बुद्धिकौशल्यातून लालासो झाले शेतीतील ‘इंजिनियर’ 

विहिरीतील गाळ काढणारे यंत्र.
विहिरीतील गाळ काढणारे यंत्र.

अशिक्षित असले तरी लालासो भानुदास साळुंखे-पाटील यांनी आठ एकर शेती सांभाळताच बुद्धिकौशल्य, निरीक्षणशक्ती वापरून तीन कृषी यंत्रे विकसित केली आहेत. हाताळण्यास व वापरण्यास सुलभ, शेतकऱ्यांची नेमकी गरज अोळखून निर्मिती ही त्यांच्या यंत्रांची वैशिष्ट्ये आहेत.    सांगली जिल्ह्यात पलूस आणि वाळवा तालुक्‍याच्या सीमेलगत नागठाणे (ता. पलूस) गाव आहे. द्राक्ष आणि उसासाठी गावाची ओळख आहे. पाणी मुबलक आहे. गावातील लालासो भानुदास साळुंखे-पाटील इथले प्रगतशील शेतकरी. त्यांची आठ एकर शेती आहे. त्यात दोन एकर द्राक्ष तर उर्वरित ऊस आहे. 

अशिक्षित असल्याची टोचरी जाणीव 

पाटील सांगतात की माझं शिक्षण फक्त सातवी. तू एक ते दहा अंक म्हणून दाखव, तुला दहा रुपये बक्षीस देतो. बघा, वडिलांच्या आधारावर जगतोय अशी चेष्टा गावातील काही लोकं करायची. त्याचं वाईट वाटायचं. वडिलांनी पिठाची गिरणी सुरू करून दिली. कसाबसा हा व्यवसाय चालवला; पण तेव्हापासूनच यंत्रांची आवड होती. त्यामुळे यंत्रांच्या सुट्या भागांपासून काही ना काही निर्मिती करीत राहण्याचा छंद जडला होता. १९९० च्या दरम्यान फॅब्रिकेशनचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. शिक्षण कमी असल्याने तू काय वेल्डिंग करणार? असा अपमानही झाला. लोकांकडून अवहेलना झाल्याने स्वतःला सिद्धही करून दाखवायचं होतं. हीच बाब मला यंत्रनिर्मिती करण्यासाठी दिशादायक ठरल्याचे लालासो सांगतात.                                                            इच्छाशक्ती वापरली 

लालासो म्हणतात की कल्पनाशक्तीचा वापर करायचे ठरवले. इच्छाशक्तीही सोबत ठेवली तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. चौकटीच्या बाहेर जाऊन जगलं पाहिजे. नवीन तंत्रज्ञानाबरोबर आपल्यात बदल झाला पाहिजे. तरच आपण या दुनियेत वावरू शकतो. या सर्व गोष्टी सोबत घेऊन ‘वर्कशॉप’ उभं केलं. लोखंड किंवा विविध धातूंबाबत माहिती घेतली. त्यांची प्रत ओळखू लागलो. दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतः अभ्यास करण्यास सुरुवात केली. प्रत्येक गोष्टीचे प्रात्यक्षिक करून पाहण्याची सवय  जडली. लालासो यांनी याच मानसिकतेतून टप्प्याटप्प्याने तीन यंत्रे विकसित करण्यापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांकडून या यंत्रांना चांगला प्रतिसाद  आहे.

अशी आहेत तयार केलेली यंत्रे  मळणी यंत्र 

  • अन्य यंत्रांद्वारे धान्य मळणी करताना प्रत्येक वेळी चाळणी बदलावी लागते. मात्र या यंत्रात तशी गरज नाही. 
  • एका चाळणीद्वारे भात, मका, सोयाबीन, हरभरा, उडीद आदींची होते मळणी 
  • यात कमी ऊर्जा वापरली जाते. भुस्सा जवळपास होत नाही.  
  • कमी वेळेत जास्त मळणी. धान्य भिजले असले तरी त्या प्रमाणात मळणीचा चांगला दर्जा मिळतो.  
  • यंत्र तयार करण्यासाठी पावणेदोन लाख रुपये खर्च आला. 
  • विहिरीतील गाळ काढणारे यंत्र

