सुमारे साठ एकरांवर ‘ड्रीप अॅटोमेशन’

जवळपास ६० एकरांमध्ये ‘ड्रीप अॅटोमेशन’ केले आहे
जवळपास ६० एकरांमध्ये ‘ड्रीप अॅटोमेशन’ केले आहे

पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्याबाबत अनेक शेतकरी जागरूक होऊ लागले आहेत. पुणे जिल्ह्यातील राजेगाव येथील आटोळे कुटुंबीयांनी सुमारे ६० एकरांवर स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करून ऊस, हळद व कांदा आदी पिकांची काटेकोर शेती सुरू केली आहे. त्यातून पाणी, मजुरी, वेळ यांत बचत तर साधलीच, शिवाय नगदी पिकांत एकरी उत्पादनवाढही शक्य केली आहे. पुणे जिल्ह्यात राजेगाव (ता. दौंड) येथे उजनी जलाशयाच्या काठावर आटोळे कुटुंबीयांची साठ एकर शेती आहे. उजनी धरणाच्या काठावर शेती असल्याने पाण्याची मुबलकताही आहे. सोमनाथ व तात्यासाहेब हे आटोळे बंधू पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे. आज कुटुंबातील नव्या पिढीचे धनंजय शेतीची जबाबदारी बंधू अमोल व सुयश यांच्या मदतीने सांभाळतात. धनंजय यांनी एम.एस्सी. (डेअरी सायन्स) केले आहे. शिक्षणानंतर नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न धावता शेतीतच प्रयोग करण्यास त्यांनी सुरवात केली. ठिबक सिंचनावर ऊस धनंजय यांनी ऊसशेतीत सुधारित पद्धतीचा वापर सुरू केला. साडेपाच बाय दीड ते दोन फूट अंतरावर किंवा ठिबकची लॅटरल टाकून दीड फुटावर एक डोळा याप्रमाणे उसाची लागवड केली जाते. यामुळे बेण्याच्या खर्चातही बचत होते. एकरी सुमारे चार हजार डोळ्यांची लागवड यानुसार होते. त्याचे चांगले परिणाम मिळाले आहेत. ठिबकचे तंत्रज्ञान

  • ऊसशेतीत पाण्याचा वापर काटेकोर करायचा हेच सूत्र आटोळे यांनी अवलंबिले. सन २०१०-११ पासून टप्प्याटप्प्याने ठिबक व त्यातही शंभर टक्के स्वयंचलित ठिबक यंत्रणा (ड्रीप अॅटोमेशन) बसवण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले.
  • आजचे एकूण क्षेत्र - ६० एकर
  • स्वयंचलित ठिबकखालील क्षेत्र - जवळपास सर्व - प्रत्येकी २० एकर व ४० एकर अशी विभागणी
  • पिके - आडसाली ऊस - ३० एकर
  • अलीकडील वर्षांत हळद
  • अन्य पिकांत रब्बीत कांदा
  • ठिबक यंत्रणेचे नियोजन प्रथम सहाशे चौरस फूट क्षेत्राची खोली बांधून त्यात ‘मेन कंट्रोलर युनिट’, ‘अॅटो फिल्टरेशन युनिट’, वॉटर मीटर, फर्टिलायझेशन युनिट आदींची उभारणी केली. ठिबकच्या दृष्टीने शेतीचा आराखडा तयार केला. त्यानुसार मुख्य नलिका, उपनलिका, लॅटरल्स यांची निवड केली. लॅटरलवर योग्य दाब ठेवल्यामुळे समप्रमाणात पाणीपुरवठा करता आला. त्यामुळे पाइप्स ‘चोक अप’ होण्याचा धोका कमी झाला. स्वयंचलित यंत्रणेच्या माध्यमातून पिकाला द्यावयाचे पाणी, विद्राव्य खते याबाबतची माहिती यंत्राला ‘फीड’ केल्यामुळे आवश्यक तेवढेच पाणी व खत यांचा पुरवठा होतो. या यंत्रणेच्या माध्यमातून आठ तासांमध्ये सुमारे चाळीस एकर उसाला शिफ्ट पद्धतीने पाणीपुरवठा करता येतो. उजनी धरणातील बॅक वॉटरचा फायदा धनंजय यांना घेता येतो. त्यावर ठिबक संच चालेल का अशी शंका होती. मात्र तंत्र योग्य रीतीने हाताळल्यास कोणतीही अडचण येत नाही असा अनुभव आला. ‘अॅटो फिल्टरेशन युनिट’मुळे पाण्यातील कचरा, शेवाळ साफ करता आले व लॅटरलचे आयुष्य वाढले. हळद, हरभरा, कांदा साधारण नऊ वर्षांपूर्वी उसात ठिबकचा वापर सुरू करून तो यशस्वीही झाला. पण त्यानंतर अन्य पिकांना मात्र पाटपाणी देणे सुरू होते. मागील तीन ते चार वर्षांपासून हळद, हरभरा आदी पिकांतही ठिबकचा वापर सुरू केला आहे. कांद्याला स्प्रिंकलरद्वारे पाणी दिले जाते. ‘अॅटोमेशन’ तंत्राचे हे झाले फायदे

