काकडीच्या गटशेतीचा यशस्वी ‘संकल्प’

उत्पादन वाढू लागल्यानंतर मुंबई, हैदराबाद व पुण्याच्या मार्केटची माहिती घेतली. मुंबईचे दर तुलनेने चांगले वाटल्याने तेथेच माल पाठवणे सुरू केले. प्लॅस्टिक क्रेटमध्ये माल भरून एकूण आठ टन माल ट्रकद्वारे मुंबईला पाठविला.तेथे किलोला १८, २० रुपयांपासून ते २२, २८ रुपयांपर्यंत दर मिळाला. वाहतुकीसाठी प्रतिकिलो चार रुपये खर्च आला. कमी कालावधीत काकडीतून गटातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवले.
लोहा, जि. नांदेड भागातील ‘कृषी संकल्प सिध्दी ’ गटातील सात शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकरावर शेडनेटमध्ये काकडी घेतली.
लोहा, जि. नांदेड भागातील ‘कृषी संकल्प सिध्दी ’ गटातील सात शेतकऱ्यांनी प्रत्येकी एक एकरावर शेडनेटमध्ये काकडी घेतली.

प्रतिकूल हवामानाशी सुसंगत अशा संरक्षित शेतीचा पर्याय लोहा (जि. नांदेड) येथील कृषी संकल्प सिद्धी शेतकरी गटाने निवडला. गटातील सात जणांनी यंदाच्या जानेवारीत शेडनेटच्या रूपाने बिगरहंगामी काकडी घेण्याचा प्रयोग केला. एकरी सुमारे २५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन घेतले. आता गटाचा आत्मविश्वास वाढीस लागला असून भरताचे वांगे, ढोबळी मिरचीचे प्रयोगही या शेतकऱ्यांनी केले आहेत.

नांदेड जिल्ह्यातील लोहा हा तसा कापूस पिकाचा पट्टा. या भागातील काही शेतकरी भाजीपाला पिकेही घेतात. लोहा हे तालुक्याचे ठिकाण आहे. येथील माधवराव जगन्नाथराव सूर्यवंशी यांनी पुढाकार घेत कृषी संकल्प सिद्धी शेतकरी गटाची स्थापना केली आहे. त्याद्वारे गटशेतीला परिसरात चालना मिळाली आहे.

शेडनेटचे प्रशिक्षण : 

  • गटाचे प्रमुख सूर्यवंशी पूर्वीपासून पारंपरिक पिकांबरोबर भाजीपाला पिकेही घेतात. सन २०१५ या वर्षामध्ये त्यांनी शेडनेटची उभारणी केली. पहिल्या वर्षी त्यात टोमॅटोचे पीक घेतले. त्यातील नवखा अनुभव लक्षात घेता बऱ्यापैकी उत्पन्न मिळाले. त्यानंतर कारले पीक घेतले. मात्र हे पीक ‘फेल’ गेले.
  • दरम्यान शेडनेट तंत्रात कुशल व्हायचे तर प्रशिक्षण घेण्याची गरज त्यांना भासली. त्यानुसार कृषी विभागाच्या मदतीने पुणे- तळेगाव येथील संस्थेतील प्रशिक्षणाचा लाभ मिळाला. यामुळे तांत्रिक ज्ञानाता भर पडली. आत्मविश्‍वास निर्माण झाला.
  • शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी :

  • केवळ प्रशिक्षण पुरेसे नव्हते. मग पुणे परिसरातील काही अनुभवी शेडनेट शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. त्यांच्या प्रयोगाचे बारकावे समजावून घेतले. यात काकडी उत्पादकही होते.
  • कमी कालावधीत व बिगरहंगामी येऊ शकेल अशा काकडी पिकाचा पर्याय पुढे आला. या रोपांचा पुरवठा करणाऱ्या एका कंपनीच्या प्लॉटलाही भेट देण्यात आली.
  • शेडनेटमध्ये काकडीचा प्रयोग :