  • सन २०१४ मध्ये निर्मिती 
  • या यंत्राद्वारे गाळ काढण्यासाठी विहिरीत पाणी असणे आवश्‍यक आहे. 
  • गाळाचे प्रमाण लक्षात घेऊन गाळ काढण्यासाठी सुमारे तीन दिवस लागू शकतात. 
  • मनुष्यबळ कमी. (दोन लोक पुरेसे असतात.) 
  • यंत्राची यारी तयार करण्यासाठी एक लाख रुपये खर्च 
  • साधारण ७० ते १०० फुटांपर्यंत गाळ काढण्याची क्षमता 
  • आत्तापर्यंत पाच शेतकऱ्यांनी घेतली सेवा  
  •  ट्रॅक्‍टरमध्ये बदल 

  • या ट्रॅक्टरच्या मागील दोन चाकांतील पूर्वीचे अंतर सव्वापाच फूट होते. ते चार फूट केले.  
  • द्राक्ष आणि ऊस पिकातील आंतरमशागतीसाठी वापर 
  • पिकात ब्लोअरचा वापर करणे शक्य 
  • चार फुटी ते सहा फुटी सरींपर्यंत वापर करणे सोपे 
  • अश्‍वशक्ती जास्त असल्याने चांगली मशागत होते. 
  • अधिकाधिक रुंद पट्टा पद्धतीच्या उसाला अधिक फायदा होऊ शकतो.  
  • यंत्रांचे पेटंट घेण्याची प्रक्रिया खर्चिक आहे. त्यामुळे त्याकडे अद्याप वळलेलो नाही. घरी दररोज अॅग्येरोवन येतो. त्यातून नवे तंत्रज्ञान माहीत होते. घरातील सदस्यांकडून ती वाचून घेतो. समजलेल्या माहितीचे चिंतन करतो. त्यातून ऊर्जा व कल्पनाशक्ती यांची वाढ होते.  - लालासो साळुंखे-पाटील 

    जोखीम आणि नुकसानही  लालासो म्हणाले की यंत्रांची निर्मिती सहजसाध्य नसते. त्यासाठी मोठी जोखीम उचलावी लागते. वेळ द्यावा लागतो. भांडवलही गुंतवावे लागते. मला किमान पंधरा लाख रुपये खर्च करावे लागले. अनेकवेळा यंत्रे मनासारखी झाली नाहीत. मात्र प्रयत्न व चिकाटी धरून ठेवल्यानेच पुढे यश मिळाले.    

    मुलांना घडवतो आहे लालासो यांना मुलगा निलेशची साथ मिळते आहे. आपण अशिक्षित आहे. त्यामुळे समाजाने आपल्याला कमी लेखलं. तसं आपल्या मुलांना कमी लेखू नये म्हणून लालासो यांनी त्यांना चांगलं शिक्षण दिलं. मुलगा कोल्हापूर येथे पहिलवानकी शिकतो आहे. सन २०१५ मध्ये खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत त्याने रजत पदक पटकवले आहे. मुलगी सोनाली ‘कॉम्प्युटर इंजिनिअरिंग’ करीत आहे. केवळ एखादी गोष्ट शिक म्हणून काही होत नाही. त्यासाठी मुलांच्या ताब्यात शेती दिली पाहिजे. त्यांनी शेतीत काम केलं तरच फायदा होतो असे लालासो म्हणतात. 

    लालासो यांच्या यंत्राद्वारे दोन दिवसांत विहिरीतील गाळ काढणे झाले. जर पारंपरिक पद्धतीने तो काढला असता, तर १५ ते २० दिवस लागले असते. त्यासाठी एक लाख रुपये खर्च आला असता. मात्र या यंत्रामुळे दोन दिवसांत गाळ काढून झाला. खर्चही ५५ हजार रुपयेच आला. वेळेत आणि कमी खर्चात काम झाले. - अरविंद कुंभोजे,  नांद्रे, ता. मिरज, जि. सांगली. 

    संपकर् : लालासो भानुदान साळुंखे-पाटील, ९८९०९२०८९४  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com