  • अॅटोमेशन पद्धतीद्वारे जमिनीचा पोत, उसाची जात, लागवडीचा प्रकार, पिकाची वाढीची स्थिती यानुसार खतपुरवठा केला जातो. एक हजार लिटरच्या पाच टाक्या आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विद्राव्य खते टाकण्यात येतात. लागवडीपासून ते काढणीच्या टप्प्यापर्यंत लागणाऱ्या खतांची मात्रा योग्य प्रमाणात देणे शक्य होते.
  • पूर्वी भरमसाट पाणी दिल्याने जमिनी क्षारपड होण्याचा धोका होता. एकरी उत्पादनात घट झाली होती.
  • आता एकूण व्यवस्थापन व ठिबक याद्वारे उसाचे एकरी ३५ ते ४० टन असलेले उत्पादन सरासरी ६० ते ७० टनांवर, तर काही स्थितीत ८० ते ९० टनांवर पोचले आहे. कांद्याचे उत्पादनही एकरी १५, १६ व काही वेळा २१ टनांवर गेले आहे.
  • जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली.
  • पूर्वी २० ते २५ मजूर लागायचे, त्यासाठी ३० ते ४० हजार रुपये खर्च व्हायचा. त्यात ४० ते ५० टक्के बचत झाली. तण कमी झाल्याने खुरपणी, खत टाकण्यासाठी लागणारे बल यांचीही मोठी बचत झाली. शेतीसाठी मजुरांवर होणाऱ्या खर्चापैकी सुमारे साठ टक्के बचत झाली.
  • उसाचा एकरी उत्पादन खर्च पूर्वी ६० हजार रुपयांपेक्षा कमी नसायचा. त्यात काही प्रमाणात निश्चित, तसेच वेळ व श्रम यांतही मोठी बचत झाली आहे.
  • अॅटोमेशन सुमारे ६० एकरांतील ड्रीप अॅटोमेशन सुमारे ५० लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली. त्यासाठी घरातील शिल्लक, कर्ज यांच्या रूपाने भांडवल उभारले. यातील मुख्य युनिट दीर्घकाळ चालणारे आहे. लॅटरल्सही काही वर्षे चालतील. त्यामुळे ही दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक म्हणावी लागेल. शिवाय, ठिबकसाठी अनुदानाचा लाभही घेता येतो. पुरस्काराने सन्मान अनेक वर्षांपासून आटोळे कुटुंबीय शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. परिसरातील अन्य शेतकऱ्यांनीही त्यांच्यापासून प्रेरणा घेतली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शेतीनिष्ठ पुरस्काराने आटोळे यांचा सन्मान करण्यात आला आहे. काही वर्षांपासून ठिबक सिंचन यशस्वी सुरू आहे. योग्य देखभाल व तंत्राची शास्त्रीय हाताळणी याद्वारे मोठ्या क्षेत्रासाठीही ठिबक सिंचन यंत्रणा प्रभावी राबविता येते हे सिद्ध झाले आहे. - धनंजय आटोळे संपर्क ः धनंजय आटोळे - ९६५७६७२२७७, ९२८४५७०४५७   १ व २ - राजेगाव (ता. दौंड) येथे ठिबक सिंचनावर आटोळे यांनी घेतलेला ऊस व हळद. ४ - व्यवस्थापन व सूक्ष्मसिंचनाच्या माध्यमातून कांद्याचे उत्पादन वाढवणे आटोळे यांना शक्य झाले आहे. ६ - जवळपास ६० एकरांमध्ये ‘ड्रीप अॅटोमेशन’ केले आहे. ७ - आटोळे यांचे एकत्रित कुटुंब.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com