Agriculture success story in marathi, shednet, vegetable and silk farming of Sadanand Bhalerao Vidul,Tal. Umerkhed, Dist. Yavatmal | Agrowon

शेडनेट, रेशीमशेती, भाजीपाला लागवडीतून वाढवले उत्पन्नाचे मार्ग
विनोद इंगोले
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सदानंद भालेराव यांनी शेतीची कोणतीही माहिती नसताना पारंपरिक शेतीच्या मागे न लागता उत्पन्नाच्या वेगळ्या वाटा शोधल्या आहेत. शेडनेटमध्ये डच गुलाबाचे उत्पादन घेत वर्षभर रोजगार शोधला. विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्याबरोबरच रेशीम शेतीतून उत्पन्नाला हातभार लावला आहे.
 

विडूळ (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील सदानंद भालेराव यांनी शेतीची कोणतीही माहिती नसताना पारंपरिक शेतीच्या मागे न लागता उत्पन्नाच्या वेगळ्या वाटा शोधल्या आहेत. शेडनेटमध्ये डच गुलाबाचे उत्पादन घेत वर्षभर रोजगार शोधला. विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्याबरोबरच रेशीम शेतीतून उत्पन्नाला हातभार लावला आहे.
 
आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावे प्रगत आणि सुधारित तंत्रज्ञानासोबतच पीक फेरपालटाच्या माध्यमातून परिवर्तनाकडे वाटचाल करू लागले आहेत. विडूळ (ता. उमरखेड) हेदेखील त्यापैकीच एक. हळद, पानमळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या विडूळमध्ये सदानंद पुंजाराम भालेराव यांनी पाच वर्षांपूर्वी पहिले शेडनेट उभारून त्यात फुलशेतीचा प्रयोग केला. त्यांनी निर्माण केलेल्या विश्‍वासामुळे आज गावशिवारात मोठ्या संख्येने शेडनेट उभारण्यावर शेतकरी भर देत आहेत. सदानंद भालेराव यांनी दहावीनंतर १९८३ साली आय.टी.आय. केला आणि १९८४ साली ते नोकरीला लागले. फ्रीज तयार करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या वरोरा (चंद्रपूर) येथील प्लॅंटमध्ये सदानंद व्यवस्थापक होते. २१ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी २००३ साली ऐच्छीक सेवानिवृत्तीचा पर्याय निवडला. साठवलेल्या पैशातून त्यांनी २००३ साली शेती खरेदी केली. जीवनाची सुरुवातीची वर्ष शिक्षणात आणि त्यानंतर नोकरीत गेल्याने त्यांना शेतीबद्दल काहीच माहिती नव्हती. परंतु अभ्यासातून त्यांनी या क्षेत्रात आज मोठे यश संपादित केले आहे.

संरक्षित शेतीची निवड
विडूळ गावापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर सदानंद यांची ७ एकर शेती आहे. पारंपरिक पिके घेण्यापेक्षा सदानंदरावांनी संरक्षित शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. शेडनेट किंवा पॉलिहाऊसमधील पीक व्यवस्थापनाची माहिती नसल्यामुळे पॉलिहाऊस आणि शेडनेटधारक शेतकऱ्यांना भेटी देऊन विविध पिकांची माहिती घेतली. पाण्याची कमतरता, तसेच इतर अनेक अडचणी असतानाही संरक्षित शेती शक्‍य होते, तर पाण्याची उपलब्धता असताना का शक्‍य होणार नाही? असा विचार त्यांना आला. याच विचारातून त्यांनी शेडनेटमध्ये गुलाब फुलांचे उत्पादन घ्यायचे ठरविले. वर्षभर उत्पादन मिळत असल्यामुळे त्यांनी डच गुलाबाची निवड केली. शेडनेट उभारणीसाठी त्यांना दहा लाख रुपये खर्च आला, यातील कृषी विभागाकडून ४ लाख ३२ हजार रुपये अनुदान मिळाले. सदानंद यांचे हे शेडनेट त्या वेळी या भागातील पहिले शेडनेट होते. यापूर्वी असा प्रयत्न कोणीच केला नव्हता. आजच्या घडीला मात्र या भागात पॉलिहाऊस आणि शेडनेट मोठ्या संख्येने उभे आहेत. त्यामध्ये फुलांच्या उत्पादनावर येथील शेतकऱ्यांचा भर असतो.

