंग’ केले, मार्केटिंग व्यवस्था स्मार्ट पद्धतीने हाताळली तर चांगला पैसा निश्चित मिळू शकतो. इंजिनियर असलो तरी मातीत काम करण्याचा अभिमानच वाटतो. उत्पादन, ग्रेडिंग, पॅकिंग, वाहतूक, सुपर मार्केटससोबत दररोज संपर्क अशा विविध आघाड्यांवरील काम आव्हानाचे, कसरतीचे असते. पण थकवा जाणवत नाही, समाधानच मिळते. समीरची आजची ‘अचिव्हमेंट’ 

  • सहा विविध सुपर मार्केटना ताजी अंजिरे पुरवली जातात. यात बिर्ला, टाटा, रिलायन्स, वालमार्ट आदी आघाडीच्या उद्योग समूहांचा समावेश.  
  • सुरवातीला कोरूगेडेट व सद्यस्थितीत पनेट पॅकिंगमधून अंजीर सादर.  
  • अंजिराचा ‘पवित्रक’ हा स्वतःचा ब्रॅंड. (संस्कृतधील नाव) 
  • प्रति पनेट- सहा ते आठ फळे. प्रति पनेट ‘एमआरपी’ ५० ते ७० रुपये.
  • बाजार समितीच्या तुलनेत सुपर मार्केटकडून किलोला दीडपट दर जास्त मिळू लागला.  
  • ''इंजिनियर’ असल्याने कल्पक बुद्धी वापरून पॅकिंगवरील लेबल आकर्षक व माहितीपूर्ण केले. यात ‘फूड सेफ्टी’ संस्थेचा लोगो, स्वतःच्या वेबसाईटचे तसेच डोंबे पाटील फार्म फ्रेशचे नाव, संपर्क आदी तपशील. बॉक्ससोबत अंजिरातील आरोग्यदायी घटकांचा तपशील असलेले माहितीपत्रकही.
  • सेंद्रिय शेतीला सुरवात. ग्राहकांना सेंद्रिय मालाची खात्री पटावी यासाठी पॅकिंगवर ‘पीजीएस ग्रीन’ हा सेंद्रिय प्रमाणीकरण प्रक्रियेतील लोगो.     
  • तोडणी केलेले अंजीर सुपर मार्केटच्या माध्यमातून ग्राहकांना त्वरीत उपलब्ध. त्यामुळे ताजेपणा, गोडी याबाबत सरस ठरून ग्राहकांच्या पसंतीस उतरते. सेंद्रिय घटकांचा अधिक वापर. त्यामुळे फळाचा दर्जाही उंचावला.
  • गेल्या तीन- चार वर्षांत स्वतःचे असंख्य ग्राहक तयार केले.  
  • पुण्यात नुकत्याच झालेल्या भीमथडी महोत्सवात सुमारे दोनशे किलो अंजिरे व जॅमच्या २२ बॉटल्सची विक्री करण्यात यश. दोन्ही उत्पादनांना ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद.
  • सुपर मार्केटद्वारे जॅम उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू   
  • अंजिराचा वैशिष्ट्यपूर्ण जॅम 

  • एकूण उत्पादनापैकी काही मालाचा दर्जा विविध कारणांमुळे घसरतो. अशा अंजिरापासून  वैशिष्ट्यपूर्ण जॅमनिर्मिती सुरू केली आहे. 
  • आकर्षक बाटली पॅकिंग, ब्रॅंडिंग तसेच ‘रेग्युलर’, वेलची, मध, ड्राय फ्रूट अशा चार स्वादांमध्ये उपलब्ध. 
  • बी. टेक (फूड टेक्नॉलॉजी) असलेल्या मोठ्या भावाचा (चंद्रशेखर) तांत्रिक ‘सपोर्ट’. 
  • जॅमच्या रूपाने अंजिराची टिकवणक्षमता एक वर्षापर्यंत वाढवून देशभरात पुरवठा करण्याचे उद्दिष्ट.
  • पंचवीस लाख रुपये गुंतवणुकीच्या प्रक्रिया प्रकल्पाची उभारणी सुरू. ‘एनएचएम’द्वारे ४० टक्के अनुदान. सुके अंजीर, वाईन निर्मितीचेही उद्दिष्ट. कृषी-आत्मा विभागाचे अधिकारी सुनील बोरकर, महेश रूपनवर, आर. के. पवार, सेंद्रिय शेतकरी कांतिलाल रणदिवे यांचे मोलाचे सहकार्य.  
  • समीरची बलस्थाने 

  • कुशाग्र, संशोधक बुद्धीचा शेतीत वापर. 
  • ‘इनोव्हेशन’ व ‘प्रेेझेंटेबल’ राहणे हे मुख्य गुण. 
  • आरामाची सवयच नाही. चार वर्षे ट्रेनने ‘अपडाऊन’ प्रवास. त्यामुळे प्रत्येक काम वेळेत करण्याची सवय. 
  • संपर्क : समीर डोंबे, ९५५२४३५००३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com