जमीन सुपीकतेसाठी सामूहिक वाटचाल...

राजू जाधव यांनी उसात केलेले पाचटाचे आच्छादन. 
राजू जाधव यांनी उसात केलेले पाचटाचे आच्छादन. 

मुधलवाडी (ता. पैठण, जि. अाैरंगाबाद) येथील शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कंबर कसली आहे. येथील उच्चशिक्षित तरुण राजू गणेश जाधव याने कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून जमिनीची सुपीकता वाढविण्यात बऱ्यापैकी यश मिळवले अाहे. त्यांचे अनुकरण करीत शिवारातील इतर शेतकऱ्यांनीही जमीन सुपीकतेसाठी प्रयत्न सुरू केले अाहेत.  

अाैरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी प्रकल्पापासून जवळच अासलेले मुधलवाडी गावात पूर्वी मोसंबी बागा असायच्या परंतु दूषित पाणी अाणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या घटत्या प्रमाणामुळे येथील शेतकऱ्यांना जमिनीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले. यातून मार्ग काढण्यासाठी येथील शिवारातील शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांना अाता यश मिळत अाहे. येथील माहिती तंत्रज्ञान विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या राजू गणेश जाधव या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता अापल्या गावात वडिलोपार्जित शेती कसण्याचा निर्णय घेतला. एकत्रित जाधव कुटुंबाची जवळपास तीस एकर शेती अाहे. यामध्ये ऊस अाणि गहू या प्रमुख पिकांसह कांदा, कापूस, तूर ही पिके पारंपरिक पद्धतीने घेतली जातात.  

जमीन सुपीकतेसाठी प्रयत्न मुधलवाडी शिवारातील बरेच शेतकरी सिंचनासाठी विहिरी अाणि जवळच्या जायकवाडी प्रकल्पाचे पाणी वापरतात. गावामध्ये एमआयडीसी क्षेत्र असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच रासायनिक कंपन्या अाहेत. रसायनयुक्त पाण्यामुळे येथील जमिनी अाणि पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत अाहे. कंपन्यांतील रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्यामुळे येथील विहिरीतील पाणी अाणि जमिनीतील क्षाराचे प्रमाण वाढले अाहे. दूषित पाण्यामुळे येथील जमिनीची सुपीकता घटत चालली अाहे. राजू यांनाही अापल्या जमिनीचे अारोग्य खालावले अाहे, असे दिसून अाले. यावर काय तोडगा काढता येऊ शकतो, याविषयी त्यांचे चिंतन सुरू होते. याविषयी अॅग्रोवनच्या सततच्या वाचनातूनही त्याच्यासमोर काही पर्याय आले, परंतु त्याला प्रत्यक्ष कृतीसाठी तांत्रिक जोड देण्याचं काम औरंगाबाद येथील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातून झाले.

पाचट कुजविण्याचा निर्णय राजू यांनी २०१६ मध्ये पहिल्यांदा शेतातील गव्हाचे काड व उसाचे पाचट शास्त्रोक्‍त पद्धतीने कुजविले. उसाची जमिनीलगत छाटणी केली. रोटाव्हेटर फिरवून पाचटावर बुरशीनाशकाची फवारणी केली. पाचट जमिनीत कुजले जावे म्हणून प्रतिएकर ५० किलो युरिया व चाळीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट मिसळले. शेत थोडे भिजवून घेतले. हीच क्रिया गव्हाची काढणी झालेल्या शेतातही गव्हाच्या काडावर केली. यंदा तिसऱ्यांदा ही प्रक्रिया ऊस व गव्हाच्या शेतात केली. काही क्षेत्रात हे काम अजूनही सुरू आहे.

दुसऱ्या वर्षी दिसू लागला परिणाम   कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी सांगितलेल्या पद्धतीने गव्हाचे काड व उसाचे पाचट न जाळता शेतातच शास्त्रोक्‍त पद्धतीने कुजविल्यानंतर पहिल्या वर्षी परिणाम दिसून अाला नाही, परंतु दुसऱ्या वर्षी पुन्हा तीच प्रक्रिया केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. अासपासच्या इतर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या तुलनेत अापल्या जमिनीत सुधारणा होत अाहेत असे दिसून अाले.  