पीकपद्धती
ईसापूर धरणावरील पैनगंगा नदीचा कालवा त्यांच्या शेतीपासून गेला आहे. परंतु त्यांनी आपल्या शेतातच पाण्याचे स्त्रोत बळकट करण्यावर भर दिला. त्यामध्ये विहीर व बोअरवेलचा समावेश आहे. यातून मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होते, त्यामुळे कालव्यातील पाण्याची गरज भासत नाही. एक एकरात टोमॅटो, मिरची यांसारखी भाजीपाला पिके घेतली जातात. एक एकरावर शेडनेटची उभारणी केली आहे. त्यामध्ये डच गुलाब, त्यामध्ये थोड्याप्रमाणात लिली, निशिगंध, शतावरी घेतली जाते. एक एकर हळद, दीड एकर तुती लागवड आणि उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन व हरभरा ही पारंपरिक पिके घेतली जातात.

डच गुलाबाचे उत्पादन
डच गुलाबाची एकदा लागवड केल्यानंतर पाच वर्षे फुलांची उपलब्धता होते. व्यवस्थापन चांगले असल्यास त्यापुढील काळातदेखील उत्पादन घेता येते. एक बंचमध्ये वीस फुले असतात. एका बंचला ७० ते १०० रुपयांचा दर मिळतो. हंगाम नसलेल्या किंवा मागणी नसलेल्या काळात फुलांचे दर खूप खाली येतात. ही तूट दिवाळी किंवा अन्य सणात भरून निघते. त्यामुळे फूल उत्पादनात सातत्य ठेवल्याचे ते सांगतात. वर्षभर फुले मिळतात. दररोज सरासरी १७-१९ बंडल फुलांची उपलब्धता होते. यातून महिन्याला सरासरी २५ ते ३० हजार रुपये मिळतात. फुलांच्या तोडणीसाठी कुटुंबातील सदस्यांची मदत होत असल्याने यासाठी लागणाऱ्या मजुरीचे पैसे वाचतात.

मार्केटचा शोध
नांदेडला फुलांचे मोठे मार्केट आहे. नांदेड शहर जवळ असल्यामुळे या ठिकाणी फुलांची विक्री होते. उमरखेड, पुसद, दारव्हा, दिग्रस, आर्णी, नजीकच्या आदिलाबाद या भागांतही फुलांची विक्री केली जाते. सुरवातीला या भागातील व्यापाऱ्यांना फुले नेऊन दाखविली. त्यांना फुलांचा दर्जा आवडल्याने मागणी होऊ लागली. त्यामुळे उत्साह वाढीस लागला. व्यापाऱ्यांकडून फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते.

सेंद्रिय निविष्ठांच्या वापरावर भर
जीवामृत आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची मात्रा पिकाला रोज देण्यावर भर आहे. या माध्यमातून पीक संरक्षण त्यासोबतच फुलांचा दर्जा राखण्यास मदत होते. फुले कीडरोगाला लवकर बळी पडतात. त्यामुळे निरीक्षणात सातत्य ठेवावे लागते. त्याआधारे पीक संरक्षणात्मक उपाय योजले जातात. फुलांचा दर्जा चांगला असेल, तरच बाजारात त्याला चांगले दर मिळतात, हे साधे सूत्र त्यामागे आहे. फुलांची प्रत नसेल, तर व्यापाऱ्यांकडून मागणी राहत नाही. फुलाचा दर्जा राखण्याकरिता जमिनीचा पोतदेखील टिकवावा लागतो. त्याकरिता शिफारसीत उपाययोजना केल्या जातात. गरज असेल, तरच रासायनिक निविष्ठांचा वापर केला जातो.

