रेशीम शेतीतून शोधला विकासाचा मार्ग

 रेशीमशेतीच्या व्यवस्थापनात सुभाष पाटील यांना पत्नी कविता यांची खंबीर साथ असते.
रेशीमशेतीच्या व्यवस्थापनात सुभाष पाटील यांना पत्नी कविता यांची खंबीर साथ असते.

परखंदळे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) गावातील सुभाष व कविता पाटील या दांपत्याने प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने रेशीम शेती केली. यात स्थैर्य मिळविले. शेतीतील यशस्विता पाहून त्यांना होणाऱ्या विरोधाची जागा कौतुकाने घेतली आहे. भौगोलिक परिस्थितीला आव्हान देत त्यांनी केलेली रेशीम शेती नक्कीच प्रेरणादायी आहे.   कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सर्वाधिक पाऊस पडणारे तालुके असले तरी उन्हाळ्यात मात्र येथील लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. जानेवारी ते जूनपर्यंत काही गावांना तर टॅंकरचे विकतचे पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्याचे वांदे तर शेतीचा तर विचार करण्याची गरज नसल्याची परिस्थिती शाहूवाडी तालुक्‍यातील अनेक गावांत आहे. याच तालुक्‍यातील परखंदळे हे गाव. भात सोडले तर अन्य कोणतीच पिके या गावात फारशी घेतली जात नाहीत. दुग्धव्यवसाय हाच गावाला आधार. याच गावातील पाटील दांपत्याने प्रतिकूल परिस्थिती, कष्ट अाणि जिद्दीच्या जोरावर रेशीम शेतीत यश मिळवले अाहे. प्रतिकूल परिस्थितीतून सुरवात सुभाष पाटील यांनी २००३ साली लग्न झाल्यानंतर शेती करण्याचा निर्णय घेतला. परंतु, शेतीतून उत्पन्नाची शाश्‍वती नसल्याने कुटुंबाने त्यांना विरोध केला. वैचारिक मतभेद झाल्याने सुभाष पाटील यांनी मुुंबई गाठली. तिथे रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय सुरू केला. पण, शेती करायची हा निर्धार पक्का होता. पंधरा ते सोळा तास रिक्षा चालवून त्यांनी काही रक्कम साठविली आणि ती शेतीत गुंतविली. २०११ साली दोन कुपनलिका घेतल्या अाणि विहिरीचे खोलीकरण करून पाण्याची सोय केली. सुरवातीला भाजीपाला अाणि हंगामी पिके घेतली जात. त्यानंतर रेशीम शेती करण्याचा विचार करून त्याचा अभ्यास केला. जागा भाड्याने घेऊन त्यांनी रेशीम शेतीचा श्री गणेशा केला. नियोजनाने कामाची विभागणी पाटील दांपत्याची वडिलोपार्जित दोन एकर शेती आहे. २०१५ साली त्यांनी रेशीम शेतीला सुरवात केली. दीड एकरांवर तुतीची लागवड केली आहे. सुरवातीला एक तळघर भाड्याने घेऊन रेशीम कीटकांचे संगोपन सुरू केले. शाहूवाडी तालुका दुर्गम असल्याने त्यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन शेतीतील बारकावे समजून घेतले. यानंतर सुमारे एक लाख रुपये गुंतवून रेशीम शेतीस सुरवात केली. कोणते काम कोण करायचे याचे नियोजन केल्याने संगोपन करणे सोपे झाले. सौ. कविता या दहावी शिकलेल्या असल्या तरी शेतीकामाच्या बाबतीत उत्साही आहेत. यामुळे सुभाष यांना त्यांची चांगली साथ मिळते. सुभाष यांनी रेशीम कोष विक्री करायची आणि कविता यांनी कीटकांचे संगोपन करायचे असे कामाचे नियोजन केले. अंडीपुंज आणल्यानंतर