  • गटातील नऊपैकी सात जणांनी शेडनेटमध्ये काकडी करण्याचे ठरवले.
  • सूर्यवंशी यांच्यासह गोपाळ भगवानराव बगाडे, शशीकुमार शंकर पत्की (रा. सुनेगाव), डॉ. मनोज जीवन, जीवनराव घंटे, व्यकंटी जीवनराव घंटे, बाबाराव दिघे आदींचा त्यात समावेश राहिला. या सातही जणांकडे एक एकरचे शेडनेट हाउस आहे.
  • जानेवारी २०१७ मध्ये या गटाची (कृषी संकल्प सिद्धी) नोंदणी आत्मा विभागाकडे करण्यात आली आहे.
  • सातही जणांनी शास्त्रशुद्धपणे गादीवाफे (बेड) तयार करण्याकडे लक्ष दिले.
  • बेडवर चार फूट रुंदीचा मल्चिंग पेपर बसवला. ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची सोय केली.
  • प्रत्येक बेडवर दोन ओळंत प्रत्येकी दीड फुटावर रोपांची झिगझॅग पद्धतीने यंदाच्या जानेवारीत काकडीची लागवड केली.
  • बहुतांश शेतकऱ्यांचा शेडनेटमधील काकडीचा पहिलाच अनुभव असल्याने तज्ज्ञांनी ठरवून दिल्याप्रमाणे व्यवस्थापन वेळापत्रक सांभाळले. शिवाय सूर्यवंशी यांचे लोहा येथे कृषी सेवा केंद्रही आहे. त्या माध्यमातून त्यांनीही गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत होते.
  • आश्वासक उत्पादन  साधारण ३५ दिवसांनंतर तोडा सुरू झाला. साधारण ४५ दिवसांपर्यंत एक दिवसाआड तोडा करण्यात आला. सुमारे ३०० ते ४०० किलो माल प्रत्येकाकडे मिळत होता. लागवड करताना सर्वांनी वेगवेगळ्या टप्प्यात केली होती. त्यानुसार कोणत्या दिवशी कोणी माल तोडायचा याचे वेळापत्रकही गटाने तयार केले होते. सुमारे ४५ दिवसानंतर उत्पादन वाढू लागले. एका दिवसाआड तोड्याला दीड टन माल निघू लागला. सूर्यवंशी म्हणाले की प्रत्येकाला एकरी सरासरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळाले. थंडीच्या काळात काकडीची वाढ खुल्या शेतात चांगल्या प्रकारे झाली नसती. शेडनेटचा तो फायदा झाला.

    मुंबईचे मार्केट  सुरवातीच्या काळात उत्पादन कमी असल्यामुळे माल लोहा व नांदेड येथे विकण्यात आला. येथे सरासरी प्रतिकिलो १५ रुपये दर मिळाला. उत्पादन वाढू लागल्यानंतर मात्र मुंबई, हैदराबाद व पुण्याच्या मार्केटची माहिती घेण्यात आली. मुंबईचे दर तुलनेने चांगले वाटल्याने तेथेच माल पाठवणे सुरू केले. प्लॅस्टिक क्रेटमध्ये माल भरून एकूण आठ टन माल ट्रकद्वारे मुंबईला पाठविण्यात आला.तेथे किलोला १८, २० रुपयांपासून ते २२, २८ रुपयांपर्यंत दर मिळाला. वाहतुकीसाठी प्रतिकिलो चार रुपये खर्च आला.

    गुंतवणूक, अर्थकारण  पारंपरिक पिकांतून उत्पन्नाची मोठी मजल गाठता येत नाही. मात्र संरक्षित शेतीचा पर्याय वापरून ते शक्य होऊ शकते असा गटाला अनुभव आला आहे. कमी कालावधीत काकडीतून गटातील शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न मिळवले आहे. शेडनेट, ठिबक आदींसाठी एकरी १५ लाख रुपये भांडवल उभे करावे लागले. त्यासाठी बॅंकेचे कर्ज काढावे लागले. मात्र कृषी विभागाकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळाल्याचे सूर्यवंशी म्हणाले.

    आता भरताचे वांगे, ढोबळी  पहिल्या प्रयोगातून आत्मविश्वास वाढल्यानंतर गटातील शेतकऱ्यांनी आपला मोर्चा शेडनेटमध्ये भरताचे वांगे व ढोबळी मिरचीकडे वळवला आहे. सध्या पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. काकडीचा आश्वासक प्रयोग पाहून गटामधील सदस्यांची संख्या आता २० वर गेली आहे.

    या बाबी साध्य केल्याचा झाला फायदा

  • रीतसर प्रशिक्षण
  • शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी
  • दर्जेदार रोपांची निवड
  • शेडनेटसारखे संरक्षित शेतीतले तंत्रज्ञान, बेड, मल्चिंग, ठिबक, विद्राव्य खते यांचा वापर
  • चांगले पीक व्यवस्थापन
  • समूहाद्वारे एकत्र येणे
  • बाजारपेठांचा अभ्यास
  • संपर्क - माधवराव सूर्यवंशी - ९७६५३८६८६९ (लेखक नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com