रेशीम शेतीची जोड
सदानंदरावांनी २०१३ साली ६० बाय २२ फूट आकाराच्या रेशीम शेडची उभारणी केली. त्यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च अला. त्यापैकी ९० हजार शासनाचे अनुदान मिळाले. रेशीम कीटकांच्या खाद्यासाठी दीड एकरावर तुतीची लागवड केली. वर्षाला ५ ते ६ बॅच घेतल्या जातात. एका बॅचमधून साधारण १ क्विंटल कोषांचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट असते. कोषांची विक्री बंगलोर मार्केटला केली जाते. क्विंटलसाठी साधारणपणे ३५ ते ४० हजार रुपये भाव मिळतो. सदानंद स्वतः कोष घेऊन मार्केटला जातात, त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाचतो.

शेतीमधील उल्लेखनीय बाबी

  • सेंद्रिय निविष्ठा वापरून फुलांचा दर्जा राखल्याने मिळतो चांगला दर.
  • व्यापाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधत दराबाबत विचारणा.
  • विहीर व बोअरवेलच्या आधारे पाण्याचे स्त्रोत केले बळकट.
  • फुलांची काढणी, रेशीम कीटकांचे व्यवस्थापन घरीच केले जाते, त्यामुळे मजुरीवरील खर्चात बचत
  • भाजीपाला पिकांमध्ये अच्छादनाचा वापर
  • भाजीपाला आणि शेडनेटमधील पिकांसाठी ठिबक सिंचनाची सोय

संपर्क ः सदानंद भालेराव, ९१३०४८२८३८ 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २...कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा दूध संघाने (गोकुळ)...
तीस टन हापूसची रत्नागिरीतून थेट निर्यातरत्नागिरी ः रत्नागिरीतील प्रक्रिया केंद्रातून...
उन्हाचा चटका; उकाडा नकोसापुणे : मे महिन्याच्या सुरवातीपासून कमाल तापमान...
पूर्वमोसमी वळीवाच्या सरींचाही दुष्काळपुणे: उन्हाच्या झळा वाढल्याने राज्याला तीव्र...
ग्राम स्तरावरील पीककापणी प्रयोग रद्द !पुणे: राज्यात येत्या खरिपात पीकविम्यासाठी ग्राम...
पराभव मान्य; पण लढाई संपलेली नाही... :...राज्यातील शेतकरी चळवळीचा चेहरा असलेले स्वाभिमानी...
दुधाचा कृशकाळ सुरू होऊनही दर कमीच !पुणे: दुष्काळामुळे दुधाचा कृशकाळ सुरू झालेला असून...
उष्ण, कोरड्या हवामानाचा अंदाज पुणे: राज्यातील कमाल तापमानाचा पारा गेल्या काही...
एचटीबीटीविरोधात मोहीम तीव्र पुणे: राज्यात सुरू असलेल्या अनधिकृत तणनाशकाला...
फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वलनगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत...
राज्यात पाणीटंचाईचा आलेख वाढताचपुणे: उन्हाचा चटक्याबरोबरच राज्यात पाणीटंचाईचा...
शेतकरी कंपन्या लातूरमध्ये उभारणार डाळी...लातूर : स्पर्धाक्षम बाजार घटक म्हणून शेतकरी...
देशातील जलाशयांमध्ये २१ टक्के पाणीसाठानवी दिल्ली ः उन्हाचा चटका वाढतानाच देशभरात...
नंदुरबारच्या दुर्गम भागात ‘सातपुडा भगर'...अक्कलकुवा तालुक्‍यातील आदिवासी महिला,...
गटशेती : काळाची गरजशेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने शेती...
शिक्षण, आरोग्य अन्‌ प्रशिक्षणातून...नांदगाव (ता. बोदवड, जि. जळगाव) गावामध्ये विजय...
सरकारबी मदत करंना अन्‌ बॅंका कर्ज देईनातनांदेड ः गेल्या वर्षीबी अन्‌ औंदाबी पावसानं मारलं...
पाण्याअभावी संत्राबागा होताहेत सरपणपरभणी ः जिल्ह्यातील प्रमुख संत्रा उत्पादक गाव...
‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणीदिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न...
जनावरांच्या बाजारातील व्यवहार उधारीवरचपरभणी: खरिपाच्या पेरणीच्या तोंडावर काहीशी...