कीटकांची वाढ होईपर्यंत सर्व व्यवस्थापन कविताताई पाहतात. कोष तयार झाले की त्याच्या विक्रीची जबाबदारी सुभाष यांच्यावर असते. कोशाची विक्री कर्नाटकातील रामनगर येथील बाजारात केली जाते. वर्षातून चार बॅच घेतल्या जातात. एक बॅच संपल्यानंतर एक महिन्यानंतर दुसरी बॅच घेतली जाते. मधल्या एक महिन्याच्या कालावधीत संगोपनगृह चुना, ब्लिचिंग पावडरने निर्जंतुक केले जाते. याच वेळी तुतीकडेही लक्ष दिले जाते. भांगलणी, फवारणी करून तुतीचा दर्जा चांगला राखण्यासाठी प्रयत्न केला जातो. एका बॅचमधून ६५ हजार रुपयापर्यंतचा नफा कीटक संगोपन करणे, तुतीची निगा सातत्याने राखण्यामुळे तुतीचा दर्जाही चांगला राहिला. यामुळे नफाही चांगल्याप्रकारे मिळू लागला आहे. दोन महिन्यांच्या एका बॅचमधून सुमारे ऐंशी हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. यातून पंधरा हजार रुपयांचा व्यवस्थापन खर्च वजा जाता ६५ हजार रुपयापर्यंत निव्वळ उत्पन्न मिळू शकते. कोषाला किलोसाठी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. पहिले काही वर्षे अडीचशे अंडीपुंजाचे संगोपन केले जात होते. आता तुतीक्षेत्रात वाढ केल्याने साडेतीनशे अंडीपुंजाचे संगोपन केले जाते. दररोज दुचाकीवरुन शेतात कविताताई दहावी शिकलेल्या. माहेरी भाजीपाल्याची शेती यामुळे शेतीची आवड होतीच. सासरी आल्यानंतर पतीसोबत त्यांनी या आवडीला अर्थांजनाचे रूप दिले. गाव व शेत याचे अंतर सुमारे दीड ते दोन किलोमीटर इतके आहे. यामुळे तातडीचे काम निघाले की चालत जाणे शक्‍य नव्हते हे पाहून त्यांनी दुचाकीची खरेदी केली. त्या स्वत: दुचाकी चालवतात यामुळे कोणतेही काम अडत नाही. शेतीच्या समृद्धीसाठी प्रयत्न गावात बारमाही पाण्याचा स्त्रोत नसल्याने कोणत्याही बॅंकेने पाटील यांना कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे त्यांनी पंधरा ते सोळा तास रिक्षा चालवून पैशाची जुळवाजुळव केली. पहिल्यांदा शेती यशस्वी करून दाखविली त्यानंतर अथक प्रयत्नातून कर्ज मिळवले. कर्जाच्या पैशांतून शेतातच शेडची उभारणी केली. ८५ लाख लिटरचे शेततळे खोदले. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळाला यासाठी त्यांना कृषी विभागाचे सहकार्य अाणि क्षीरसागर यांचे मार्गदर्शन मिळाले. पाऊस, विहीर, कूपनलिकांच्या पाण्याने शेततळे भरून घेतले जाते. यामध्ये मत्स्य शेती, मोत्यांची शेती कराण्याचा त्यांचा विचार आहे. सध्या मुंबईला काही दिवस रिक्षा चालविणे व काही दिवस गावाकडे शेतीत लक्ष घालणे असा सुभाष पाटील यांचा दिनक्रम सुरू आहे. अॅग्रोवन खरा मार्गदर्शक पाटील दांपत्य हे अॅग्रोवनचे सुरवातीपासूनचे वाचक आहे. दुर्गम भागात ज्ञानाचे कोणतेही साधन नसताना अॅग्रोवन त्यांच्या मदतीला धावून आला. रेशीमशेतीचे अनेक लेख त्यांना प्रेरणा देऊन गेले. रेशीम शेतीविषयक लिहिणाऱ्या लेखकांची  विविध पुस्तके त्यांनी खरेदी केली आहेत.   संपर्क ः सुभाष पाटील, ७०३९२६६००६ कविता पाटील, ७४४७८३१००३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com