इतरही शेतकरी लागले कामाला मुधलवाडीतील इतर शेतकरीही गतवर्षापासून जमीन सुधारणेसाठी प्रयत्न करित अाहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शेतातील सेंद्रिय घटक जमिनीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने गाडले जात अाहेत. यामध्ये गावातील शंकर जाधव, विनोद आढाव, भागुराम जाधव यांच्यासह पैठणचे बंडू जाधव इ. गावकऱ्यांचा समावेश अाहे.  

उसाचे पाचट अाले उपयोगाला    उसाच्या पिकाला हेक्‍टरी जवळपास ९ ते १० कोटी लिटर पाणी लागतं. या पाण्यात पाचट कुजविण्याच्या प्रक्रियेमुळे ५० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करता येणे सहज शक्‍य असल्याचे कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. किशोर झाडे म्हणाले. पाचट शास्त्रोक्‍त पद्धतीने कुजविण्यासाठी किमान पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. तोवर जमिनीत गाडलेले हे पाचट सेंद्रिय आच्छादनाचे काम करते.  

दोन एकरांवर शेवग्याची लागवड राजू यांनी पहिल्यांदा शेवगा पिकाचा पर्याय निवडला. एकरी चौदाशे शेवग्याच्या रोपांची लागवड केली. २० ते २२ क्‍विंटलचे उत्पादन घेतले. दुसऱ्यांदा शेवगा चांगलाच बहरात असून, त्याची विक्री सुरू आहे. सर्व उत्पादनाची विक्री जवळच असलेल्या नगर अाणि अाैरंगाबाद मार्केटमध्ये केली जाते.   

शेतकऱ्यांना जाणवलेले परिणाम

  • जमिनीची जलधारण क्षमता अाणि भुसभुशीतपणा वाढला
  • नत्राचे प्रमाण स्थिर होण्यास मदत
  • खोडव्याचे उत्पादन वाढण्यास झाली मदत
  • रासायनिक खताचे प्रमाण झाले कमी  
  • शेणखताचीही फारशी गरज पडत नसल्याचा अनुभव
  • नांगरताना जमिनीतून कडक ढेकळं निघण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले
  • पाचट व गव्हाचे काड कुजविल्याने अन्नद्रव्याची उपलब्धता वाढली 
  • तीन टनांपर्यंत शेणखत मिसळल्याचा फायदा
  • उसासाठी पाणी देण्याच्या पाळ्या घटल्या
  • रासायनिक खताचे चार महिन्यांतील तीन डोस आले दोनवर
  • जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन झाले कमी
  • उत्पादनात जवळपास दहा टक्‍क्‍यांपर्यंत वाढ
  • राजू जाधव यांचे उत्पादन

    पीक   सरासरी क्षेत्र सरासरी उत्पादन एकरी
    कांदा  ५ एकर १५ टन
    ऊस  १० एकर ६५ ते ७० टन
    कापूस   ४ ते ५ एकर   ५ ते ६ क्‍विंटल
    शेवगा  २ एकर २० ते २२ क्‍विंटल
    तूर  कपाशीत आंतरपीक  १५ ते २० क्‍विंटल
    गहू २ ते ३ एकर   १५ क्‍विंटल

    यंदा या प्रयोगाचं तिसरं वर्ष आहे. उन्हाळी मूग व हिरवळीच्या खतही आपणं या उन्हाळ्यात जमिनीत गाडणार आहोत. राजू जाधव, ८८८८३३३५५१ , मुधलवाडी  गव्हाचं कुटार अन्‌ उसाचं पाचट न जाळता जमिनीत कुजविल्याने जमिनीला लागणारे रासायनिक खताचे प्रमाण घटले.  शंकर जाधव, ९९२२५७८७९१, मुधलवाडी जमीन भुसभुशीत झाली. उसाच्या उत्पादनातही पंचवीस टक्‍के फरक जाणवला.   बंडू जाधव, ९८९०३७५५५१, पैठण, जि. औरंगाबाद. उसाचे पाचट, गव्हाचे काड जाळल्याने होणारे नुकसान व कुजवल्याने होणारे फायदे लक्षात घेऊन राजू जाधवसारख्या युवा व शिक्षित तरुणाने पावले उचलल्याने त्याच्या शेतजमिनीचा पोत सुधारतो आहे. इतरही शेतकऱ्यांनी त्यामध्ये यामध्ये सहभाग घेतल्याने त्यांना त्याचा फायदा निश्चित होईल. डॉ. किशोर झाडे, ८२७५३८८०४९, विषय विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com